शेवटचा एक मुद्दा राहिला तो सांगतो आणि आवरतो. एकूण मांडणीच्या दृष्टीने तो आवश्यक आहे. पर्यावरणाचा मुद्दा. पर्यावरणाचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आजच्या विकासाच्या संदर्भात तो कळीचा मुद्दा ठरलेला आहे. मी सुरुवातीला असं म्हणालो की माणसाला जेव्हा असा अहंकारवजा आत्मविश्वास निर्माण झाला की मी कर्ता आहे, मी मध्यविदूं आहे आणि सबंध पृथ्वी फक्त माझ्यासाठी आहे. मी हे विश्व हवं तसं वापरू शकेन, तेव्हापासून या संकटाची सुरवात झाली आहे. माणसानं पाण्याचा वाटेल तसा वापर केला. आझही तो ७० टक्के पाणी ऊसावर वाया घालवीत आहे. आजही मोठमोठी धरणं तो बांधतोय. मोठमोठी धरणं बांधून निसर्गाचा समतोल ढळवतोय. आजही त्या ओझोनचा थर एका ठिकाणी फुटतोय, याच्या धोक्याची कल्पना येत नाही. कारखानदारीमुळे औद्योगीकरणामुळे पर्यावरण प्रदूषित झालं आहे. हा प्रश्न केवळ भारतापुरता मर्यादित नाही हा प्रश्न सबंध मानवाच्या अस्तित्वाशी जोडला गेला आहे. ओझोनचा जो थर पृथ्वीभोवती आहे तो थर जर एका ठिकाणी फुलटा तर सूर्याच्या उष्णतेने सबंध पृथ्वी भाजून निघेल. मनुष्यजीवन तिथं शिल्लक राहणार नाही, प्राणीजीवन शिल्लक राहणार नाही. निसर्ग शिल्लक राहणार नाही, हा धोका निकटच्या भवितव्यात येऊ घातलेला आहे. केवळ माणसाच्या गाढवपणामुळे तो येऊ घातलेला आहे. तो निसर्गाशी अशी बलात्कारी भूमिका घेऊन वागल्यामुळे हे होत आहे.
निसर्ग आणि माणूस यांच्यात एक सहजीवन असलं पाहिजे. निसर्ग आणि माणूस यांचेमध्ये परस्परपोषक संबंध असले पाहिजे. निसर्गातल्या शक्तींचा वापर करताना माणसाने अत्यंत जपून तो केला पाहिजे. आपल्याला मिळालेलं हे वरदान पुढच्या पिढ्यांनासुद्धा लाभावं याचा विचार माणसाने केला पाहिजे. विकासाची प्रक्रिया ही निरंतर विकासाची प्रक्रिया असली पाहिजे. नाहीतर माझ्या काळामध्ये मी वाट्टेल तेवढा विकास करीन आणि पुढच्या पिढ्या खड्ड्यात का जाईनात, मला काय त्याचं करायचं अशी भूमिका घेऊन चालणार नाही. निसर्गातल्या ज्या ज्या उर्जा संपणा-या आहेत, त्या जपून वापरल्या पाहिजेत. पेट्रोल संपणारे आहे. वापरून वापरून तुम्ही किती वापराल? पेट्रोलला पर्याय तुम्ही शोधू शकता, पाण्याला पर्याय तुम्ही कुठला शोधणार? १९८३ साली जेवढं पाणी दरमाणशी उपलब्ध होतं त्याच्या १/४ सुद्धा पाणी इ. स. २००० मध्ये उपलब्ध राहणार नाही असा शास्त्रज्ञांचा होरा आहे. किती भीषण संकट आहे? पाण्याला पर्याय कुठून आणणार? आणि त्या पाण्याची जी उधळमाप आपण करतो त्याचा अत्यंत अनियेजित वापार आपण करतो. पिकांचा विचार करीत नाही, प्रदेशाचा विचार करीत नाही. भूमीचा विचार करीत नाही. एकूण राष्ट्रीय संकटाचा आपण विचार करीत नाही, वापरतो. फक्त मनूःपूतपणे पाणी.
निसर्गाशी अत्यंत अमानुष, अत्यंत आत्मघातकी खेळ माणसाने केलेले आहेत. त्यामध्ये प्रदूषणाचाही भाग फार मोठा आहे. मी असं म्हणजोत की भोपाळमध्ये जे घडलं तो अपघात नव्हता, चेर्नोबीलमध्ये जे घडलं तो अपघात नव्हता, हे या विकासक्रमाचं एक अपरिहार्य फलित आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भोपाळसारखा प्रसंग जर इतर कुठल्या देशात झाला असता तर वर्षानुवर्षे त्याच्यावर चर्चा लोकांनी केली असती. या देशामध्ये मात्र चार-दोन लोक वगळता त्याबद्दल कोणी काही बोललंच नाही. एक विषारी हत्याकांड होतं आणि हजारो माणसं मरतात आणि पिढ्या बरबाद होतात मरणारी हजारो असतील पण त्यांच्या पुढच्या चार पिढ्या बरबाद झालेल्या आहेत त्याचं काय? या मानवी नुकसानीचा आपण कधीतरी हिशेब करणार आहोत की नाही? केवळ ग्रॉस नॅशनल इनकम वाढलं, आयात वाढली, निर्यात वाढली, अमूक वाढली तमूक वाढली या आकडेवारीच्या भाषेत फक्त आपण बोलणार आहोत? मानवी लॉस आणि पर्यावरणाच्या स्वरूपात होणारा हा लॉस भयानक मोठा आहे.