व्याख्यानमाला-१९९५-९६-६२

दुस-या दिवशी मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी विचारले, “तुम्ही कोठे राहता?” मी म्हटले, “मी इन्स्पेक्शन बंगल्यामध्ये राहतोय.” इन्स्पेक्शन बंगला थोडा दूर होता. ते म्हणाले, “मी जिथे रहातोय तिथे चार-पाच बेडरुमस् आहेत. तू येथेच येऊन रहा.” मी म्हटले, “एक अडचण आहे, तुम्ही यायच्या दोन दिवस अगोदर रुईयांचा हा बंगला जप्त करावा म्हणून मी सरकार हुकूम काढला आहे आणि आता कलेक्टर म्हणून त्याच बंगाल्यामध्ये राहिलो तर ते योग्य होणार नाही.” मी त्यांना सांगितले की, ज्या अटीवर रुईया शेठना बंगलादिला होता, त्या अटी त्यांनी पाळल्या नाहीत म्हणून दोन दिवसांपूर्वी मी माझ्या अधिकारांत जप्तीचा हुकूम काढला होता. पुढील तीन आठवड्यामध्ये त्या हुकूमाविषयी ते एक शब्द बोलले नाहीत. एक सन्मित्र म्हणून रुईया शेठनी त्यांना विश्रांतीसाठी बंगला दिला. ते तिथे त्यांचे पाहुणे म्हणून राहिले. पण यशवंतराव चव्हाण म्हणून. त्यातूनच आपले वैयक्तिक जीवन व शासकीय जीवन यामधील लक्ष्मणरेषा ते किती काटेकोरपणे पाळीत याचा मला धडा मिळाला.

दुसरी गोष्ट आठवण म्हणून सांगतो. कोल्हापूरला फार मोठी व्यापरपेठ होती. १९५७ साली चार करोडचा गुळाचा व्यापार तेते व्हायचा. आता तो व्यापार ४०० करोडचा झाला आहे. त्यावेळी शेतक-यांना योग्य भाव मिळत नसे. त्या संदर्भात यशवंतराव एक दिवस म्हणाले, “येथे मार्केटयार्ड केले पाहीजे.” मी म्हणालो, “मार्केटयार्ड कसे होणार, सर्वांचा विरोध आहे.” ते म्हणाले, “तू प्रयत्न सुरू कर, मी संपूर्ण पाठिंबा देईन. मार्केटयार्ड झालेच पाहिजे.” त्यावेळी मुंबई राज्य होते व मंत्रीमंडळातील अर्धे मंत्री गुजराथी होते. गुळाचा व्यापार होता गुजराथी व्यापा-यांच्या हातात व जवळ जवळ सर्व गूळ गुजराथला जात असे. त्यामुले त्यांचा दबाव फार होता. पुढील सहा महिन्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही अहोरात्र काम करून मार्केटयार्ड तयार केले व ते कार्यान्वित करण्यासाठी शेतक-यांच्या बाजूने शासनास व्यापा-यांविरुद्ध लढा करावा लागला. स्वतः यशवंतरावांनी मंत्रीमंडळातील वजनदार गुजराथी मंत्र्यांना न जुमानता जिल्हा शासनास प्रोत्साहन दिले व मदत केली. एक ऐतिहासिक लढा यशस्वी झाला. आज ते मार्केटयार्ड एक यशसवी यार्ड म्हणून प्रसिद्ध आहे.

लोकशाहीविषयी यशवंतरावांच्या मनाची बैठक आणि वैचारिक भूमिका मी मुद्दामच विस्तारानी मांडली आहे. कारण त्यांच्या पिंडात लोकशाही होती व राज्यकर्ता म्हणून जेव्हा जेव्हा लोकशाहीला धोका निर्माण झाला, तेव्हा यशवंतरावांनी लोकशाहीला परत रुळावर आणण्याचा कसा व काय प्रयत्न केला या विषयी अजूनही संपूर्ण माहिती बाहेर आलेली नाही. त्यांनी त्या विषयी काही लिहिले नाही. ते काही मित्रांशी व सहका-यांशी त्या संबंधी बोलले, परंतु ते सर्व अजून लोकांपर्यंत पोहोचले नाही.

भारत सरकारचा गृहमंत्री म्हणून यशवंतरावांनी कित्येक राज्यामध्ये त्यावेळी उपस्थित झालेले घटनात्मक प्रश्न १९६७ ते १९७० मध्ये हाताळले. तो काळ अत्यंत अस्तिरतेचा होता. जवळ जवळ सहा-सात राज्यांमध्ये काँग्रेस व्यतिरिक्त पक्षांची सरकारे होती. त्या काळात अस्थिरतेमुले ह्या पक्षातून त्या पक्षात आमदार आणि खासदार मनसोक्त प्रवास करत होते, त्याला ‘आयाराम आणि गयाराम’ या शब्दामध्ये यशवंतरावांनी लोकसभेमध्ये वर्णन केले व ते वर्णन भारताच्या इतिहासात् नोंदले गेले. त्याचबरोबर राज्यपाल व मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व भारत सरकार ह्यांच्या संबंधामध्ये ब-याच वेळा कटुता आली होती. त्या समयी अनेक प्रसंगी भारताचे गृहमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणांनी लोकसभेत व राज्यसभेत जी भाषणे केली ती माझ्या मते एक ऐतिहासिक ठेवा आहेत. प्रत्येक कठीण प्रसंगी आपली भूमिका कठोरपणे बजावताना त्यांनी एकच मार्गदर्शक तत्व सर्वांसमोर परत परत मांडले आणि ते दर्शविते त्यांची भारतातील लोकशाहीवर नितांत भक्ति. वेळेअभावी मी विशेष बोलू शकत नाही, पण त्यांची ती भाषणे नुसती वाचण्यासारखी नाही, तर चिंतन करण्यासारखी आहेत व आजही जेव्हा जेव्हा संविधान प्रसंग निर्माण होतात, तेव्हा तेव्हा यशवंतरावांचे विचार, त्यांनी मांडलेली तत्वे व त्यांनी दिलेले मार्गादर्शन शासनकर्त्यांना उपयोगी पडते.