व्याख्यानमाला-१९८९-१

व्याख्यान पहिले - दिनांक १२ मार्च १९८९ 

विषय - "महात्मा फुले सामाजिक विचार आणि आजचे सामाजिक संदर्भ"

व्याख्याते - मा. प्रा. बा. ह. कल्याणकर, औरंगाबाद

व्याख्याता परिचय -

महात्मा जोतिराव फुले महाराष्ट्राच्या क्रांतीविचाराचं भारतीय विद्यापीठ आहे. चार्वाक, बुद्ध, तुकाराम यांच्या निर्भय, मानवतावादी विचारांच्या वटवृक्षाला आलेलं मधुर फळ म्हणजे जोतिराव फुले आणि त्यांची सत्यशोधक चळवळ होय. जोतिराव फुले यांनी जाती संस्थेविरुद्ध बंड पुकारले. कोणताही धर्म ईश्वरप्रणीत नाही आणि कोणताही धर्मग्रंथ देवनिर्मित नाही असे ठणकावून सांगून जोतिराव फुले यांनी ईश्वरशाहीला हादरा दिला. भौतिकवाद्यांना आणि समाजवाद्यांना भिडवित आणि जुळावेत असे त्यांचे तत्त्वज्ञान आहे. त्यांच्या तत्त्वतज्ञानात सामाजिक नीतिमत्तेवर मुख्य भर आहे. जणू नीति हाच त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्राण आहे. धर्माच्या नावावर चालत आलेल्या पोटार्थी रुढींची नितिशी झालेली फारकत पाहून त्यांनी हिंदूधर्मावर अक्षरश: कोरडे ओढले. अनीतिमान ब्राह्मणांवर त्यांनी जितक्या कठोरपणाने कोरडे ओढले तितक्याच कणखरपणे अनितिमान ब्राह्मणेतरांवर घांव घातले.

सार्वजनिक 'सत्यधर्म' हे त्यांचे पुस्तक हा निव्वळ ग्रंथ नसून तो मानवी स्वातंत्र्यांचा जाहीरानामा आहे. धार्मिक व सामाजिक सहिष्णूता, सामाजिक समता आणि समानता, व्यक्तिस्वातंत्र्य व मानवी प्रतिष्ठा या त्या जाहीरनाम्यातील मूलाधार प्रेरणा आहेत. माणूस हाच सामाजिक मुल्याची मापकाठी आहे. समाज क्रांतीचा आधारही माणूसच आहे.

'गुलामगिरी' हा ग्रंथ लिहून जोतिरावांनी जुन्या समाज रचनेवर आणि कालबाह्य अवतार कल्पनेवर, दांभिक जुनाट मूल्यांवर त्यांनी घणाघाती हल्ला केला व सत्यशोधक चळवळीचा पाया घातला. बुद्धीप्रामाण्य, सामाजिक समता, मानवता, सामाजिक नितिमत्ता, वैज्ञानिक चिकित्सतेचा आग्रह, ब्राह्मण-धर्माला सुरूंग इत्यादी बाबी जोतिराव फुल्यांनी उभ्या केलेल्या चळवळीचे वैशिष्टय होय.

पुढील वर्षी जोतिराव फुले यांची पुण्यतिथी शताब्दी आहे आणि १९९१ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीशताब्दी आहे. या पार्श्वभूमीवर या दोघांचे विचार, जो मूलभूत मानवी हक्कांचा विचार आहे, शाश्वत, नैतिक सत्यावर एक सुंदर समाज निर्माण करणारे विचार आहेत. ते सत्य मानवी जीवनाचे नैतिक सत्य मानून त्यांच्या विचारांना कृतीत उतरण्यासाठी त्यांच्या विचारांचं आकलन करुन घेणे गरजेचे आहे.