भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-७

अध्यक्ष महाराज, सन्माननीय सभासद श्री. आवळे यांचा या ठरावाला विरोध आहे याचे कारण त्यांची स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी आहे आणि म्हणून या ठरावात उल्लेखिलेल्या गोष्टी त्यांना करावयास नको आहेत, आणि त्यांना आपली ही भूमिका १९६२ च्या निवडणुकांपर्यंत तरी कायम ठेवावयाची आहे. अशी त्यांची नीती असल्यानंतर त्यांनी माझे म्हणणे इतक्यातच स्वीकारावे अशी मी अपेक्षा करणार नाही. मला पेशन्स आहे, मी वाट पाहणार आहे. त्यांच्या आणि सन्माननीय सभासद श्री. व्यास यांच्या दृष्टीकोनात मुळातच फरक आहे. श्री. व्यास यांचा दृष्टीकोन मोठा आहे आणि तसाच सगळया माणसांचा असावा अशी माझी इच्छा आहे. सगळयांना एकत्र घेऊन नांदले पाहिजे असा श्री. व्यास यांचा दृष्टीकोन आहे. जर आपण एकजिनसी भारत निर्माण करण्याची गोष्ट बोलत आहोत तर ते ध्येय साध्य करण्याचे एक पाऊल म्हणून एक भाषा बोलणार्‍या लोकांचे एक एकजिनसी एकराज्य निर्माण करण्याचा प्रयत्‍न आपण यशस्वी केला पाहिजे. त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारताना एक कसोटी मी मनाशी ठरविली होती. आम्ही कोठे विकास योजना अंमलात आणीत आहोत आणि कोठे नाही, आणि कोठे त्या योजना कशा प्रकारे चालल्या आहेत याच्यावर टीका होईल, त्याच्यावर या राज्याचे यशापयश ठरेल, पण दूरदृष्टीने पाहताना जो मराठवाडयाचा भाग आहे, जो कोकणचा भाग आहे किंवा जो विदर्भाचा भाग आहे त्यांना या महाराष्ट्र राज्यात एकत्र ठेवण्याकरिता जे काही करणे आवश्यक होते ते केले की नाही याच्यावर वस्तुतः आणखी काही पिढया या राज्याच्या यशापयशाची परीक्षा होणार आहे, आणि म्हणून त्याच एका दृष्टीने या प्रश्नाकडे पाहण्याचा प्रयत्‍न मी करीत आहे. आमच्या सद्हेतूविषयी त्या भागातील लोकांच्या मनात कोठल्याही शंकेला थारा राहू नये या दृष्टीने आम्ही या बाबतीत प्रयत्न करीत आहोत.

महाराष्ट्राचे एकजिनसी एकराज्य निर्माण करण्याकरिता आम्हाला महाराष्ट्रातील सर्व लोकांचे भावनात्मक ऐक्य साधावयाचे आहे. अर्थात् ही भावनात्मक एकीकरणाची किंवा ऐक्याची भाषा जेव्हा मी बोलतो तेव्हा आम्हाला मेंटल रेजिमेंटेशन करावयाचे आहे असा त्याचा अर्थ नाही. कारण प्रत्येकाला आपापल्या स्थानिक भूमीबद्दल जवळीक किंवा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. मघाशी कोणा एका अधिकार्‍याची अकोल्याहून इकडे बदली झाली तेव्हा त्याला काय वाटले याचा उल्लेख करण्यात आला. परंतु काही वर्षांपूर्वी कोकणचा अभिमान बाळगणार्‍या कोकणातील एखाद्या माणसाची पुण्याहून मंडणगड, दापोली, वेंगुर्ले आदि अगदी कोकणातीलच एखाद्या ठिकाणी बदली केली तर त्यालासुध्दा असेच वाटत होते की, आणि तोदेखील हेच म्हणत होता. म्हणजे याचीदेखील कोकणात जाण्याची इच्छा नसे. नोकरीतील बदल्या आणि त्या निमित्ताने निर्माण होणारे प्रश्न हे कौटुंबिक प्रश्न आहेत. त्यात मूलभूत भावनांचा किंवा तत्त्वाचा प्रश्न येत नाही. मुलांचे शिक्षण, मुलीला योग्य स्थळ मिळेल की नाही, म्हातारपणी आपली प्रकृती बरोबर राहील की नाही, सरकारची नोकरी इतकी वर्षे केल्यानंतर पेन्शन भोगावयाला मिळेल की नाही इत्यादी गोष्टींचा विचार नोकरी करताना सरकारी नोकर करीत असतो, आणि ते मनुष्य स्वभावाला धरून आहे. त्याबद्दल मला कोणाला दोष द्यावयाचा नाही. परंतु मला जे सांगावयाचे आहे ते हे की, भावनात्मक ऐक्य झाल्यानंतरसुध्दा बदली झाल्यानंतर नाराजी उत्पन्न होणार नाही ही खोटी गोष्ट आहे. फार कशाला, स्वतंत्र विदर्भाचे राज्य झाले असते तरीदेखील नागपूरच्या माणसाची चांदा जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याच्या एखाद्या कोपर्‍यात जर बदली झाली तर त्यालादेखील काय वाटेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्या मनातदेखील नाराजी उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा बदल्यांचा प्रश्न किंवा नोकरीतील इतर गैरसोयी या छोटया छोटया गोष्टी आहेत. त्यावरून राज्याच्या मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांचा निर्णय करणे चुकीचे आहे. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला आपापल्या भूमीचा आणि तत्संबंधित गोष्टींचा अभिमान वाटणे साहजिक आहे.