व्याख्यानमाला-१९८०-७

जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी त्यांनी वसाहती निर्माण करून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला त्या त्या ठिकाणी ते “श्वेत माणसाचे ओझे” आपल्या पाठीवर घेवून गेले होते हे ऐतिहासिक वास्तव आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यांच्या वसाहतवादाच्या, विस्तारवादाच्या किंवा साम्राज्यावादाच्या मागची प्रेरणा व विचारसरणी या White man’s burden च्या संकल्पनेत आपल्याला सापडेल. त्याच्यामागचे विचारबीज या संकल्पनेत आहे. “We are the chosen people of God” असं गो-या लोकांचं म्हणणं होतं. त्यांच्या साम्राज्यविस्ताराच्या व ख्रिस्तीधर्मप्रचाराच्या मागच्या प्रेरणा व प्रवत्ती याच संकल्पनेत अनुस्यूत आहेत. ज्ञान-विज्ञानाची शक्ती प्राप्त केलेल्या युरोपीय राष्ट्रांनी वसाहतवादाच्या विस्तारातून जगातील सत्तासंपत्तीचा उपभोग घेण्याचा जन्मसिद्ध अधिकार ईश्वराने फक्त गो-या लोकांनाच बहाल केला आहे. असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. इंग्रज लोक याला अपवाद नव्हते. White man’s burden च्या संकल्पनेतल उग्र दर्प भारतातील त्यांच्या साम्राज्य विस्तारालाही होताच. भारताला सुसंस्कृत करण्याचे “मिशन” घेऊन इंग्रजलोक भारतात आले असे समर्थन अनेकांनी केले होते. इंग्रजी साहित्य आणि पाश्चिमात्य संस्कृती भारतीयांना सुसंस्कृत बनवू शकेल अशी ब्रिटिश विचारवंतांची प्रामाणिक धारणा होती. ख्रिस्तीधर्मप्रचारकांच्या समोर भारतीय नेटिव्हांना सुसंस्कत कसे करावे हा प्रश्न उभा होता. भारतात आलेल्या इंग्रजांनी आमच्या देशावर राजकीय गुलामगिरी लादण्यात शेवटी यश मिळविले. परिणामतः अटकेपार गेलेला भगवा ध्वज शनिवार वाड्यावर देखील राहू शकला नाही ही आमची ऐतिहासिक शोकांतिका होती. उत्तरेतलं वैभवशाली मोगल साम्राज्य संपुष्टात आलं आणि शेवटच्या मोगल साम्राटाला आपल्या जीवनाचा शेवट इंग्रजांच्या बंदिशाळेत करावा लागला. बहाद्दूरशाहाला आपल्या प्रीयभूमित स्वतःच्या दफनविधीसाठी देखील दोन गज जमीन मिळू शकली नाही. बहाद्दूरशाहाचे शोकगीत हे मोगल साम्राज्याचे मृत्यूगीत होते असे राहून राहून मला वाटते.

पण राजकीय गुलामगिरी भारतावर लादणा-या इंग्रजांच्या अमदानीत सामाजिक स्वातंत्र्याचा हुंकारही जनसामान्यांना ऐकू आला. आमच्या देशातील इंग्रजांचे आगमन ही नियतीचं जमु देणच आहे असे अनेकांना वाटले. त्याचे कारण काय? इंग्रजांनी आपल्याबरोबर जे विचार आणले होते, जे राजकीय व सामाजिक तत्वज्ञान आणले होते, त्यात एक प्रकारची विमोचक शक्ती होती, याचा प्रत्यय प्रषमतः महाराष्ट्रातील विचारवंतांना व नंतर सामान्य मराठी जनतेला येऊ लागला. त्यांनी आपल्याबरोबर आणलेल्या विचारांच्या व संकल्पनांच्या आधारावर या ठिकाणच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाला हळूहळू संस्थात्मक रूप मिळू लागले. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रात सुधारणावादी युगाचा शुभारंभ झाला हे मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छतो. या ठिकाणची मध्ययुगीन रात्र संपून आधुनिक युगाची पहाट झाली होती. आपली राज्यव्यवस्था मजबूत करण्याचा इंग्रजींनी प्रयत्न केला ही गोष्ट खरी असली तरी त्यांनी आपल्या बरोबर आणलेल्या विचारांमध्ये आमच्या विचारवंतांनी व समाज सुधारकांनी नवीन समाज व्यवस्थेसाठी व सांस्कृतिक नवनिर्मितीसाठी आवश्यक असणा-या दिशा व प्रेरणा धुंडाळण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या साहित्यात राजकीय आणि सामाजिक तत्वज्ञानात मानवतावादाच्या व स्वतंत्र्याच्या प्रेरणा व भावना दडलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या प्रशासनात उदारमतवादाला स्थान मिळाले होते. त्यात लोकशाहीचे संकेत होतेच. कल्याणकारी राज्याचे विचारबीज इंग्रजांच्या उदारमतवादी धोरणात होते. आणि म्हणूनच त्या सर्व गोष्टींचा परिणाम येथील वैचारिक व सामाजिक जीवनावर झाला हे निराळे सांगण्याची आवश्यकता नाही.

महाराष्ट्राच्या वैचारिक जीवनावर सखोल परिणाम घडविणा-या ज्या काही घटना १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात व उत्तरार्धात या ठिकाणी घडल्या त्यात तीन घटना माझ्यामते अतिशय महत्वाच्या आहेत. आणि त्या म्हणजेः १) नवीन शिक्षण पद्धती; २) वैचारिक प्रबोधन; आणि ३) नवीन विधि व न्याय व्यवस्था. प्रामुख्याने या तीन गोष्टींनी आमची मानसिकता घडविली असे माझे मत आहे. या तिन्ही गोष्टींनी निर्माण केलेल्या वैचारिक मुशीत या ठिकाणचे राजकीय व सामाजिक मन ढाळले गेले असे मी म्हणालो तर त्यात कसलीच अतिशयोक्ती होणार नाही. आमच् विचारवंतांच्या, धर्म व समाजसुधारकांच्या विचारसरणींची जडणघडण या घटनांनी किंवा गोष्टींनी निर्माण केलेल्या वैचारिक आणि मानसिक वातावरणात झाली हे वेगळे सांण्याची आवश्यकता मला वाटत नाही. महाराष्ट्रातील कालच्या व ब-याचअंशी आजच्या राजकारण व समाजकारणाची पाळं-मुळं आपल्याला मुख्यतः या घटनांमध्येच आढळतील. म्हणूनच मी त्यांची माहिती आपल्याला देतो आहे.