व्याख्यानमाला-१९९२-२ (21)

विकासाच्या नावाखाली एकापरीने आपण एक नवा वसाहतवाद या देशात सुरु केलेला आहे इंग्रजांच्या काळामध्ये जे राज्यकर्ते असे म्हणायचे की भारतीय लोकांना काही अक्कल नाही, ते काही स्वतः राज्य करु शकत नाहीत. आज आपले शहरी लोक हेच म्हणतात, की खेड्यातल्या लोकांना काय अक्कल नाही. खेड्यातले सधन लोक म्हणतात की निर्धन लोकांना काही अक्कल नाही. यांना असंच बैलासारखं वापरावं लागतं. यातूनच हा देशी वसाहतवाद निष्पन्न झाला आहे. शोषकही देशीच आणि शोषितही देशीच. या देशी वसाहतवादाला फार मोठ्या प्रमाणावर विकास कार्यक्रमातून चालना मिळाली आहे. चाळीसपंचेचाळीस वर्षाच्या विकासाच्या वाटचालीनंतरही जनसामान्यांच्या वाट्याला आजही दारिद्र्य आहे, निरक्षरता आहे, बालमृत्यू आहे, कुपोषणामुळे ४० टक्के बालकांचे डोळे दरवर्षी जातात. आणि आपण आरोग्याच्या काय गोष्टी करतो? तेव्हा ही जी एक अवस्था आहे ही अक्षरशः वासाहतिक अवस्थेसारखीच आहे. अभिजनांना सामान्यांच्या जीवनपद्धतीबद्दल काहीही देणघेणं नाहीय, ते या गुर्मीत आहेत की आम्ही २० टक्के, आम्ही राज्य करतो, कारण आम्ही श्रेष्ठी आहोत, आम्ही अभिजन आहोत, आम्ही डॉमिनन्ट क्लास आहोत, आम्ही डॉमिनन्ट कास्ट आहोत, म्हणून आम्ही राज्य करु आणि ते तुम्ही बिनतक्रार सहन केले पाहिजे. अशाप्रकारची भूमिका ही नववसाहतवादाची भूमिका याच्यमध्ये आहे, असे आपल्याला दिसून येईल.

चंगळवादी जीवनपद्धतीचा प्रसार हा राजरोस सुरु आहे. टेलिव्हीजन आलं. रंगीत टेलिव्हीजन येतो, अँन्टेना टी. व्ही. येतो, स्टार टी. व्ही येतो आणि सगळ्यांचं प्रयोजन एकच असतं की या विलासी जीवनाची चटक लावून माणसाला विचारांपासून परावृत्त करायचं. देशीविदेशी भांडवलदारांनी आधी कारखान्यातनं माल तयार करायचा आणि मग मालासाठी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी जाहिरतीचं तंत्र वापरायचं. मग नुसते अंगाला लावायचे साबणच किती प्रकारचे? त्या तयार करणा-या कंपन्या किती मोठमोठ्या व मल्टीनॅशनल? १०-१० आंतरराष्ट्रीय कंपन्या एकत्र येऊन काय तयार करतात, तर साबण! एक ब्लेड! या गरजा आम्ही भागवू शकत नाही? स्थानिक पातळीवर? परंतु नाही. या स्पर्धेमध्ये तुम्हाला गरज असो वा नसो, तुम्हाला नटीसारखं सुंदर दिसायचं तर हे क्रीम लावलं पाहिजं आणितो साबण लावलाच पाहिजे! अशा पद्धतीने गरजांची कृत्रिम निर्मिती केली जाते. सतत एक अतृप्तता माणसांच्या मनांमध्ये टिकवून ठेवली जाते. माणूस कधीही संपूर्ण सुखी होऊ नये, त्याला सतत असोशी वाटली पाहिजे, एक गरज संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी, तिसरी संपली की चौथी. टेलिव्हीजन झालं की वॉशिंग मशिन, वॉशिंग मशिन झालं की घरझाडणी यंत्र – नव – नविन काहीतरी देत राहायचं झालं की घरझाडणी यंत्र
आणि ही निरंतर भूक निर्माण करीत राहायचं. एकेक वस्तु घेतली की त्या माणसाला खोटं समाधान त्या त्या वेळी मिळू द्यायचं. पण खरं समाधान कधीही मिळवू द्यायचे नाही! हेच या विकास प्रतिमानाचं उद्दिष्ट आहे, हा एक सापळा आहे. माणसाला विचारापासून परवृत्त करणारा हा सापळा आहे. स्वतःखेरीज इतर कोणाचाही विचार करु न देणं हा त्याचा हेतू आहे आणि हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे हे लक्षात घ्या.

टेलिव्हीजनमुळे समाजहिताचं दुसरं तिसरं काह झालेलं नाही, पण हे मात्र नक्कीच झालेलं आहे की आपण गाफील होत चाललेलो आहोत. आपण आत्मकेंद्रीत होत चाललो आहोत. आज आपला मध्यम वर्ग इतका बथ्थड झालेला आहे, इतका संवेदनाशून्य झालेला आहे, इतका आत्मकेंद्रित झालेला आहे की त्याला देशात घडणा-या घडामोडींबद्दल काहीही वाटत नाही. आज पंजाबमध्ये अमूक इतकी माणसं मेली हे रोज बातम्यांमध्ये ऐकल्यानंतर आपल्या घशात चहाचा घोटसुद्धा अडत नाही. आपल्याला काहीच वाटत नाही, काहीच होत नाही. बिहारमध्ये इतके इतके भूकबळी पडले हे ऐकून आपल्याला काही वाटतच नाही. बिहारमधल्या ९० टक्के स्त्रिया या निरक्षर आहेत हे सत्य आपण ऐकतो, ठीक आहे, असतील त्याला काय? इतका स्वतःपुरता विचार करणारा निगरगट्ट मध्यम वर्ग यांनी तयार केलेला आहे. आणि या २० टक्के मध्यम वर्गाच्याच भोवती इथली सबंध विकासप्रक्रिया फिरते.