भाग १ विधानसभेतील भाषणे-३१

सवर्ण हिंदूंकडून मातंग समाजातील लोकांवर झालेल्या हल्ल्यासंबंधी तहकुबी सूचना * (१६ डिसेंबर १९५७)
-------------------------------------------------
मातंग समाजावर सवर्ण हिंदूंकडून झालेल्या हल्ल्यावरील विरोधी पक्षीय सदस्यांच्या तीव्र प्रतिक्रियेबद्दल मा. चव्हाण यांनी सहानुभूती दर्शविली. परंतु हा प्रश्न नाजुक असल्यामुळे तहकुबीची सूचना मागे घ्यावी अशी श्री.एस्.एस्. जोशी यांना विनंती केली.
-------------------------------------------------
*Bombay Legistative Assmbly Debates, Vol, Part II (Inside No. 13) 16th December 1957 pp 753 to 756

अध्यक्ष महाराज, ज्या हकीकतीसंबंधी ही सूचना सन्माननीय सभागृहापुढे आलेली आहे तो सर्वच प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यातील वस्तुस्थितीचा जो तपशील आहे तो सभागृहापुढे ठेवणे अडचणीचे झाले आहे आणि म्हणून सभागृहापुढे जेव्हा चर्चेसाठी हा प्रश्न आला त्या वेळी मी असे सुचविले होते की, ह्या हकीकतीच्या वस्तुस्थितीबाबत थोडासा संयम ठेवून चर्चा केली तर बरे होईल. मला सांगावयास आनंद वाटतो की ही सूचना ह्या प्रश्नावर चर्चा करताना जे सन्माननीय सभासद बोलले त्यांनी बव्हंशाने पाळलेली आहे. ही चर्चा विशिष्ट हकीकतीवर मर्यादित न होता या हकीकतीतून जो एक सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे त्या सामाजिक प्रश्नाकडे या सन्माननीय सभागृहाचे, सर्व पक्षांचे आणि सर्व जनतेचे लक्ष वेधले जावे हा जो मूळ हेतू ही सूचना आणण्याच्या पाठीमागे होता तो पूर्णांशाने सफल झालेला आहे. मी प्रथम असे सांगू इच्छितो की, सभागृहातील विरोधी पक्षाचे नेते सन्माननीय सभासद श्री. एस्.एम्.जोशी यांचा मूळ सूचना आणण्यामागे राजकीय हेतू होता असे मी म्हणत नाही किंवा तसे मी मानलेले नाही. त्यांचा हेतू विशाल होता आणि त्यांच्या भावनेशी मी संपूर्णपणे सहमत आहे. पण ही अँडजर्नमेंट मोशन पास करणे म्हणजे सरकारवर अविश्वास दाखविल्यासारखे होत असल्यामुळे मला ती मान्य नाही.

आपल्या हिंदुस्तानमध्ये एका विशिष्ट समाजावर हजारो वर्षे सामाजिक अन्याय होत राहिला आहे आणि त्या सामाजिक अन्यायाचे परिणाम आपल्या जीवनामध्ये खोल रुजले आहेत. त्यांचे अशा रीतीने वारंवार दर्शन घडले की, मन दिङमूढ होते. ह्या प्रश्नासंबंधी सन्माननीय सभासद श्री. मोरे यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यांच्याशी मी बव्हंशाने सहमत आहे असे सांगू इच्छितो. आजपर्यंत ज्यांना आम्ही अस्पृश्य म्हणून मानले त्यांच्यावर होणारे सामाजिक अन्याय दूर करणे आपले कर्तव्य आहे ही गोष्ट देशातील सर्वोत्कृष्ट माणसापासून ते सरकारपर्यंत सर्वांनी ती मान्य केलेली आहे. तेव्हा ही जी हकीकत घडली तीबद्दल जनतेचे प्रतिनिधी म्हणून मानल्या गेलेल्या लोकांनी या ठिकाणी जी भावना व्यक्त केली ती भावना मला मंजूर आहे आणि या राज्यातील शासनाचा प्रमुख म्हणून ती जबाबदारी मी स्वतःवर जास्त घेतली पाहिजे ही गोष्टही मला मंजूर आहे.

अध्यक्ष महाराज, या प्रश्नासंबंधाने पोलिसांनी काय करायला पाहिजे होते, त्यांनी काय केले आणि काय केले नाही या तपशिलात शिरून मी त्या भावनेतून बोलू इच्छित नाही. एक गोष्ट निश्चित आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये एक तर्‍हेची तेढीची भावना समाजामध्ये अधूनमधून प्रत्ययाला येऊ लागली आहे आणि एक गंभीर सामाजिक प्रश्न आज आपल्या समोर उभा आहे. हा प्रश्न कोणत्या मार्गाने हाताळावा यासंबंधी काही निश्चित अशा कल्पना बांधणे इष्ट ठरणार नाही. म्हणून या प्रश्नासंबंधी मी आपले मन अगदी मोकळे ठेवले आहे. अध्यक्ष महाराज, मी आपणाला आणि या सभागृहाला सांगू इच्छितो की, विदर्भामध्ये जेव्हा नवबौध्दांसंबंधी काही तक्रारी आणि अडचणी माझ्या कानावर आल्या तेव्हा मी त्या विभागातील अधिकार्‍याना बोलावून सूचना दिल्या होत्या की, हा प्रश्न निव्वळ कायदेशीरपणे वागून सुटेल असे मानणे चुकीचे आहे. या संबंधाने सन्माननीय सभासद श्री.व्ही.डी.देशपांडे१३ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा)  यांनी जे एक वाक्य उच्चारले त्याच्याशी मी सहमत आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, या प्रश्नासंबंधी कायद्याने वागून आपण किती माणसांना शिक्षा करणार ? सर्व थरांमध्ये गेलेला आणि सगळयांच्या मनापर्यंत पोहोचलेला असा हा भेदभाव आहे. म्हणून हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांच्या प्रयत्‍नातून काही मार्ग काढता आला तर तो काढणे आवश्यक आहे. विदर्भामध्ये जेव्हा हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मी अधिकार्‍यांना अशा सूचना दिल्या होत्या की, तंग झालेले वातावरण शांत करण्यासाठी पक्षाचे कोठल्याही तर्‍हेचे नाते मनात न आणता सर्वपक्षीय कमिटया नेमण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न करावा. काही ठिकाणी हा प्रश्न यशस्वी झाला, काही ठिकाणी त्या प्रयत्‍नाला यश आले नाही. अध्यक्ष महाराज, शासनातर्फे आणि माझ्यातर्फे मी सभागृहाला असे निश्चित आश्वासन देऊ इच्छितो की, अस्पृश्य म्हणून मानल्या जाणार्‍या समाजावर कोठेही अन्याय झाला असेल तर तो पक्षाचा प्रश्न केला जाणार नाही, कोठल्याही तर्‍हेच्या पक्षीय भूमिकेवरून त्या प्रश्नाचा विचार केला जाणार नाही. या प्रश्नासंबंधी जितकी जास्तीत जास्त तीव्र उपाययोजना करण्याची आवश्यकता असेल तितकी करण्यासंबंधी विरोधी पक्षाच्या मंडळींशी अत्यंत खुल्या मनाने चर्चा करण्यास मी केव्हाही तयार आहे. कारण त्या प्रश्नाकडे कोठल्याही प्रकारे पक्षीय दृष्टीकोनातून पाहून तो सुटणार नाही यासंबंधी माझ्या मनात बिलकुल संशय नाही.