व्याख्यानमाला-१९९५-९६-५६

मी, ते जे बोलतात, तो औपचारिक सभ्यतेचा भाग आहे असे समजून ‘थँक यू’ म्हणून म्हटले. परंतु – यशवंतराव तेथे थांबले नाहीत. ते म्हणाले, “तुमच्यासारख्या एका तरुण अधिका-याच्या शोधात मी आहे. लवकरच मुंबई विभागात तीन-चार नॅशनल एक्स्टेन्शन ब्लॉक्स् सुरू होणार आहेत व माझी इच्छा आहे की तुम्ही कराडला यावे.” मला आता आठवत नाही, परंतु कदाचित त्या वेळेला कराड, सातारा किंवा सांगली विभागात होते. ते पुढे म्हणाले की, “मी या बाबत मुख्यमंत्र्यांसी बोलणार आहे.”

कराड, सातारा, सांगली या भागांविषयी मला काहीच माहिती नव्हती. तसेच नुकताच आय. ए. एस. मध्ये दाखल झाल्यानंतर मी माझ्या कामात गुंतलो होतो. त्यामुले ते काय बोलले, त्यामध्ये विशेष काही आहे, असे मला तरी त्या वेळेला वाटले नाही. त्याच दिवशी दुपारी माझ्या जिल्हाधिका-याने मला बोलावले व म्हणाले, “प्रधान, तुला कराडला नेमून घेण्याबाबत यशवंतरावांनी मोरारजी देसाईंना विचारले, परंतु मी त्यास विरोध केलेला आहे. तुला अजून शासनाविषयी बरेच काही शिकायचे आहे व जो पर्यंत महसुली अधिकारी व मॅजेस्ट्रेट म्हणून शासनाचा अनुभव संपूर्ण होणार नाही तो पर्यंत तू या विभागाच्या बाहेर जाऊ नये असे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.” त्यांनी जे काय सांगितले त्य विषयी मला तरी काही आश्चर्य वाटले नाही. यशवंतरावांची आणि माझी माऊंट अबूला तोंडओळखच झाली होती. तेही परिषदेच्या कामामध्ये गुंतले होते. शेवटच्या दिवशी निरोप घेण्याअगोदर यशवंतरावांनी मला सांगितले की “प्रधान, तुम्हाला कराडला नेमण्याची मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असती, तर मला आनंद झाला असता. पण तुमच्या जिल्हाधिका-याने जे सांगितले ते सुद्धा बरोबर आहे. “निरोप घेता घेता ते म्हणाले, “आपण लवकरच भेटू.”

यशवंतरावांची पहिली भेट, यशवंतरावांची मी कराडला येऊन काम करण्याची इच्छा व त्या भेटीमुळे निर्माण झालेले आमचे संबंध – ज्यांना ऋणानुबंध म्हणावे, तर काय म्हणावे? माझे दुर्दैव की त्या वेळेला कराडला येऊ शकलो नाही व कराड आणि या परिसराच्या जनतेची सेवा करू शकलो नाही.

यशवंतराव म्हणाले होते की, “आपण लवकरच भेटू.” त्यावेळच्या आमच्या संस्काराप्रमाणे, आमच्या प्रशिक्षणात शिकविले की राजकीय नेत्यांशी फार जवळचे संबंध अधिका-यांनी ठेवणे इष्ट नाही. सनदी अधिका-यांचे क्षेत्र व राजकीय नेत्यांचे क्षेत्र अलग ठेवले पाहिजे. मंत्रीगण दोघांमधील दुवा असतात. परंतु एका मर्यादेपर्यंतच सनदी अधिका-यांनी मंत्र्याशी वैयक्तिक संबंध ठेवावेत, असे शिक्षण नुकतेच मिळाले असल्यामुळे यशवंतराव निरोप घेताना जे काही म्हणाले त्यावर मी कही विशेष विश्वास ठेवला नाही.

दोन वर्षांनंतर यशवंतराव द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. माऊंट अबू राजस्थानात गेले असल्यामुळे माझी बदली बनासकांठा जिल्ह्यात पालनपूरला झाली. एके दिवशी तार आली की, तुमची बदली तातडीने पुण्याला अतिरिक्त जिल्हाधिकारी (अँडिशनल कलेक्टर) या पदावर करण्यात आली आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटले. कारण त्या वेळच्या संकेताप्रमाणे गुजराथमधून पश्चिम महाराष्ट्रात बदली होत नसे. लवकरच कळले की यशवंतरावांनीच माझे नाव मुख्य सचिवांना सुचविले. अर्थातच मुख्य सचिवांना व इतरांना आश्चर्य वाटले की, राज्याच्या एका कोप-यात असलेल्या एका तरुण अधिका-याविषय़ी मुख्यमंत्र्यांनी एवढी आस्था का दाखवावी? मलाही थोडासा संकोच वाटला की, - वास्तविक त्यांची माझी तोंडओळखच होती, - त्यांनी एवढी आस्था का दाखवावी? हा नुसताच ऋणानुबंधाचाच भाग नव्हता, तर यशवंतरावांच्या कार्यपद्धतीचा तो भाग होता आणि माझं सुदैव की मोरारजीभाईंनी नाही म्हटलं म्हणून, आपण मुख्य मंत्री होताच यशवंतराव चव्हाणांनी मला आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आणले.