व्याख्यानमाला-१९८९-५

महाराष्ट्र भारतीय जनतेचं क्रांतीपीठ आहे. चार्वाक आणि बुद्धानंतर म. जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजातल्या तळातल्या माणसांचा विचार मांडला. समाज जीवनात अतिशय शोषित सामाजिक स्तरामधून क्रांती निर्माण केली. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी राजवस्त्र हे शोभेसाठी नसून गोरगरीब जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं साधन आहे. या जाणीवेनं आपल्या कोल्हापूर संस्थानात सामाजिक आणि आर्थिक क्रांतीची बीजे पेरली. शाहू महाराजांचा गौरव करतांना एक शाहीर म्हणतो -

"दीनांचा पालनवाल ।  तो शाहू नृपती गेला ।।
बुद्धासम् उदार नेता । जनकासम सूतत्ववेत्ता ।।
शिवछत्रपती सम कुशल राज्य कार्याला ।
तो शाहू नृपती गेला ।।१।।

धाडसात नेपोलियन । शक्ती भीम की जाण ।।
गुणीजनांस भोजासम् जो राजा झाला ।
तो शाहू नृपती गेला ।।२।।

या शब्दात शाहू महाराजांचा गौरव शाहीराने केला आहे. महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्रांतीच्या चलवळीचा असा गरज झाला. पाश्चात्य शिक्षणाच्या प्रभावामुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ज्या सामाजिक क्रांतीच्या चळवळी सुरु झाल्या त्या चळवळीचे अग्रणी म्हणन म. जोतिराव फुले, लोकहितवादी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर हे या नवजीवनवादी चळवळीचे अग्रणी होते. या सामाजिक क्रांतीकारकांच्या चळवळीनी अख्खे एकोणिसावे शतक हादरत होते. म. जोतिराव फुले , शेतकरी कामगार, दलित आणि स्त्रीया यांचे कृतिशील कैवारी होते, रयतेचे ते क्रांतीकारी तत्त्वज्ञ होते. शुद्रादी शुद्रांना आणि स्त्रीयांना ज्ञानाचे दरवाजे खुले करणारी चळवळ त्यांनी सुरु केली. भारतातील शूद्र आणि अतिशूद्र आणि स्त्रीयांच्या शिक्षणाचे ज्ञानपीठ म्हणजे म. जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले हें होत.

म. जोतीराव फुले यांनी धर्म, संस्कृती आणि इतिहास यांचे टीकात्मक आकलन करुन घेऊन हिंदुधर्मातील चातुर्वण्य, अस्पृश्यता, जन्मजात वर्चस्व आणि गुलामगिरी अशी जीवनरचना या विरुद्ध प्रखर हल्ला केला. स्त्रीदास्त त्यांना दिली  जाणारी पशूतुल्य वागणूक या विरुद्ध त्यांनी क्रांतीकारी आंदोलन सुरु केले. त्यांच्या विचारांत नवी मानवतावादी ध्येय्ये होती. माणूस हा माणसांचा मापदंड हा माणूसच असला पाहिजे हा त्यांचा विचार होता. बहुजन समाजाची दु:स्थिती आणि त्यातून बाहेर पडण्याचे उपाय या संबंधी त्यांचा विचार शास्त्रीय होता. सामान्य माणसाविषयी अपार तळमळ हे जोतिराव फुले यांच्या विचारांचं मुख्य सूत्र होतं. जोतिराव फुले यांचा विचार सर्व मानवव्यापी होता. मानवजातीतील सर्व वास्तव विचार हा त्यांचा सत्यधर्म होता. गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, इषारा, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, सत्यशोधक समाजोक्त पुजाविधी, ब्राह्मणी कसब, शेतक-याचा आसूड सत्यार, हंटर शिक्षण आयोगासमोर सादर केलेले निवेदन, अखंडादी काव्य रचना इत्यादि ग्रंथांची निर्मिती करुन भारतातील परंपरागत समाज संस्थांच्या विरुद्ध बंड पुकारणारे जोतिराव फुले हे पहिले भारतीय होत.

जोतिराव फुले यांचा विचार हा मानवी स्वातंत्र्याकडे, नवमानवतावादाकडे आणि सामाजिक समतेच्या निर्मितीकडे समाज उभा करणारा होता. जोतिराव फुल्यांचा सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे ईश्वरव्यापी मानवतावादाचा जाहीरनामा आहे. भारतीय समाजवादी लोकशाही क्रांतीची मूलभूत तत्त्वे आग्रहाने मांडणार तो जाहीरनामा आहे.

जोतिराव फुले यांच्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी संबंध महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाजाच्या चळवळीचे नेतृत्व केलं. त्यांचे कार्य पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना भारतातील सामाजिक आणि आर्थिक क्रांतीचे आधारस्तंभ असे म्हटलेले आहे.