भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-१२

३७

तिसर्‍या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टीकोनासंबंधी चर्चा* (२४ ऑगस्ट १९६०)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ह्या चर्चेत भाग घेताना मा. श्री. चव्हाण म्हणाले की एका महत्त्वाच्या ध्येयवादी योजनेची जबाबदारी आपण अंगावर घेत आहोत व त्यातून आपण यशस्वी रीतीने बाहेर पडू असे मला वाटते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*M.L.C. Debates, Vol. I, Part II, July-August 1960, pp. 745 to 753, 835 to 841.

अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र राज्याच्या तिसर्‍या पंचवार्षिक योजनेसंबंधाने या शासनाचा कोणत्या प्रकारचा दृष्टीकोन आहे याचे प्राथमिक स्वरूपाचे दिग्दर्शन मी सभागृहापुढे ठेवण्याचा प्रयत्‍न करणार आहे. तिसर्‍या पंचवार्षिक योजनेत करावयाच्या प्रयत्‍नांचे निश्चित स्वरूप स्पष्ट होण्यासाठी गेले काही महिने प्रयत्‍न चालले होते व यासाठी हुकमी आराखडा किंवा तर्जुमा तयार करण्यासाठी संयुक्त मुंबई राज्यात आणि नवजात महाराष्ट्र राज्यात सखोल विचार झालेला आहे. ही तयारी करण्याच्या दृष्टीने वेगवेगळया रीतीने अभ्यास करण्यासाठी अभ्यास मंडळे नियुक्त झाली होती आणि ह्या मंडळांनी आपला अहवाल सरकारकडे सादर केलेला आहे. अध्यक्ष महाराज, त्यांनी दिलेल्या माहितीचा सारांश ''अप्रोच टु दि थर्ड फाइव्ह इयर प्लॅन ऑफ दि महाराष्ट्र स्टेट'' ह्या पुस्तिकेतून सभासदांना दिलेला आहे परंतु अजूनही ह्या पुस्तिकेचा अहवालामध्ये निर्देश केलेल्या काही बाबींचा खुलासा करावा लागतो. त्यांनी जे आकडे दाखविले आहेत ते आकडे त्यांनी ज्या दृष्टिकोनातून अभ्यास केला त्याचे दिग्दर्शक आहेत. ही पुस्तिका सभागृहापुढे मांडलेली आहे आणि ह्या योजनेकडे पाहण्याची शासनाची भूमिका मी व्यक्त केली आहे. एका विशिष्ट दृष्टिकोनातून हे कार्यक्रम घेण्याची आवश्यकता होती व त्याप्रमाणे हे चित्र सभागृहापुढे मांडण्यात आले आहे. अभ्यास मंडळानी त्याचे स्वरूप रुपये, आणे, पै मध्ये व्यक्त केले आहे व ते येथे दिलेले आहे. परंतु अजूनही राष्ट्रीय योजनेचे तपशीलवार स्वरूप दृश्य झाल्याशिवाय ह्या राज्याचा जो अक्षरशः तिसरा प्लॅन होणार आहे त्याचा तपशीलवार आराखडा, त्यातील नियोजनाचा कार्यक्रम ठरविताना अनेक पेच निर्माण होतात. पहिला पेच असा की, योजना म्हटली की लोकांच्या ज्या गरजा आणि अपेक्षा आहेत त्या सर्व गरजा आणि अपेक्षा पुर्‍या करून देणारा कार्यक्रम म्हणजे योजना अशी सर्वसामान्य लोकांची समजूत असते. अर्थात लोकांची योजनेसंबंधी ही जी समजूत आहे ती एका अर्थाने बरोबर आहे. खेडोपाडी शाळा, विहिरी, रस्ते किंबहुना समाजाने सुखी राहण्याकरिता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल त्या त्या मिळाव्यात अशी लोकांची जी अपेक्षा असते ती पुरी झाली की योजना झाली असे सर्वसामान्यपणे मानण्यात येते.

माझ्या दृष्टीने ह्या सर्व गोष्टी आणि त्यांना अनुलक्षून असणार्‍या अपेक्षा ह्या परिणाम स्वरूपाच्या गोष्टी असून समाजाला सर्व सुखसोयी आणि साधने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक अशी आर्थिक शक्ती निर्माण करणे हे योजनेचे महत्त्वाचे अंग आहे. याच्या अनुषंगाने पहिला पेच उभा राहतो तो असा की, कोणत्या गोष्टीला जास्त महत्व देण्यात यावे ? योजनेच्या भूमिकेत प्रोग्रॅम ऑफ सोशल सर्व्हिसेस, प्रोग्रॅम ऑफ इकॉनॉमिक ओव्हरहेड्स आणि प्रोग्रॅम ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अशा प्रकारच्या तीन कॅटेगरीज देण्यात आल्या आहेत. अग्रहक्क देण्याच्या संदर्भात विचार केला तर मला असे म्हणावयाचे आहे की, ह्या गोष्टींची उलटया क्रमाने मांडणी व्हावयास हवी होती. ह्या गोष्टींच्या संबंधांतच खरा पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. तृतीय पंचवार्षिक योजनेसंबंधीच्या भूमिकेत ह्या ज्या तीन गोष्टी निर्दिष्ट करण्यात आल्या आहेत त्या सर्वच महत्त्वाच्या असल्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला आहे. खेडयापाडयात प्राथमिक शिक्षण, हॉस्पिटल्सची व्यवस्था इत्यादी गोष्टी नको असे कोणी म्हणणार नाही. लोकांना ह्या सर्व साधनांची गरज आहे. परंतु ज्या अर्थी आपण सर्व राज्याच्या प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी बसलो आहोत त्या अर्थी निश्चित प्रकारची मर्यादित अशी जी साधने आहेत त्यांच्या उपयुक्ततेच्या दृष्टीने कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे असा प्रश्न निर्माण होतो. इकॉनॉमिक ओव्हरहेड्स या शब्दप्रयोगाचा जो अर्थ आहे तो लक्षात घ्यावयास हवा. आर्थिक विकासाच्या कार्यक्रमाला आवश्यक आणि साधनभूत असणार्‍या ज्या गोष्टी आहेत त्यांना इकॉनॉमिक ओव्हरहेड्स म्हणतात. औद्योगिक प्रगती आणि शेतीचा विकास हा आर्थिक विकासाचा प्रत्यक्ष कार्यक्रम मानला तर शेतीच्या विकासाला उपयोगी पडणार्‍या विजेच्या उत्पादनालाही तितकेच महत्व आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळया तर्‍हेच्या यंत्र स्वरूपाच्या उद्योगधंद्यांची वाढ करण्याकरिता आवश्यक असणारे तंत्रज्ञ उपलब्ध करून देणे ह्या कामाचाही इकॉनॉमिक ओव्हरहेड्समध्ये अंतर्भाव होतो.