व्याख्यानमाला-१९९५-९६-६१

लोकशाहीवरील त्यांचा विश्वास फक्त निवडणूकीत भाषण करण्यापुरता नव्हता. तसेच लोकांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन एक फक्त व्होट बँक म्हणून नव्हता. हे खरे आहे की ते परत परत आपल्या कार्यकर्त्यांना सल्ला देत की, ‘लोकशाहीत वजाबाकीचा हिशोब चालत नाही, तेथे बेरजेचाच हिशोब असतो.’ पण ही बेरीज फक्त काही मतांसाठी नव्हे, तर लोकांना संघटित करून त्या संघटित शक्तिकडून, त्या संघटनेतून त्यांचा आर्थिक, सामाजिक विकास कसा करता येईल यासाठी ते बेरजेची भाषा बोलत. त्या भाषेमुले ब-याच वेळा त्यांच्याविषयी गैरसमजही पसरविले गेले व काही खरेही होते. कारण राजकारणात काही वेळेला बेरीज करता करता सुप्तपणे वजाबाकीही करावी लागते, हे विसरता कामा नये. पण यशवंतरावांचा खरोखर विश्वास होता ते जनसेवेवर आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे ‘जनसेवा हाच खरा ईश्वरभक्तीचा मार्ग होय.’ असे ते मानीत आणि जनशक्ती निर्माण करणे हा त्यांचा धर्म होता असे मला वाटते. त्यांना दुसरा कोणता धर्म मान्य नव्हता. ते पूजेच्या विरुद्ध होते. म्हणून, ‘प्रीती संगमावर कोणतीही पूजा होता कामा नये, कोणतीही आरती होता कामा नये’, हे त्यांनी कटाक्षाने म्हटले. जनतेची सेवा हा त्यांचा धर्म होता व त्याचे पालन त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केले.

लोकशाही, जनसेवा व ईश्वरभक्ति यांचे परस्परांचे संबंध काय व कसे आहेत, त्याचे गणित त्यांनी आपल्या मनात मांडले होते. लोकशाहीवर त्यांची नितांत श्रद्धा होती. ते नेहमी सांगत, ‘लोकशाही ही वैचारिक जीवनावर अधिष्ठीत आहे. वैचारिक स्वातंत्र्याच्या वातावरणात वावरण्यास एक प्रकारची मानसिक तयारी असावी लागते. माझे तत्व खरे किंवा बरोबर हा आग्रह लोकशाहीशी विसंगत आहे.’

या विचारांमुळे त्यांचेवर बरीच टीका झाली. आपण बोलता एक, पण कित्येक वेळा आपले मन बदलता. त्याला यशवंतरावांचे उत्तर होतेः ‘लोकशाहीमध्ये मन बदलण्याची तयारी केली पाहिजे.’ त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रा निर्मिती. मोठ्या कौशल्याने त्यांनी पंडित नेहरूंचे मन बदलले व महाराष्ट्राची निर्मिती केली. या संदर्भात लक्षात ठेवण्यासारके आहे की, द्विभाषिक राज्य चालविण्यासाठी ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी, ते मोठे राज्य कशा त-हेने यशस्वी करावयाचे या भावनेने मुख्यमंत्रीपद स्वीकारले. पण त्याचवेळी लोकांना काय पाहिजे आणि लोकशाहीमध्ये राज्यकर्त्यांचे मन कसे बदलता आले पाहिजे हे त्यांनी दाखविले. नेहरूंचे मन वळविताना लोकशाही ज्या तत्वावर आधारित असते त्यांचा त्यांनी आदर केला.

लोकशाहीविषयी ते म्हणतात, “लोकशाही म्हणजे दोन पक्ष, दोन पार्ट्या असा त्याचा अर्थ नाही. नवी बुद्धी, नवे विचार व त्यामागे लोकशाही उभी करणे हा लोकशाहीचा अर्थ आहे. “पुन्हा पुन्हा लोकांना सभेमध्ये सांगत, ‘ज्ञान-विज्ञानाच्या बुद्धिचा वारसा प्राप्त झालेला माणूस निर्माण करणे हीच खरी लोकशाही.’ लोकशाही वाढवायची असेल, तर त्याची सुरुवात ज्ञान व विज्ञानाच्या बुद्धीच्या वाढीने झाली पाहिजे. हा एक मूलभूत विचार त्यांनी मंत्र म्हणून वापरला. मला वाटते की, लोकशाही आणि लोकशाहीवर श्रद्धात्मक त्यांनी जे विचार मांडले आहेत, त्या विचारांची बैठक कशी बसली आणि कसे परिवर्तन होत गेले, त्याच्य विषयी संशोधन करण्याची आवश्यकता आहे. तसेच लोकशाहीत राज्यकर्ते व नोकरशाहीचे संबंध कसे असावेत या विषयी ते काही संकेत पाळत. या विषयी माझे एक-दोन अनुभव आपणास सांगतो.

मी १९५७ च्या आक्टोबरमध्ये कोल्हापूरला कलेक्टर म्हणून गेलो. १९५८ च्या सुरुवातीला यशवंतरावांचे गॅल ब्लॅडरचे (Gall bladder) ऑपरेशन झाले. ऑपरेशन झाल्यानंतर कोठेतरी चांगल्या निवांत स्थळी तीन आठवडे जाण्याचे त्यांनी ठरविले. त्याच वेळेला पन्हाळा गडावर एक थंड हवेचं ठिकाण निर्माण करण्याचा कार्यक्रम मी हाती घेतला होता. तेव्हाचा पन्हाळा म्हणजे आजचा पन्हाळा नव्हे. तेथे काहीच सोयी उपलब्ध नव्हत्या. लोहिया शेठ आमि रुईया शेठ यांचे दोन बंगले होते. सरकारी निवासस्थान मुख्यमंत्र्यांच्या निवासासाठी योग्य नव्हते म्हणून यशवंतरावांनी आपल्या राहण्याची व्यवस्था रुईया शेठच्या बंगल्यात केली होती. मीही पन्हाळात काही दिवस राहिलो.