प्रत्यक्षात मात्र माझी त्यांची पुण्यात पहिली भेट झाली ती वादळी ठरली. माझ्या शासकीय जीवनातील पहिल्या बिकट प्रसंगाला मला सामोर जावे लागले. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद नॅशनल डिफेन्स अँकॅडमीस भेट देण्यासाठी पुण्यात येणार होते. त्यावेळचे जिल्हाधिकारी रजेवर असल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावर होती. त्या काळात राजशिष्टाचार फारच कडक असता. सकाळी पहाटे स्पेशल रेल्वेगाडीने राष्ट्रपतीचे आगमन होणार होते. रेल्वे स्थानकावर त्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री, पुण्याचे महापौर व इतर मान्यवर व्यक्ती हजर होत्या. गाडी थांबताच राष्ट्रपतींचे स्वागत करण्याचा मान मुख्यमंत्र्यांचा होता. काय झाले कोणास ठाऊक – त्यावेळचे दक्षिण सेनेचे प्रमुख यांनी रांग तोडली व ते राष्ट्रपतींच्या डब्यात घुसले.
राजशिष्टाचाराचा भंग झाला होता व मुख्यमंत्र्यांना राग येणे स्वाभाविक होते. यशवंतरावांचा एकंदर मूड पाहून माझे त्यावेळचे आयुक्त जी. एम. शेठनी मला सांगितले की, ‘आज सकाळी जे झाले त्याबद्दल जिल्हाधिकारी म्हणून तुला जबाबदारी पत्करावी लागेल. पण घाबरू नकोस, मी सर्व काही सांभाळतो.’
सर्कीट हाऊसवर पोहोचताच यशवंतरावांनी त्या दिवसाचा कार्यक्रम मागीतला. शेठ साहेबांनी तो दाखविताच यशवंतरावांनी पाहिले की दुपारचे जेवण राष्ट्रपतींबरोबर एन. डी. ए. मध्ये आहे. चव्हाण म्हणाले, “मला अजून आमंत्रण नाही, मी कसा जाऊ?”
जेव्हा मला विचारण्यात आले, तेव्हा मी सांगितले की एन. डी. ए. च्या प्रमुखांनी जे आमंत्रण पाठविले आहे ते माझ्याकडे आले आहे. कारण सदर आमंत्रण मुख्यमंत्र्यांना मुंबईस पाठविण्यास विलंब होईल म्हणून जिल्हाधिका-याकडे पाठवावे हे मीच त्यांना सांगितले होते.
एकंदर सकाळच्या प्रकारामुले सैनिक अधिका-यावर यशवंतरावांचा राग होता. ते ताडकन म्हणाले, ‘Since when the Chief Minister has become c/o the Additional Collector Pune?’ केव्हापासून मुख्यमंत्र्यांचा पत्रव्यवहार अँडिशनल कलेक्टरमार्फत सुरू झाला आहे.
ते पुढे म्हणाले. “मला आमंत्रण नाही, मी जेवायला जाणार नाही.” शेठ साहेब खाली आले व मला म्हणाले, “आज मुख्यमंत्र्यांचा राग अनावर आहे. सातारी राग आला होता.
सकाळी स्टेशनवर जे काही झाले होते, ते एका वरिष्ठ सेनानीनी केलेल्या कृत्यामुळे झाले होते व ते आमंत्रण माझ्याकडे पाठविण्यास मीच सांगितले होते. मी त्या वेळेला तरुण होतो. मी सरळ वर गेलो. यशवंतराव सोफ्यावर आपले दोन्ही हात छातीवर घडी करून ओठ दाबून बसले होते. डोळ्यातून रागाचे फुंकार उडत होते. त्यांनी डोळे वर करून माझ्याकडे पाहताच मी म्हणाले, “आपण मुख्यमंत्री आहात. आपण जे ठरवाल त्याच्यावर माझे भवितव्य अवलंबून आहे. आपणास खरोखरच वाटत असेल की माझी चूक झाली असेल, तर मी लगेच राजीनामा सादर करण्यास तयार आहे.” स्वाभाविकच माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते ते मुख्यमंत्र्याच्या अन्यायाचे.
ते ऐकताच यशवंतराव उठले, माझ्याजवळ आले व म्हणाले, “प्रधान, सॉरी. माझा राग मी तुझ्यावर उगाचच काढला. माझी चूक झाली.”
ते पुढे म्हणाले, “तुझे पहिले नाव काय?” ते सांगताच ते म्हणाले, “राम, झाले ते विसरुन जा. आपणाला पुढे कितीतरी कामे करावयाची आहेत.”
ही माझी, यशवंतरावांची पहिलीवहिली खरीखुरी ओळख. पुढे तीस वर्षे, निरनिराळ्या पदांवर, निरनिराळ्या क्षेत्रातून आम्ही भिन्न भिन्न मार्गाने चाललो, परंतु शेवटपर्यंत भावना एकच ‘आपल्याला पुढे कितीतरी कामे करावयाची आहेत.