व्याख्यानमाला-१९८०-६

महाराष्ट्राच्या एकसंघ राजकीय विचाराचा syntax आज अशाच प्रकारे विस्कटल्यामुळे त्याचे जे विघटन व नष्टचर्य झाले आहे ते अतिशय दुःखदायी आहे. महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाचा syntax पुन्हा बांधण्यासाठी यशवंतरावांचे विचार उपयोगी पडतली अशी माझी प्रामाणिक धारणा आहे. स्वतः यशवंतरावजी हा राजकीय syntax जोडण्याचा प्रयत्न करतीलच त्यांना त्यात यश मिळेल किंवा नाही हे मी आज सांगू शकणार नाही. पण त्यांच्या विवेकशील व विधायक विचारांचा आधार घेतल्याशिवाय महाराष्ट्राला आपल्या राजकीय जीवनाचा syntax जोडता येणार नाही हे मी आपल्याला निःसदिग्ध शब्दात सांगू इच्छतो. राजकारण हे केवळ सत्तेमुळे सामर्थ्यशाली होत नसते. ख-या अर्थाने सामर्थ्यशाली होण्यासाठी त्याला वैचारिक शक्तीची आवश्यकता असते. वैचारिक बांधिलकीचा त्याग करून सत्तेच्या मागे लागलेल्या लोकांकडे बघून मला The Emperor’s New clothes या लोककथेची आठवण होते. आपण ती अवश्य वाचावी. ती सांगण्यात मी आपला वेळ खर्च करू इच्छित नाही.

मित्रहो, राजकारणाला जेव्हा सामाजिक आशय प्राप्त होतो तेंव्हाच ते अर्थपूर्ण होते. हा विचार अधिक विस्ताराने आपल्या समोर मांडावा म्हणूनच मी “महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणः कालचे, आजचे व उद्याचे” हा विषय निवडला आहे. केवळ दोन व्याख्यानामध्ये मला या विषयाची मांडणी आपल्या समोर करावयाची आहे. वेलेच्या अभावी मी या विषयाला पूर्ण न्याय देऊ शकणार नाही. याची मला जाणीव आहे. आजच्या व्याख्यानात मी महाराष्ट्रातील कालच्या राजकारणाचा व समाजकारणाचा केवळ मागोवा घेणार आहे. १८१८ ते १९३५ पर्यंतच्या एका प्रदीर्घ कालखंडाचा आजच्या या व्याख्यानात मी धावता आढावा घेणार आहे. या कालखंडात ज्या राजकीय व सामाजिक घटना व चळवळी झाल्या त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देणार आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात १८१८ हे एका युगांताचा निर्देश करणारं वर्ष आहे, तर १९३५ हे एका युगांतराचं दिग्दर्शन वर्ष आहे. १८१८ साली पेशवाई बुडाली आणि एका सामाजिक दुःस्वप्नाचा अंत झाला. पण त्याच बरोबर आपल्या हातून काहीतरी हरवल्याची तीव्र जाणीवही मराठी मनाला झाली. वस्तुतः पेशवाईच्या शेवटच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या स्वराज्याचा आणि मराठी संतांना अभिप्रेत असलेल्या समतेचा आशय पूर्णतः संपुष्टात आला होता. महाराष्ट्रातील सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्वाच्या सूत्रात बांधणारा कसलाच विचार किंवा ध्येयवाद या काळात उरला नव्हता. उलट या ठिकाणचा बहुजन समाज सामाजिक गुलामगिरीचे निकृष्ट जीवन जगत होता. सावकारी पाशात व पुरोहितशाहीच्या जाचात तो संपूर्णतः जखडला गेला होता. शिवाजी महाराजांनी स्नानसंधेसाठी उपलब्ध करून दिलेलं पाणी हे पेशवाईच्या काळात पुरोहितशाहीने पूर्णतःच गढूळ करून टाकलं होतं हे आपल्याला माहित आहेच. पण ते देखील येथील अस्पृश्य समाजाला पिण्यासाठी मिळू शकत नव्हतं. महाराष्ट्रातला पददलित समाज अमानुषतेच्या टाचेखाली सर्वस्वी सापडला होता. आणि म्हणूनच पेशवाई बुडाल्याचा आनंद सामाजिक व आर्थिक विषमतेला बळी पडलेल्या लोकांनी व्यक्त केला. ते स्वाभाविकही होते. पण परकियांची सत्ता येथे प्रस्थापित झाल्यामुळे एक सूप्त खंतही मराठी मनाला बोचत होती. स्वत्व गमावल्याची तीव्र जाणीव बुद्धिवादी महाराष्ट्राला होणे क्रमप्राप्त होते. तेव्हा असा प्रकारे एका संमिश्र भावनेत (ambivalent feeling) मराठी मन सापडले होते.

पेशवाई बुडाल्यानंतरचा काळ हा मराठी जनतेसाठी मानसिक दृष्ट्या पुनर्वसनाचा व सामाजिकदृष्ट्या पुनर्बांधणीचा काळ होता. वस्तुतः तो स्वतःला सावरण्याचा, सावरून उभे राहाण्याचा उभे राहून दिशा निर्धारित करण्याचा व दिशा निर्धारित करून पुढे चालण्याचा काळ होता. इंग्रजांच्यासाठी तो स्वतःचे पाय खंबीरपणे रोवून आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याचा काळ होता. वस्तुतः महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनातील ती संक्रमणावस्था होती. महाराष्ट्राला एक नवीन मानसिकता निर्माण करण्याची व घडविण्याची आवश्यकता होती. राजकीय व सामाजिकदृष्ट्या एका वेगळ्या अवस्थांतराच्या संदर्भातच ती निर्माण करणे किंवा घडविणे अपरिहार्य होते. इंग्रजांनी आपल्याबरोबर जे विचार आणले, जी जीवनमूल्ये आणली आणि ज्या संकल्पना आणल्या त्या येथे रूजण्यासाठी बराच कालावधी लागला यात शंका नाही. इंग्रज भारतात आले ते White man’s burden ची संकल्पना घेवून, हे आपण विसरता कामा नये.