भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-११

अध्यक्ष महाराज, आज प्रश्न आहे तो विदर्भाच्या भावनासंबंधीचा आहे. कायदेशीर तरतुदींचा जो प्रश्न आहे तो वेगळा आहे. त्यात आता जाण्याचे मला कारण नाही. त्यासंबंधात ज्यावेळी कायदा आणू त्यावेळी विचार करू. नागपूरला अधिवेशनासाठी आपण जाणारच आहोत. माझे सन्माननीय मित्र श्री. आवोडे यांनी सांगितले की, तुम्ही नागपूरला आला तर आम्ही तुमचे स्वागत करणार नाही. मला असे म्हणावयाचे आहे की, माणूस आपल्या घरातून दुस-याच्या घरात गेला तर तो स्वागताची अपेक्षा करतो. परंतु आम्ही आपल्याच घरी, आपल्याच माणसाच्या घरी जात आहोत, तेव्हा आम्ही स्वागताची अपेक्षाच करीत नाही. माझे सन्माननीय मित्र श्री. आवोडे मुंबईला येतात तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही स्टेशनवर हारतुरे घेऊन जात नाही. कारण ते स्वतःच्या घरीच येत असतात. स्वतःच्या घरी जाणा-याचे स्वागत कसले करावयाचे? तसेच आम्ही नागपूरला जाणार म्हणजे आपल्याच घरी, आमच्याच लोकांमध्ये जाणार, त्यासाठी स्वागत कशाला पाहिजे? हा, आमच्या जाण्यामुळे त्यांच्या मनाला प्रसन्नता राहणार नाही असे ते म्हणाले तर ते मी मान्य करीन. परंतु ती प्रसन्नता निर्माण कशी करावी याबद्दलचे आमचे प्रयत्‍न आहेत. हे प्रयत्न् सफल होतील अशी मला आशा आहे.

जी गोष्ट लवकर घडेल असे वाटले नव्हते ती अनपेक्षितपणे लवकर घडून महाराष्ट्र राज्य निर्माण झाले आहे. तसेच याही बाबतीत आमचे प्रयत्‍न कधीतरी सफल होतील असा मला विश्वास आहे. मी थोडासा अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवणारा आहे. महाराष्ट्राचे स्वप्न साकार होण्याच्या मागे जनतेच्या मेहनतीचा भाग आहे आणि आमच्या राष्ट्रीय नेत्यांचे आशीर्वादही आहेत. परंतु जनतेच्या प्रयत्‍नामागे कोठली तरी अदृश्य शक्ती आहे असे मी मानतो. ही शक्ती महाराष्ट्राच्या याच भागात आहे आणि विदर्भात नाही असे मी समजत नाही. नागपुरमधील काही लोकांचा आमच्यावर राग आहे. त्यांच्या भावना तीव्र आहेत याची कल्पना मला आहे. परंतु त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांमधून आमच्याबद्दल सद्‍भाव आणि महाराष्ट्र राज्याबद्दलच्या श्रध्देची भावनाही मी अनुभवली आहे. अध्यक्ष महाराज, राग आणि प्रेम यामधून कोणती गोष्ट टिकणारी आहे ? संशय आणि विश्वास यातून शेवटी कोणती गोष्ट टिकणारी आहे ? राग आलेला माणूस थोडा वेळ रागावतो, परंतु रागावतो, रागावतो म्हणजे किती वेळ ? पाच मिनिटे रागावेल, दहा मिनिटे रागावेल, अर्धा तास रागावेल, अगदी दुर्वासासारखा कोपिष्ट असेल तर तासभर रागावेल. परंतु तासानंतर  रागावलेला माणूस जेवढे प्रेम करतो तेवढे दुसरा कोणीही करू शकत नाही हेही मला चांगले माहीत आहे. संशयाचे आणि विश्वासाचेही असेच आहे. मानवी मूल्ये ही विश्वासाची आहेत, बंधुभावाची आहेत. या विश्वासावर, या प्रेमावर आणि या बंधुभावावर आधार ठेऊन मी आशा करतो की आज ज्यांच्या मनात राग आहे, संशय आहे, त्यांचा तो राग आणि संशय लवकरच नष्ट होईल आणि या मराठी राज्याचे समान भागीदार या नात्याने काम करण्यास आमच्या या रागावलेल्या मंडळींना आम्ही तयार करू. त्यांचे प्रेम आणि सहकार्य आम्हाला या राज्यापुरते लाभेल असे नाही तर भारत वर्षाच्या क्षेत्रातही लाभेल याबद्दल मला शंका नाही.

या दृष्टीने विचार करता, मी सभागृहापुढे मांडलेला ठराव हे भावनात्मक ऐक्य साधण्याच्या दिशेने व्यवहारबुध्दीने टाकलेले पहिले पाऊल आहे, सभागृहाने त्याला आपले बहुमोल आशीर्वाद द्यावेत अशी माझी विनंती आहे.
-----------------------------------------------------------------------------
Replying to the debate on the issue of holding of one Session of State Legislature every year at Nagpur Shri Chavan explained that opposition Member Shri Vyas's idea of "decentralisation" was against the basic idea of a "Single State" and as such could not be accepted. As regards the period of the Session of the Legislature at Nagpur, Shri Chavan made it clear that although it would not be feasible to fix a specific limit for the purpose, the Government would ordinarily be camping at Nagpur for about three months at the time of the Session there. Shri Chavan pointed out that the demand for the inclusion of Marathwada in the jurisdiction of the Nagpur Bench of the Bombay High Court was not justifiable. He told the House that Marathwada people had also wished to have a separate Bench of the Bombay High Court at Aurangabad. However, they had willingly given up their demand taking into consideration the general welfare of the whole State of Maharashtra. Shri Chavan concluded his speech by saying that the resolution placed before the House was a first practical step towards the achievement of emotional integration. Shri B. S. Vyas thereupon withdrew his amendment.