३६
राज्य विधान सभेचे एक अधिवेशन दर वर्षी नागपूरला भरविण्यासंबंधीचा प्रस्ताव* (१२ ऑगस्ट १९६०)
-----------------------------------------------------------------
नागपूर कराराच्या परिपूर्ततेसाठी, नागपूर येथे दरवर्षी एक अधिवेशन भरवावे या प्रस्तावावर भाष्य करताना मा. श्री. यशवन्तराव चव्हाण म्हणाले की हा ठराव म्हणजे भावनात्मक ऐक्य साधण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे.
--------------------------------------------------------------------------
*M.L.C. Debates. Vol. I, Part II, 12th August 1960, pp. 556 to 564.
अध्यक्ष महोदया, नागपूरच्या कराराप्रमाणे तेथील जनतेला जी आश्वासने दिलेली होती त्यांची परिपूर्तता करण्यासाठी हा प्रस्ताव ह्या सभागृहापुढे मांडलेला आहे, आणि त्याच्या संबंधाने जी अनुकूल आणि प्रतिकूल अशी चर्चा झाली ती चर्चा मनोरंजक आणि एकमेकांचे दृष्टिकोन समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्तही झाली.
अध्यक्ष महोदया, ह्या प्रश्नाच्या अनुरोधाने दोन तीन महत्वाच्या समस्या आहेत त्यांच्या मागचा मूलभूत दृष्टिकोन समजावून घेतला पाहिजे. नागपूरच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर ह्या कराराचा जो हा भाग आहे त्याला महाराष्ट्रातील सर्व विभागातील लोकांनी मान्यता दिलेली आहे. ह्या बाबतीत मला एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे. नागपूर अॅग्रिमेंट हा जो शब्द आहे तो केवळ नागपूरच्या प्रश्नासंबंधाने नव्हता, तर महाराष्ट्रातील एकीकरणासंबंधाने जे महत्वाचे प्रश्न निर्माण होत होते त्या सर्व प्रश्नांना उद्देशून तेथे विचार केलेला होता. ह्या करारामध्ये नागपूरसंबंधाने जो भाग होता तो ऐतिहासिक महत्त्वाच्या बाबतीत होता. याच्या पाठीमागे अॅपीजमेंट करण्याचा हेतू नव्हता. विदर्भाला काही सवलती देऊन आणि त्यांच्या काही विशिष्ट मागण्या मान्य करून त्यांना आम्ही बनवीत आहोत असे कोणी समजू नये. ज्याप्रमाणे एखाद्या घरचे दोन भाऊ एकाच घरात एकत्र राहण्यासाठी आसुसलेले असतात आणि ते समाधान मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात, तीच भावना याच्यामागे आहे. पण याच्या पलीकडे जाऊन जास्त काही करून कोणाला तरी जिंकावयाचे आहे अशी भावना याच्यामागे नाही. त्या उद्देशाने ही गोष्ट स्वीकारलेली नाही.
नागपूरच्या अॅग्रीमेंटसंबंधी काही गोष्टींचा खुलासा मी करणार आहे. नागपूरच्या करारावर सह्या करणारांपैकी, हस्ताक्षरे करणारांपैकी, मी एक आहे आणि तेथे जी काही चर्चा झाली ती सर्व माझ्यासमोर आजही येत आहे. तेथे चर्चेसाठी बसणारी जी माणसे होती त्यात मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्र या विभागातील चांगली व्यासंगी माणसे होती. तेव्हा तेथे गेल्याबरोबर कोणतीही गोष्ट एकदम मान्य केली असे नाही, तर अनुकूल आणि प्रतिकूल अशा अनेक प्रश्नांची चर्चा कित्येक तासपर्यंत झाली.
राजधानीसंबंधाने हा करार काय म्हणतो याबद्दलचे मी माझे इंटरप्रिटेशन सभागृहाला सांगू इच्छितो. एका बाबतीत माझा आग्रह होता आणि त्या बाबतीत कसलेही कॉम्प्रॉमाइझ करू नये असे माझे ठाम मत होते. ती गोष्ट अशी की, आम्ही ह्या सगळया लोकांचे एकराज्य निर्माण करू इच्छितो. ह्या एकराज्याच्या कल्पनेला धक्का बसेल, ह्या एकराज्याच्या कल्पनेचा उपमर्द होईल, किंवा ह्या कल्पनेशी विसंगत होईल अशी कोणतीही गोष्ट स्वीकारली जाणार नाही. अशी विसंगती जर कोठे निर्माण झाली तर ती विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्र ह्या तीन विभागांच्या हिताची होणार नाही. नागपूर करारामध्ये दोन तीन ठिकाणी ही फ्रेज आलेली आहे आणि जेव्हा जेव्हा हे सांगण्याचा प्रश्न आला तेव्हा तेव्हा मी हे स्पष्ट केलेले आहे. त्यातील कलम ४असे आहे:
“Subject to the repuirments of a single Government”