व्याख्यानमाला-१९९५-९६-५८

कोणत्याही मोठ्या व्यक्तीविषयी बोलताना आपल्याकडे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे, किंवा होते, असे म्हणण्याची रीत आहे. यशवंतरावांच्या बाबतीत मात्र असे बोलणे काही औपचारिकच नव्हे. जसे एका चांगल्या हि-याला हिरकणी करताना किती पैलू दिले हे सहजासहजी मोजता येत नाही त्याप्रमाणे यशवंतरावांचे व्यक्तिमत्व होते.

आजच्या सभेत बोलण्यासाठी मी त्यांच्या विषयी आलेली काही लेखी व पुस्तके चाळीत असातना माझ्या नजरेस आले की, निरनिराळ्या व्यक्तींनी आपापल्या परीने त्यांचे पैलू पाहिले व टिपले. त्यांच्या विषयी बोलताना किंवा लिहिताना जे काही म्हटले गेले ते मी आपल्यासमोर मांडतोः

थोर देशभक्त, रसिक मन, धुरंधर मुत्सद्दी, विचारवंत, गुणग्राही, सौजन्यमूर्ती, व्यवहारी राजकारणी, दिलदार मित्र व लोकांच्या प्रेमात गुरफटलेला नेता. समर्थ, समाजवादी, लोकशाहीनिष्ठ, लोकशाहीचे पुरस्कर्ते, थोर चारित्र्यसंपन्न वाचक, ओजस्वी वक्ते, विचरावंत, समृद्ध महाराष्ट्राचे शिल्पकार, सह्याद्रीचा प्रतिभासंपन्न भूमिपुत्र, मराठी मनाचा तुरा वगैरे वगैरे.

हे मी उदाहरण म्हणून दिले आहे. अनेक कित्येक पैलू मांडता येतील. या सर्वातून माझ्या मते एकच बोध घेता येईल, तो म्हणजे यशवंतारावांचे व्यक्तिमत्वच इतके परिपूर्ण होते की कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही परिस्थितीत अशा व्यक्तिमत्वांनी आपली छाप इतिहासात सोडली असती, व हेच यशवंतरावांच्या बाबतीत झाले आहे. सर्वात आश्चर्यजनक म्हणजे या थोर व्यक्तीचा जन्म कोठे झाला व ते तेथून कोणत्या उंच थराला पोहोचले. हे कोडे उलगडण्यासाठी मी काल देवराष्ट्रे गावाला जाऊन आले.

त्यांचा जन्म झाल्यानंतर जवळ जवळ ८० वर्षानंतर मी ते गांव पाहिले. गांव जवळ जवळ होते तसेच असावे असे वाटले. त्यांचा जन्म झाला ते घर बघितले. साहेबांची आठवणीची जागा म्हणून पाहण्यास गेलो. आज घराची आठवण म्हणून काही नाही. एक लाकडाचा दरवाजा फक्त उभा आहे. एका बाजूला एक भिंत आहे. त्याच्याच बाजूला लहानशी अंगणासारखी जागा आहे. एकंदर स्थिती वाईट आहे. ज्या जागेमध्ये एवढा महान मनुष्य जन्म पावला, ती जागा त्यांची आठवण म्हणून, पुढील पिढ्यांना एक आदर्श व स्फूर्तिस्थान व्हावी म्हणून आपण काही करू शकलो नाही याची मनाला थोडीशी कंत वाटली. पी. डी. पाटील आणि त्यांच्या सहका-यांच्या मदतीमुळे एवऋढे सुंदर स्मृतिस्थान निर्माण करू शकलो, पण जेथे त्यांचा जन्म झाला तेथे काही करू शकत नाही का? यशवंतरावांचा ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण दाखवायला आज तेथे जागाच राहिली नाही. काही वर्षांनी तेथे ते दार व ती भिंतही राहणार नाही. आज माझ्याबरोबर शामराव पवार होते. म्हणून ते मला ती जागा दाखवू शकले. उद्याच्या पिढीला कोण व काय दाखविणार? अशी व्यक्ती देवराष्ट्रात जन्माला आली, तेव्हा त्याचे काहीतरी स्मारक तेथे असणे आवश्यक आहे असे मला वाटते.

यशवंतरावांचा पिंड स्वातंत्र्य युद्धात तळपून तयार झाला होता. आपल्या टिळक हायस्कूलातील मिळालेल्या शिक्षणामुळे त्यांचेवर जे संस्कार झाले होते त्यामुळे लोकमान्य टिळकांचे काही गुण यशवंतरावांच्या मनात उतरले होते हे जर मी म्हटले तर चुकीचे होणार नाही असे मला वाटते. टिळकांप्रमामे यशवंतारावांच्या मनातही प्रखर ध्येयवाद, देशप्रेम, देशसेवा, स्वार्थःत्याग व जिद्द या भावना पेरल्या गेल्या होत्या. त्याचबरोबर महात्मा फुले व स्वतःचे बंधू कै. गणपतराव यांचे सामाजिक, आर्थिक विषमता दूर करण्याच्या कार्यामुळे त्यांना एक नवीन दृष्टी मिळाली होती. एम. एन. रॉय व त्यांचे विचार यामुले कोणत्याही राजकीय, सामाजिक अथवा आर्थिक प्रश्नाकडे सूक्ष्म दृष्टीने पाहण्याची व पृथःकरण करण्याची प्रवृत्ती त्यांचे मनात जागृत झाली. ही झाली त्यांच्या मनाची जडणघडण व यामुळेच जेव्हा स्वातंत्र्यानंतर राजकारणामध् व राजकीय सत्तेमध्ये त्यांनी पदार्पण केले, तेव्हा त्यांची आपली स्वतःची व आपल्या मनाची एक दृष्टी स्पष्ट होती. त्यांनी सामाजिक विषमता काय आहे, लहान शेतक-यांचे व मोल-मजुरांचे प्रश्न काय आहेत, ते देवराष्ट्रात पाहिले होते व अनुभवले होते. त्यांच्या मनाची जडणघडण कशी झाली असावी? त्यांच्या सामाजिक विचारांना परिपक्वता कशी आली आली असावी? यांची उत्तरे मला काल देवराष्ट्रात मिळाली.