भाग १ विधानसभेतील भाषणे-३९

अध्यक्ष महाराज, नागपूरचा प्रश्न हा तेथील लोकांना भावनेचा प्रश्न वाटतो याची मला जाणीव आहे. परंतु त्या ठिकाणी एक अधिवेशन भरविण्यामुळे तो प्रश्न सुटणार नाही. आपल्याला हे माहीत आहे की, आपली जी सार्वभौम लोकसभा आहे तिची सर्व अधिवेशने दिल्लीसच भरविली जातात. पूर्वी उन्हाळयात अधिवेशन सिमल्यास भरविले जात असे. परंतु त्यावेळी राज्यकर्त्यांच्या चुकीच्या कल्पना होत्या. हवामानाच्या सोईनुसार राजधानी बदलावयाची अशी त्या वेळच्या राज्यकर्त्यांची वृत्ती होती. याच दृष्टीकोनातून मुंबई राज्याचे एक अधिवेशन पुण्यास भरविले जात असे परंतु ती प्रथा आता बंद करण्यात आली आहे. याचा अर्थ पुण्याचे महत्त्व कमी झाले असा होत नाही. अधिवेशन भरविण्याचा आणि शहराच्या महत्त्वाचा फारसा अन्योन्य संबंध नाही.

ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना चांगल्या प्रकारे आपली कामे करता येतील अशा ठिकाणी अधिवेशन भरविले जाते की नाही, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अधिवेशन भरविले जाते त्या ठिकाणी  सरकारी सभासद जनतेच्या प्रतिनिधींना योग्य रीतीने जाब देऊ शकतील की नाही, जनतेची सेवाचाकरी चांगल्या प्रकारे करू शकतील की नाही, हे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरावयाचे हे ठरविण्याचे गमक असले पाहिजे. या दृष्टीकोनातून विचार केला तर एकापेक्षा अधिक ठिकाणी अधिवेशन भरविण्याची कल्पना चुकीची आहे असे आपल्याला आढळून येईल. अध्यक्ष महाराज, नागपूरला आणि राजकोटला विधानसभेचे अधिवेशन घेण्याचे ठरविले तर आपली जी कचेरी आहे ती वर्षातून तीन वेळा फिरवावी लागेल आणि त्यामुळे कचेरीची कार्यक्षमताही कमी होऊ शकेल. विरोधी पक्षाचे माननीय नेते श्री.उद्धवराव२० (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यांनी मला विचारले की, नागपूरसाठी तुम्ही काय करणार आहात? याचे उत्तर मी योग्य वेळी देणार आहे, आता नाही. त्यांचा प्रश्न मात्र योग्य आहे आणि त्याला उत्तर देणेही आवश्यक आहे आणि ते दिलेही जाईल एवढे मी त्यांना सांगतो. परंतु नागपूरला अधिवेशन घेतले नाही तर नागपूरचे महत्त्व कमी होईल अशी भीती त्यांनी बाळगण्याचे कारण नाही. कदाचित् विरोधी पक्षालाही ही कल्पना मान्य होईल, परंतु माझे मित्र श्री. वैराळे२१ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) म्हणतात त्याप्रमाणे नागपूरच्या लोकांच्या भावना जाणणारे आम्ही आहोत आणि त्यांना आम्ही अधिक जवळचे आहोत हे दाखविण्यासाठीच या ठरावाचा उपयोग विरोधी पक्षाला करून घ्यावयाचा असेल तर त्यांनी तसा जरूर करून घ्यावा. माझे काही म्हणणे नाही. परंतु नागपूरला अधिवेशन घेण्यामुळे नागपूरचा प्रश्न सुटणार नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करू चाहतो. नागपूर शहराचे आर्थिक आणि व्यापारविषयक प्रश्न सोडविता आले तर नागपूरचे महत्त्व कोणीही कमी करू शकणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागपूरला भूगोलानेच एक महत्त्वाचे असे स्थान दिले आहे. भारताच्या केंद्रस्थानी ते वसलेले आहे. नागपूर शहराला नैसर्गिक दृष्टया हे जे भौगोलिक महत्त्व प्राप्त झाले आहे ते तर कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, मग ते शहर राजधानी असो वा नसो.

या महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेतल्या आणि नागपूरच्या जनतेला त्या पटविण्याचा प्रयत्न केला तर तेथील जनतेलाही अधिवेशन भरविण्याचे महत्त्व वाटणार नाही. नागपूरचे महत्त्व आम्ही मानतो की नाही हे आम्ही अधिवेशन भरविण्याला मान्यता देतो की नाही यावर निर्भर ठेवून जनतेचा खोटा समज करून देण्यापेक्षा अधिवेशन ही महत्त्वाची गोष्ट नाही, बाकीचे जे प्रश्न मी सांगितले ते महत्त्वाचे आहेत. या विचारसरणीला प्राधान्य देऊन ते प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने स्वतःला आम्ही बांधून घेतले आहे आणि त्या दिशेने आम्ही खटपटही करणार आहोत. अशा परिस्थितीत सभागृहासमोर असलेला ठराव मला स्वीकारता येत नाही असे मी नम्रपणे सांगतो. नागपूरच्या कल्याणाचा हा प्रश्न नाही, कारभाराचा हा प्रश्न नाही आणि कोणाचा अभिमान किंवा भावना दुखविण्याचा हा प्रश्न नाही. नागपूरची राजधानी हलल्यामुळे नागपूरकरांच्या भावना दुखविल्या गेल्या आहेत हे मी जाणतो. परंतु अध्यक्ष महाराज, या ठरावाच्या निमित्ताने मी या सभागृहाला हे सांगू इच्छितो की, शासकीय दृष्टया नागपूरला महत्त्व प्राप्त व्हावे या दृष्टीने भारत सरकारने आपल्या काही कचेर्‍या नागपूरला नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्या कचेर्‍यांकरिता त्यांनी काही जागा मागितल्या असून मुंबई सरकारने त्या जागा त्यांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे आणि हिंदुस्थान सरकारला अधिकृतरीत्या तसे कळविण्यातही आले आहे.