व्याख्यानमाला-१९९५-९६-५१

 समूळ युरोपीयन लोकांचा आक्रमक, हिंसक, भोगवादी, शहरी, संघटित, औद्योगिक समाजरचनेचा ढाचा हा व्यक्ती, समाज आणि निसर्ग उध्वस्त करणारा ढाचा आहे. म्हणूनच तो अमानुष आहे. त्याच्य मायावी मोहातून आमच्या शिक्षितांनी, नेत्यांनी, तज्ञांनी, समाजधुरीणांनी विनाविलंब बाहेर पडले पाहिजे. त्यांनी तयार केलेली राज्यशास्त्रे, समाजशास्त्रे, अर्थशास्त्रे, शिक्षणशास्त्रे ही मुळापासून तपासून घेतली पाहिजेत आणि आपल्या संस्कृतीच्या उद्दीष्टांचा पूर्ततेकडे नेणारी, आपल्या मनःस्थितीत व परिस्थितीत रूजतील, फुलतील, फळतील अशी समाजशास्त्रे, भौतिकशास्त्रे विकसित करण्याचे आव्हान आमच्यातल्या बुद्धीमंतानी, विद्वानांनी घेतले पाहिजे.

गेले तीन दिवस मी आपल्यापुढे माझे काही विचार मांडायचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राच्या उभारणीच्या कामांत कै. यशवंतरावांनी दाखवलेली दिशा आणि दृष्टी मला जशी भासते ती आपल्युपढे मांडायचा प्रयत्न केलेला आहे. स्वातंत्र्यापर्यंतच्या शंभरवर्षात म. जोतिबा फुले ते महात्मा गांधी या कालकंडात, महाराष्ट्रात जे विचारमंथन झाले, समाजसुधारणेच्या, समाज परिवर्तनाच्या, जनगारणाच्या ज्या ज्या चळवळी झाल्या, त्या सर्व मंथनाचा लघुत्तम साधारण संयोजक म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचे आचार विचार आहे. कार्यकर्तृत्व आहे. ती त्यांची वैचारिक भूमिका, आचार विचाराची बैठक जे कुणी पुढे नेतील, विकसित करतील ते चव्हाणसाहेबांचे खरे वारस ठरतील. आज महाराष्ट्र त्यांचे वारस, त्यांचे मानसपुत्र म्हणून काहीजण त्यांच्या पुण्याईचा बाजार मांडून बसलेत पण त्या चेल्यांचे खरे आचार विचार काय आहेत? त्यांच्या राजकीय चाली कशा आहेत? त्यांचे अर्थकारण कसे चालते? हे आता सगळ्यांना महित झाले आहे. ठीक आहे. मला त्या बाबतीत या ठिकाणी अधिक काही सांगायचे नाही. फक्त चव्हाणसाहेबांची बदनामी करण्याचे पाप कुणी करू नये असे मनापासून वाटते.

यशवंतरावांची स्तुती करताना, त्याचे भजन पूजन करा, त्यांची पोथी करा, त्यांचे देऊळ बांधा, असंही मला सांगायचं नाही. तीही एक मूर्खपणाची प्रवृत्ती आहे.

महाराष्ट्रातील सामान्य मराठी माणसांची पिढ्यान् पिढ्यांची मानसिक कोंडी फोडण्याचे काम चव्हाणसाहेबांनी केले. मरगळून गेलेल्या मनांत नवा आत्मविश्वास भरला आणि कार्यकर्तृत्वाची अनेक दालने उघडून पुढे जाण्याचे रस्ते काढून दिले. यशवंतरावांचे जीवनकार्य हे महाराष्ट्राला प्रेरणा, स्फूर्ती, दिशा आणि दृष्टी देणारे आहे. आजच्या गोंधळातली वातावरणांत, तत्वहीन अराजकांत, पुढचं काहीच दिसत नाही. अशा अंधारात कराडचा हा दीपस्तंभ कार्यकर्त्यांना, विचारवंतांना आणि जनगणमनाला मार्गदर्शक होईल अशी माझी मनोमन खात्री आहे.

आपण दोन तीन दिवस वेळ देऊन माझे विचार ऐकलेत. मी आपला अत्यंत आभारी आहे. आमदार, नगराध्यक्ष पी. डी. पाटील, इतर सर्व नगरसेवक, कर्मचारी यांचेही मी अत्यंत आभार मानतो आणि माझे हे या सत्रातील तिसरे आणि अखेरचे भाषण संपवतो.

।।जय हिंद, जय महाराष्ट्र ।।

प्राचार्य पी. बी. पाटील, सांगली
दि. १४ मार्च १९९५.