व्याख्यानमाला-१९९२-२ (6)

कृषि – औद्योगिक समाजाची उभारणी, विकेंद्रीकरणाच्या योजनेची राबवणूक, आणि मनुष्यबळ, जमीन व पाणी यांच्या जास्तीत जास्त कार्यक्षम उपोयगाची अपेक्षाही सर्व विकासाची प्रतिमाने यशवंतरावांच्या मांडणीत असताना प्रत्यक्षात आपल्याला काय दिसते? प्रत्यक्षात यशवंतरावांची ही विकासाविषयक भूमिका काही बाबतीत यशस्वी ठरलेली आहे. या राज्यामध्ये काँग्रेसला स्वतंत्र्यपूर्व काळात नसलेली पत यशवंतरावांनी मिळवून दिलेली आहे. येथे एक नवी विश्वसनीयता यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मिळाली आहे. विकेंद्रीकरणामधून, सहकारामधून अशा अनेक जागा उपलब्ध झाल्या की ज्या जागांमुळे एक नवा गोतावळा त्या पक्षाच्या भोवती उभा राहिला आणि त्यामुळे त्याची ताकद वाढली. तर पक्षाचा संघटनात्मक पाया महाराष्ट्रामध्ये पक्का रोबला गेला याचे श्रेय यशवंतरावांना आहे. ज्यांच्या हातून सत्तेची सूत्रं हिरावली गेली त्यांच्याशीही संवाद करण्याचं कौशल्य यशवंतरावांच्याकडे असल्यामुळे त्यांचाही फारसा रोष महाराष्ट्रात शिल्लक राहिलेला नाही, हेही त्यांच्या नेतृत्वाचे एक अतुलनीय यश आहे. बहुजन समाजातून वर आलेलं पण बहुजन समाजाच्या स्वाभाविक मर्यादांवर मात केलेलं असं नेतृत्वा यशवंतरावांचं होतं हे मी मुद्दाम म्हणतोय, कारण बहुजन समाजाच्या ज्या ज्या त्रूटी आहेत त्या अचूकपणे हेरून प्रयत्नपूर्वक दूर कण्याची धडपड यशवंतरावांनी केली होती. बहुजन समाजाचा तरुण धाडसी असतो पण बहुश्रुत नसतो, तो एकेका विषयामध्ये प्रगती चांगली करतो पण जीवनाचा चौफेर आस्वाद घेण्याची वृत्ती व क्षमता त्याच्या अंगी सहसा नसते. यशवंतरावांनी जाणीवपूर्वक तसा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वीही झाले. त्यांच्याइतका व्यासंगी, त्यांच्याइतका वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मैत्री कायम ठेवलेला आणि मनापासून कवितेला दाद देण्यापासून ते वैज्ञानिकांच्या परिषदेला मार्गदर्शन करण्यापर्यंतचा अधिकार अंगी असणारा असा नेता शोधून सापडणार नाही. त्यांच्या या सर्व नेतृत्वगुणांचा लाभ महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाला मिळाला आहे. प्रारंभिक काही वर्षांमध्ये यशवंतरावांचे नेतृत्व मिळाल्यामुळेच त्यांचा पक्ष सत्तेवर स्थिरपद राहिला हे आपल्याला नाकारता येत नाही. ग्रामीण भागामध्ये एक आधाररचना सहकारामधून निर्माण झाली, सत्तेच्या विकेंद्रीकरणातून निर्माण झाली हेही आपल्याला नाकारता येत नाही. अनेक क्षेत्रांत विकास घडून आला. गावोगावी माळरानांचे रूपांतर हिरव्यागार अशा परिसरात झालं. या भागमध्ये तर आपण हे विशेषत्वानं पाहतो. पण विकासाच्या प्रक्रियेतून ज्या अपेक्षा यशवंतरावांनी ठेवल्या होत्या त्या पूर्ण झाल्यात का?

संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा पहिल्या भाषणात त्यांनी असं सांगितलं होतं की मराठवाडा, कोकण, विदर्भ या मागासलेल्या भागांच्या विकासाकडे आम्ही विशेष लक्ष देऊ. संतुलित विकासामध्ये हे येतंच. नैसर्गिकदृष्ट्या काही राज्याचे भाग साधनसामग्री असलेले असतात, काही नसतात काहींच्याकडे नेतृत्व असतं तर काहींच्या ठिकाणी नसतं. तरीही अनेक कारणं अशी असू शकतात की ज्यामुळे काही भागात प्रगती होते तर काही मागे राहतात. परंतु तरीसुद्धा त्याच्यावर मात करून प्रादेशिक संतुलन विषमता निर्माण होईल. तिचं स्वरुप कसं असावं? गुन्नार मिर्दाळ म्हणून एक लेखक आहेत. त्यांनी प्रादेशिक विषमतेचं विश्लेषण करताना असं सांगितलय की प्रादेशिक विषमतेचे परिणाम दोन प्रकारचे संभवतात. एक प्रकार असा की ज्यात विकसित प्रदेश मागासलेल्या प्रदेशांची उपेक्षा किंवा शोषण करतात, तर दुस-या प्रकारात विकासित झालेल्या भागांचा आदर्श मागासलेल्या भागांना मिळतो, त्याच्यापासून प्रेरणा मिळते, मार्गदर्शन मिळते. एकापरीने विकासाचं एक प्रतिमान समोर आहे आणि त्या दिशेने आपल्याला जायचं आहे, अशा प्रकारचं स्फुरण हे मागासलेल्यांना मिळावं, मागासलेल्या भागांना पाठिंबा, मार्गदर्शन व पाठबळ हे या प्रगत भागांनी द्यावं असे या परिणामांमध्ये अभिप्रेत असतं. यशवंतरावांना हेच अभिप्रेत होतं.

यशवंतराव म्हणाले होते की काही भाग त्यांची पूर्वतयारी नीट झाली असल्यामुळे पुढं जातील पण धाकट्या भावाला बोटाने धरून चालवावं त्याप्रमाणे मागे राहिलेल्या प्रदेशांना ते पुढं नेतील. पण प्रत्यक्षात हे झालेलं नाही. उलट ज्याला प्रतिसारण परिणाम असे मिर्दाळ म्हणतो त्या पहिल्या प्रकारचाच परिणाम येथे झालेला आहे अविकसित भागातील प्रतिभा अविकसित भागातील श्रमशक्ती व अविकसित भागातील कौशल्य हे विकसित भागांकडे स्थानांतरित झालेलं आहे आणि त्यामुळे अविकसित भागातील मागासलेपणाची टोचणी अधिकअधिक तीव्र होत गेली. आणि हा प्रश्न आपण आज अत्यंत भीषण स्वरुपात पुढे आलेला पाहतो. विदर्भाच्या ठिकाणी विकासाचं सुप्त सामर्थ्य असताना, चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात खनिजे फार मोठ्या प्रमाणावर असूनसुद्धा, जलसंपदा फार मोठ्या प्रमाणावर असूनसुद्धा तिचा पुरेपुर विनियोग झालेला नाही. कुणी म्हणेल की अकरा वर्षे या विदर्भाच्या नेतृत्वाकडे राज्याची धुरा होती, आजही आहे, हे खरं आहे पण इथे हे मला सांगितलं पाहिजे की यशवंतरावांच्या विकाससंकल्पनेला महाराष्ट्रात नंतरच्या काळात कुणी वारसदारच उरलेला नाही. यात यशवंतरावांचा दोष किती आणि इतरांचा किती या चिकित्सेत आपल्याला येथे जायची गरज नाही.