भाग १ विधानसभेतील भाषणे-३३

पाटलाच्या संबंधी जे सांगण्यात आले ते ऐकून मला खरोखर शरम वाटते. तो एका विशिष्ट जमातीतील आहे आणि आपल्या ग्रामीण जीवनाचा एक घटक आहे. या प्रश्नाची चर्चा या सभागृहातील आपण सगळेच लोक सभागृहाच्या बाहेर एकत्र बसून जर करू शकलो तर मला असे वाटते की, ती आपण अधिक मोकळेपणाने करू शकू. कोणत्याही तर्‍हेचा आडपडदा न ठेवता अगदी मोकळया मनाने या प्रश्नाची चर्चा या सभागृहाबाहेर करण्याची माझ्या मनाची तयारी आहे. कारण हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वांच्याच जिव्हाळयाचा असा प्रश्न आहे. आपल्या ग्रामीण जीवनामध्ये जे जुनाट आचारविचार पूर्वीपासून चालत आले आहेत त्यांचा अंश अद्याप तेथे शिल्लक आहे. आज आम्ही विसाव्या शतकात राहात असलो आणि तोंडाने लोकशाहीच्या, न्यायाच्या आणि समतेच्या गोष्टी करीत असलो तरी प्रत्यक्ष आमच्या वागण्यामध्ये अनेक जुनाट चालीरीती, रूढी आणि परंपरा यांना अद्याप स्थान आहे. काही जातींना आपल्या जातीबद्दल इतका काही अभिमान, इतका काही अहंकार वाटतो की, त्यांच्या त्या अभिमानाला किंवा अहंकाराला थोडासा जरी धक्का लागला तरी एकदम भडका उडतो असा सगळयांचा अनुभव आहे. ही परिस्थिती नाहीशी करावयाची असेल तर सर्वांनी मिळून पक्षनिरपेक्ष भूमिकेवरून, पक्षमर्यादेच्या पलीकडे जाऊन या एकंदर प्रश्नाचा विचार केला पाहिजे, यासंबंधी माझ्या मनात बिलकुल शंका नाही आणि म्हणून तो करण्याची माझी मनःपूर्वक तयारी आहे.

या पाटलाच्या विरुद्ध जे काही कायदेशीर इलाज करणे आवश्यक असेल ते केले जातील आणि जे इलाज केले जातील ते या सभागृहाच्या निदर्शनास आणले जातील.

एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाकडे पक्षनिष्ठेच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन या सभागृहाचे, सर्व समाजाचे, तुम्हा आम्हा सगळयांचे लक्ष वेधावे आणि झालेल्या एकंदर प्रकारामुळे हरिजन समाजाला ज्या यातना झाल्या त्यांची जाणीव तुम्हा आम्हा सर्वांना करून द्यावी हा जर ही तहकुबीची सूचना आणण्याच्या पाठीमागे श्री. जोशी यांचा उद्देश असेल तर तो सफल झाला आहे असे मला वाटते. तसेच, त्यांनी ही सूचना मांडताना ज्या काही व्यावहारिक सूचना केल्या त्या मी मान्य केल्या आहेत. तेव्हा आपली तहकुबीची सूचना त्यांनी परत घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. कारण ती मांडण्यात त्यांचा जो काही हेतू होता तो साध्य झाला आहे. ही सूचना नापास करावी अशी माझी इच्छा नाही. कारण तिच्या पाठीमागील भावनेशी मी संपूर्णतः सहमत आहे. पण ती मी पासही करू शकत नाही. कारण ती पास झाल्यास ती या सरकारविरुद्ध निंदाव्यंजक ठराव होईल. म्हणून मी त्या सूचनेला मान्यता देऊ शकत नाही. ज्या भावनेने त्यांनी हा प्रश्न सभागृहासमोर उभा केला त्या भावनेला मी प्रतिसाद देऊ इच्छितो आणि म्हणून त्यांनी ही सूचना परत घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे.
--------------------------------------------------------------------------------
Speaking on the Adjournment Motion brought by Shri S.M.Joshi, Shri Y. B. Chavan, Chief Minister, said that he shared the feelings of Shri Joshi in respect of the atrocities on Harijans. He further said that he had asked the concerned officers to organise all-party meetings to create a healthy atmosphere. He also assured the House that such cases would not be dealt with from the party point of view only. He said that such problems would be solved after frank discussions with the Opposition parties. Appreciating Shri Joshi’s suggestion, he stressed the need to use words carefully because they were more powerful and disastrous than weapons, and so, even while expressing differences of opinion one should use them with restraint. He remarked that all the three suggestions made by Shri Joshi were very valuable and he accepted them wholeheartedly. According to the first, the senior police officers would investigate the cases of atrocities on Harijans. According to the second, the wife of the deceased victim would get full protection and according to the third, the patil, who was responsible for the act, would be punished severely.

He also stated that some communities, which had undue casteist notions of superiority and which were standing on false prestige, should not allow their feelings to reach the point of explosion. Finally, he requested Shri Joshi to withdraw his motion.