क-हाडचे सर्वात महत्वाचे आकर्षण प्रीती-संगम. मराठी साहित्यांत व इतिहासातही ते अजरामर झाले आहे. परंतु प्रीतीसंगम आज पहाण्यासाठी येणा-याला तेथील सर्व वातावरण अव्यवस्थेचे व अस्वच्छ व उपेक्षित असे वाटते. तेथपर्यंत जाताना वाटेत, रस्त्यावर व वाळवंटात अगदीच ओबडधोबड परिस्थिती आहे. घाटाच्या समोर खड्डे व इतर ढीग पडलेले असतात. ही सर्व परिस्थिती बदलणे आवश्य आहे. स्वामीच्या बागेची जागा ताब्यात घेऊन तेथे एक सुंदर “संगम-उद्यान” बनविणे शक्य आहे. भुईकोट किल्ल्याचा, संगमाशेजारील तटावर दुरुस्ती करून संगमाचे पावसाळ्यांतील अलौकीक स्वरूप पहाण्यासाठी आकर्षक व्यवस्था करणे जरूर आहे.
या भागंत कोयनेमुळे हल्ली देशी व परदेशी प्रवासी लोकांची संख्या वाढू लागली आहे. त्या सर्व लोकांच्या भेटीने प्रीती-संगम एक महत्वाचे केंद्र बनू शकेल. टुरिझम या खात्याचे मदतीने नगरपालिकेने हा प्रयत्न करून पहाण्यासारखा आहे. आपण व्यक्तिशः प्रयत्न करून नगरपालिकेचे या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधावे म्हणून मी हे प्रश्न या शहराचा एक नागरीक या नात्याने लिहित आहे. आपण प्रयत्न सुरू केल्यास राज्याचे स्थानिक व वरिष्ठ अधिकारीही या प्रश्नांत लक्ष घालतील याबद्दल मला मुळीच शंका नाही.
पत्र काहीसे लांबले. परंतु मनांत असलेले कल्पनांचे ओझे आज हलके झाल्याचे समाधान मिळत आहे. पत्रोत्तराची अपेक्षा आहे.”
आज प्रीती-संगमावर यशवंतरावांना आदरांजली अर्पण करताना त्यांचे स्वप्न न नगराध्यक्ष पी. डी. पाटलांचे कार्य यांचा संगम पाहण्याचा योग आला. मी जे १९५७ साली कराड पाहिले, त्या आणि आजच्या कराडात मूलभूत फरक पडला हे आणि ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
यशवंतरावांचा ऋणानुबंध व नियतीवर विश्वास. म्हणूनच त्यांनी आपल्या पुस्तकाचे नांव ‘ऋणानुबंध’ म्हणून ठेवले. माझा त्यांचा संबंध हाही एक ऋणानुबंधाचा भाग होता याची मला खात्री वाटते आणि तो केव्हा आणि कसा झाला हाही त्या ऋणानुबंधाचाच भाग आहे.
मी १९५२ साली आय. ए. एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या वेळच्या मुंबई राज्याच्या सेवेत दाखल झालो. माझे प्रशिक्षण झाल्यानंतर माझी पहिली नियुक्ती माऊंट अबूला असिस्टंट कलेक्टर (ज्याला प्रांत ऑफिसर म्हणत) म्हणून झाली. त्या वेली माऊंट अबू, मुंबई राज्याचे शेवटचे टोक होते व भाषिक राज्य पुनर्रचनेनंतर ते राजस्थान गेले.
तेथे माऊंट अबूला पाच-सहा महिने काढले नसतील. इतक्यात कळले की त्या वेळी नुकत्याच सुरुवात झालेल्या कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (समाज विकास कार्यक्रम) ची एक राज्य पातळीवरील सभा माऊंट अबूला करण्याचे योजिले आहे. त्या वेळी यशवंतराव चव्हाण समाज विकास खात्याचे मंत्री होते. १९५४ सालचा मे महिना असावा. त्या वेळचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई, संपूर्ण मंत्रीमंडळाचे सदस्य, मुख्य सचिव व विधायक कार्यासंबंधी काम करणारे सर्व सचिव, तसेच मुंबई राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी त्या सभेस हजर राहणार होते.
माझे जिल्हाधिकारी श्री. शंकर - जे आय. सी. एस. मधले वरिष्ठ अधिकारी होते व पूर्वी सरदार वल्लभभाई पटेलांचे खाजगी सचिव होते – त्यांनी मला सांगितले की, ‘एवढ्या मोठ्या सभेची व्यवस्था तुला करावयाची आहे व याच्या यशस्वीतेवर तुझ्यामध्ये संघटना चातुर्य आहे की नाही हे दाखविण्याची ही एक संधी ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी जे काम करावयाचे होते त्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केले. तीन दिवस सभा चालू होती व तीनही दिवस यशवंतराव सर्व काही निरखून पहात होते. सदर परिषदेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी मला भेटण्यासाठी बोलवले, ते मला म्हणाले, “प्रधान, तुमचे अभिनंदन. एवढ्या मोठ्या सभेविषयीचा काही अनुभव नसताना ज्या त-हेने ती पार पाडली त्या मागे तुम्ही किती परिश्रम घेतले असतील याची मला कल्पना आहे.”