व्याख्यानमाला-१९९५-९६-५२

व्याख्यान - दि. २५ नोव्हेंबर १९९५

विषय - “मी पाहिलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व – यशवंतराव चव्हाण"

व्याख्याते – श्री. राम प्रधान, मुंबई.

व्याख्याता परिचय -

राम प्रधान यांनी १९५२ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (आय. ए. एस.) प्रेवश केल्यापासून निवृत्त होईपर्यंत अनेक महत्वपूर्ण पदांचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. अशी संधी फारच थोड्या अधिका-यांना लाभते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि नंतर भारताचे संरक्षणमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांचे ते १९६० पासून १९६५ पर्यंत स्वाय सचिव होते. पुढे प्रधान यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक विचारविनिमयामध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभले. संयुक्त राष्ट्रसंघाची व्यापर आणि विकासविषयक परिषद व गॅट या दोन संस्थांमधील भारताचे निवासी प्रतिनिधी म्हणून प्रधान यांचे जिनिव्हा येथे बारा वर्षे वास्तव्य घडले. आंतरराष्ट्रीय सनदी अधिकारी हे पद त्यांनी पाच वर्षे भूषविले. १९७७ च्या जूनमध्ये भारतात परल्यावर प्रधान यांची प्रथम महाराष्ट्र गृहसचिव म्हणून आणि नंतर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

१९८५ च्या जानेवारीमध्ये राजीव गांधी यांनी प्रधान यांना दिल्लीस केंद्रीय गृहसचिव म्हणून बोलावून घेतले. भारताच्या या तरुण आणि तडफदार पंतप्रधानांसमवेत प्रधान यांनी अठरा महिने काम केले. पंजाब, आसाम आणि मिझोराम या राज्यांमधील राजकीय पेचप्रसंग सोडविण्याच्या दृष्टीने जे करार करण्यात आले ते याच काळात. साहजिकच या अशा निर्णायक वाटाघाटीच्या निमित्ताने राजीव गांधी यांना जवळून समजून घेणे प्रधान यांना शक्य झाले. राजीवजीभोवती वावरणा-या व्यक्तींचे निरीक्षण करता आले.

शासकीय सेवेतून ३० जून १९८६ रोजी निवृत्त झाल्यावर प्रधान यांची तिबेट आणि ब्रह्मदेश या दोन देशांच्या सीमेलगत असलेल्या अरुणाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९९० च्या मार्चमध्ये त्या पदाचा त्याग केल्यावर त्या वर्षीच्या जूनमध्ये प्रधान महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आले. लोकसभेच्या १९९१ मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाने पी. व्ही. नरसिंहराव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मध्यवर्ती निवडणूक समन्वय समितीचे सदस्य म्हणून प्रधान यांनी काम पाहिले.

कर्तृत्वसंपन्न शासकीय सेवेबद्दल राम प्रधान यांचा २६ जानेवारी १९८७ या दिवशी पद्मभूषण हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गैरव करण्यात आला. ‘वर्किंग वुईथ राजीव गांधी’ हे इंग्रजी पुस्तक, मा. यशवंतरावजी चव्हाण यांच्या संरक्षण मंत्रिपदाच्या कालखंडाशी संबंधित ‘वादळमाथा’ हे मराठी पुस्तक प्रकाशित. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे विश्वस्त. याशिवाय अनेक संस्थांच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम पहात आहेत.