व्याख्यानमाला-१९९२-२ (3)

सर्वप्रथम एक गोष्ट विकासाबद्दल यशवंतराव स्पष्ट करतात ती अशी की “विकास” हा सहेतुक व योजनापूर्वक घडून आलेलाच असावा. समाजात यदृच्छ्याही बदल होतच असतात. समाज बदलत असतो. कुठलाही समाज स्थिर राहात नाही. ती नित्य बदलत असतो. पण त्याला आपण विकास म्हणत नाही. विकास हा विशिष्ट दिशेने करावयचा असतो आणि जाणीवपूर्वक करायचा असतो. त्याच्यामधली सहेतुकता फार महत्वाची असते. काहीतरी नीट योजून, काही कालबद्ध कार्यक्रम निश्चितपणे ठरवून घेऊन त्याची दिशा ठरवून त्या दिशने जाणे विकास प्रक्रियेत अंगभूत असते. त्याचप्रमाणे विकास हा सर्वागीण असायला पाहिजे. एकाच क्षेत्रात विकास झाला आणि बाकीची क्षेत्रं जर लंगडी पडली तर पक्षाघात झालेल्या शरीराप्रमाणे त्या समाजाची अवस्था होईल, हा इशाराही यशवंतरावांनी त्यावेळेला दिलेला आहे. महाराष्ट्राचे जे वेगवेगळे प्रदेश आहेत, त्या प्रदेशामध्ये विकासाबाबत संतुलन राहणं या राज्याच्या भवितव्यासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. विकास हा केवळ एका भागात होऊन चालणार नाही, एका वर्गात होऊन चालणार नाही तर सगळ्या वर्गांना त्याचे फायदे मिळावेत अशाप्रकारचा हा विकास असला पाहिजे. हा समन्वित विकास पाहिजे, यावरही त्यांचा कटाक्ष होता. शेतीच्या क्षेत्रात विकास, शिक्षणाच्या क्षेत्रात विकास आणि आरोग्याच्या क्षेत्रात विकास या सर्व क्षेत्रांतील विकासांचा एक अन्योन्य संबंध असतो. विकास नेहमीच समन्वित (इंटिग्रेटेड), अशला पाहिजे, संतुलित पाहिजे, अशाप्रकारे सर्वांगीण, समन्वित आणि संतुलित असा प्रकारच्या विकासाचे एक प्रतिमान यशवंतरावांनी महाराष्ट्रासमोर मांडले. म्हणजे जनतेच्या विकासाच्या सर्व शक्ती मोकळ्या करणं, तसंच विकासाच्या प्रक्रियेमध्ये जनतेने प्रत्यक्ष सहभागी होणं – जनतेच्यावतीने कोणीतरी सहभागी न होता जनतेनेच प्रत्यक्ष सहभागी होणं – शिक्षण, सहकार, आरोग्य इ. सर्व क्षेत्रांमध्ये समता, समृद्धी आणि परिवर्तनक्षमता यांचा परिपोष होणं, समाजामध्ये जी कमालीची विषमता आहे ती क्रमाक्रमाने नष्ट होणं, थोडक्यात सामान्यांच्या जीवनामध्ये व्यापक स्वरूपाची क्रांती घडून येणं हे या विकासाचे अंतिम साध्य आहे. ज्या समाजस्तरांना आजपर्यंत राजकीय प्रक्रियांमध्ये सहभागी होता आलेलं नाही, इथे राजवटी आल्या व गेल्या पण ज्यांचा जीवनक्रम वर्षानुवर्षे जसाच्या तसा राहिला आहे अशा, पूर्णपणे राजकारणाच्या वर्तुळाच्या बाहेर राहिलेल्या जनसमान्यांना व्यापक अर्थाने राजकारण करता यावं ही प्रेरणा यशवंतरावांच्या विकास संकल्पनेच्या मुळाशी होती. व्यापक अर्थानं राजकारण मी मुद्दामच म्हणतोय. व्यक्तीला अर्थपूर्ण सहभाग करता यावा, निर्णयप्रक्रियेत भाग घेता यावा, तिला या लोकशाहीचा एक आधार होऊन राहता यावं, सत्तेच्या क्षेत्रातील मक्तेदारी, मिरासदारी मोडीत निघून सत्ता ही ख-या अर्थाने लोकांपर्यंत जावी हे या राजकारणात अभिप्रेत असते. लोकांची सत्ता हा केवळ शब्दप्रयोग न राहता, ती केवळ संविधानातील एक तरतूद न राहता ती प्रत्यक्ष वस्तुस्थिती व्हावी. म्हणजेच ग्रामीण जीवनातील मक्तेदारी, आर्थिक मक्तेदारी, राजकीय मक्तेदारी, जातीय मक्तेदारी नष्ट होईल. मिरासदारी नष्ट व्हावी, सरंजामीवृत्ती नष्ट व्हावी व एकापरीने सगळे जे सामाजिक संबंध आहेत त्यांच्यामध्ये क्रांतीकारक बदल घडून यावेत, जे आम्ही पिढ्यानपिढ्या सहन करतोय ते या पुढच्या पिढ्यांना सहन करावं लागू नये अशा पद्धतीने या समाजाची वाटचाल व्हावी.

ठोस शब्दामध्ये सांगावयाचं झालं तर माणूस, जमीन आणि पाणी यांचा योजनापूर्वक निश्चित अशा हेतुंनी कार्यक्षम वापर करून घेणं हे यशवंतरावांना अभिप्रेत असलेल्या विकासाच्या मगाचं सूत्र होतं. जे सबंध मनुष्यबळ उपलब्ध आहे. जे केवळ शहरात नव्हे, खेड्यात नव्हे तर अगदी पाड्यापर्यंत, जंगलातल्या आदिवासींपर्यंत उपलब्ध आहे – ह्या सगळ्या मनुष्यबळाचा नीट वापर, पद्धतशीर वापर करणे. जे पाणी उपलब्ध आहे, त्या पाण्याचा सर्वांनी लाभ होईल अशा पद्धतीने वापर करणे. जमिनीचा वापर समस्त शेतकरी वर्गाला लाभ होईल अशाप्रकारे केला जाणं त्यांना अपेक्षित होतं. शेतक-याचा मुलगा असलेले यशवंतराव शेतीबद्दल फार सखोल चिंतन करताना आपल्याला दिसतात. ही शेतजमीन, ही काळी आई जीवनदाती आहे हे जाणून सबंध विकासाचा जो नमुना आखायचा तो जमिनीला मध्यवर्ती ठेवूनच आखावा लागले अशी त्यांची धारणा होती.

आजपर्यंतचा विकास-कार्यक्रम शेतीकडे दुर्लक्ष करून राबविला गेलेला आहे. त्यामुळे शेतीची अवस्था वाईट झाली आणि म्हणूनच खेड्यांचं कंगालीकरण झालं. खेड्यांचं कंगालीकरण झालं म्हणून शहरांकडे फार मोठ्या प्रमाणावर स्थालांतर झालं. हे सर्व चित्र जर पालटवायचं असेल, तर शेती सुधारली पाहिजे, शेतीचं आधुनिकीकरण झालं पाहिजे, शास्त्रीय पद्धतीने शेती केली गेली पाहिजे, शेती परवडली पाहिजे.