आम्हाला कोणाची प्रेते पाडावयाची नव्हती व प्रेते पाडण्याची आमची इच्छा नाही. माझा हे सर्व सांगण्याचा हेतू इतकाच की, अशा घोषणांना सुरवात झाल्यानंतर, वादाचे वातावरण निर्माण झाले. अर्थात् समितीच्या काही प्रमुख मंडळींनी हे वातावरण व परिस्थिती मोठया संयमाने हाताळण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. कारण जी गोष्ट योग्य आहे ती तशी मानून तिची दखल घेतली पाहिजे. अध्यक्ष महाराज, ह्या सर्व प्रश्नाच्या बाबतीत जातीयवादी प्रचाराचा थोडासा अंश निर्माण झाला ही गोष्ट खरी आहे. (Interruption) सन्माननीय सभासद श्री. व्ही.एन्. पाटील१६ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) ह्यांना मला असे सांगावयाचे आहे की, आज १९५७ साली ज्यांनी राजकारणाची काही तत्त्वे स्वीकारली आहेत त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती अशी की, जातीयवादाविरुद्ध भाषणे करून व सभागृहामध्ये जातीयवादाविरुद्ध राग व्यक्त करून जातीयवाद जाणार नाही. जातीयवादाचे विष हिंदुस्थान देशाच्या सर्व वातावरणामध्ये भिनले आहे. ते विष काढून टाकण्याच्या दृष्टीने आपण स्वतः किती जातीयवादी आहोत असा प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात विचार करून आत्मपरीक्षण केले पाहिजे व जातीयवाद नाहीसा करण्यासाठी प्रयत्न करावयास पाहिजे.
समितीच्या लोकांना शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे ही गोष्ट मला मान्य आहे, परंतु ह्या सद्हेतूबरोबर त्यांनी निषेधाची वृत्ती धारण केल्यामुळे काही लोकांच्या मनात जे विचार आले ते मी सभागृहापुढे ठेवू इच्छितो. सतत ३०० वर्षे लोटल्यानंतरही ज्या थोर पुरूषाला जनतेने आपल्या अंतःकरणाच्या सिंहासनावर जागा दिली, त्या महात्म्याच्या स्मारकाला मानाचा मुजरा करण्यासाठी व स्मारक सत्कारार्थ हिंदुस्थानातील ३०-४० कोटी जनतेचे मुकुटमणी, भारताचे प्रतिनिधी पंडित नेहरू, ज्यावेळी येतात त्यावेळी त्यांचा निषेध करून अडथळे आणण्याची जी गोष्ट आहे ती चांगली नाही असे सर्वसामान्य माणसाला वाटले तर त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. हिंदुस्थानातील जातीयवादाचे राजकारण नाहीसे करावयाचे झाले तर जातीयवादी विचारसरणी व भावना निर्माण होणार नाही ह्या दृष्टीने केवळ काँग्रेस पक्षानेच नव्हे तर सर्व पक्षातील लोकांनी आपली पावले टाकली पाहिजेत. समितीच्या लोकांमध्ये द्विभाषिकाबद्दल जर खरोखरी राग होता तर लोकमान्य टिळकांच्या स्मारकाच्या वेळी पंडित नेहरूंविरुद्ध निदर्शने व निषेध केला गेला नाही, आणि ती निदर्शने व तो निषेध आताच करण्यात आला, असा भेदभाव का, असा विचार काही लोकांच्या मनामध्ये आला होता.
अध्यक्ष महाराज, अशा तर्हेचे विचार लोकांच्या मनामध्ये येणे चुकीची गोष्ट आहे. त्या दृष्टीने जे वातावरण निर्माण झाले ते टाळण्याची जबाबदारी सर्वांवर होती. जातीयवाद वाईट आहे अशी नुसती घोषणा करून तो कमी होत नाही. तो कमी होण्याच्या दृष्टीने पावलोपावली तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.
ह्या प्रश्नाची इतकी पार्श्वभूमी सांगितल्यावर, मी सभागृहाच्या निदर्शनास असे आणू इच्छितो की, लोकांची एक छावणी वाईला व दुसरी छावणी पोलादपूरला पडणार आहे असे समितीच्या नेत्यांनी जाहीर केले. छावणी असा शब्दप्रयोग केल्यामुळे एक प्रकारचे युध्दाचे वातावरण निर्माण झाले. छावण्या पडणार आहेत ह्या शब्दांमध्ये एक विशिष्ट अर्थ अभिप्रेत आहे.
कॅम्पस् सुरू होणार अशा बातम्या पसरल्यानंतर, स्वाभाविकपणे, शांतता प्रस्थापित करण्याची माझ्यावर जिम्मेदारी होती. त्याचबरोबर निदर्शने करण्यास जे लोक जमले होते त्यांनाही योग्य ती संधी मिळाली पाहिजे असाही आमचा हेतू होता. अध्यक्ष महाराज, निदर्शने करू इच्छिणार्या लोकांना प्रतापगडाजवळ थांबा असे सांगितले तर ते थांबतील असा आमचा अंदाज होता व आपल्याला थांबवावे असे त्यांच्याही मनामध्ये असावे असे मला वाटत होते. आमचा अंदाज आमच्या सुदैवाने म्हणा अथवा त्यांच्या सुदैवाने म्हणा, खरा ठरला. अखेर ३६ व्या कलमान्वये त्यांना थांबविले गेले.