अध्यक्ष महाराज, शब्दांचा वापर सर्वांनी जपून आणि संयमपूर्वक करण्यासंबंधी श्री. जोशी यांनी जी सूचना केली ती खरोखर विचार करण्यासारखी आहे. आजकालचा जमाना एक प्रकारचा स्फोटक जमाना आहे असे मानावयाला काही हरकत नाही. कोणत्याही एका प्रांतापुरती किंवा राज्यापुरती भूमिका ठेवून मी हे बोलत नाही. आज सबंध देशामध्ये आणि सर्व जगामध्ये अशा तर्हेचे वातावरण आहे की, त्या वातावरणात आपणास पाहिजे त्या दिशेने लोकांची मने विचारवंत किंवा स्वतःला लोकांचे नेते समजणारे लोक तयार करू शकतात. लोकांचे विचार आपणास पाहिजे त्या दिशेने बदलू शकतात. त्यांच्या हातामध्ये शब्द हे फार मोठे परिणामकारक असे साधन आहे. फार मोठे परिणामकारक असे शस्त्र आहे. या शस्त्राचा उपयोग अत्यंत हळुवारपणे आणि काळजीपूर्वक केला गेला तर फार चांगली गोष्ट होणार आहे आणि समाजाचे त्यामुळे फार मोठे कल्याण होणार आहे. म्हणून श्री.एस्.एम्.जोशी यांनी आपल्या भाषणात यासंबंधी अत्यंत तळमळीने जी सूचना केली त्या सूचनेला मी माझ्याकडून अगदी अंतःकरणपूर्वक पाठिंबा देतो आणि यासंबंधी काही सर्वपक्षीय प्रयत्न होणार असेल तर त्याबाबतीत मी माझा हिस्सा जरूर उचलेन असे आश्वासन मी या सभागृहास निःसंकोच मनाने देऊ इच्छितो. मी यासंबंधाने अधिक बोलू इच्छित नाही.
आजच्या स्फोटक वातावरणात शब्दांचा वापर फार काळजीपूर्वक केला पाहिजे याबद्दल माझ्या मनात कोठलाही संशय नाही. शब्द हे एक जबरदस्त शस्त्र आहे. शब्दामध्ये जे सामर्थ्य आहे त्याचे यथायोग्य वर्णन एखादा साहित्यिकच करू शकेल, मी ते करू शकत नाही. शब्दाच्या सामर्थ्याचा उपयोग लोकांच्या जीवनातील मांगल्य वाढविण्याकरिता केला तर असा उपयोग करणार्या व्यक्तीच्या पुढे मी आपले मस्तक नम्र करावयाला क्षणभरही मागेपुढे पाहणार नाही. अर्थात्, जेथे मतभेदाचा प्रश्न असेल तेथे प्रत्येकाने आपला मतभेद मांडला पाहिजे. सगळेच गोड गोड आणि गुळगुळीत शब्द वापरून मतभेद झाकून ठेवावेत असे मी मुळीच म्हणणार नाही, परंतु मतभेद देखील व्यक्त करीत असताना चांगल्या शब्दांचा वापर आपण करू शकतो, ही जी सूचना श्री.एस्.एम्.जोशी यांच्याकडून आली आहे तीमुळे मला अधिक उत्तेजन मिळाल्यासारखे वाटते आणि म्हणून त्यांच्या सूचनेचे मी जाहीरपणे स्वागत करतो आणि त्या सूचनेला अत्यंत मनःपूर्वक पाठिंबा देतो. मी आशा करतो की, ते या सूचनेची अंमलबजावणी या सभागृहात आणि सभागृहाबाहेरही चालू ठेवतील. माझ्या पक्षाकडून याबाबतीत त्यांना संपूर्ण सहकार्य मिळेल आणि माझ्या पक्षातील कोणा व्यक्तीकडून अनुचित शब्दांचा वापर झाला तर त्याचा जाहीरपणे निषेध करण्याची माझ्या मनाची तयारी आहे, ही गोष्ट मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो.
श्री.जोशी यांनी आपल्या भाषणात ज्या तीनचार सूचना केल्या आहेत त्या अतिशय विचार करण्यासारख्या आहेत. त्यांची पहिली सूचना अशी आहे की, अशा तर्हेचा प्रश्न जेथे निर्माण होईल, म्हणजे दलित समाजावर काही अन्याय होत आहे किंवा झाला आहे अशी तक्रार जेथे निर्माण होईल तेथे त्या तक्रारीची चौकशी स्थानिक पोलिस अधिकार्याकरवी न करविता ती चौकशी करण्याकरिता वरिष्ठ पोलिस अधिकार्यानी तेथे गेले पाहिजे. ही जी त्यांची सूचना आहे ती मला मान्य आहे आणि त्या सूचनेची अंमलबजावणी मी करणार आहे म्हणजे अशा ठिकाणी जिल्ह्याचा वरिष्ठ पोलिस अधिकारी चौकशीसाठी जाईल आणि जरूर पडली तर त्याच्याही वरचा अधिकारी तेथे जाईल. यामध्ये त्या तक्रारीचा काय निकाल लागला याच्यापेक्षा त्या प्रश्नाकडे निःपक्षपातीपणे पाहिले गेले आहे आणि निःपक्षपाती भूमिकेवरून त्या तक्रारीची चौकशी झाली आहे असे सर्व लोकांना वाटण्यासारखे वातावरण निर्माण करण्याची जरूरी आहे आणि म्हणून त्यांनी जी सूचना केली ती मला महत्त्वाची वाटते, ती मला मान्य आहे आणि तिची मी अंमलबजावणी करणार आहे.
त्यानंतर त्यांनी बळीची बायको लक्ष्मीबाई हिला संरक्षण देण्याची व्यवस्था करण्यासंबंधी दुसरी सूचना केली. त्यासंबंधी मी आवश्यक ती व्यवस्था करीत आहे. हे एकंदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याकारणाने न्यायाच्या दृष्टीने जो काही पुरावा उपलब्ध होण्यासारखा असेल तो दाबला जाऊ नये किंवा नष्ट केला जाऊ नये अशी सरकारलाही काळजी वाटत आहे. या सर्व दृष्टींनी त्या बाईला आवश्यक ते संरक्षण देण्याची व्यवस्था सरकार करील असे मी या सभागृहाला आश्वासन देतो.