व्याख्यानमाला-१९८०-१०

वैचारिक प्रबोधनाच्या प्रक्रियेतून सुधारणावादाचा प्रवाह महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये निर्माण झाला. या देशात पूर्वी जे काही प्रबोधन घडले असेल ते केवळ धार्मिक आणि अध्यात्मिक स्वरूपाचे प्रबोधन होते. पण या प्रबोधनातून आम्हाला जडवादी अर्थात इहवादी दृष्टी मिळाली. त्यामुळे भौतिक जीवनाच्या गरजा ह्या अध्यात्मिक जीवनाच्या गरजांपेक्षा कमी महत्वाच्या नसतात ही गोष्ट आमच्या लक्षात आली. सामाजि व व्यक्तीस्वातंत्र्याची संकल्पना आमच्या वैचारिक जीवनात निर्माण झाली. आम्ही आमच्या धर्मग्रंथांचा, धार्मिक व सामाजिक चालीरितींचा, कला-साहित्याचा, तत्वज्ञान व इतिहासाच नव्याने विचार करायला सुरुवात केली. त्यांचा पुनर्विचार करून त्यांची मूल्यधारणा आमच्या विचारवंतांनी निश्चित केली. पोथी-पुराणातून आणि धार्मिक कर्मकांडातून बाहेर पडल्या शिवाय या देशाची प्रगती होणार नाही  निष्कर्षाप्रत आम्ही येऊन पोचलो. त्यामुळे आम्हाला सामाजिक वास्तवाचे भान झाले. सत्यसंशोधनाची निकड भासली. विज्ञानाची कास धरल्याशिवाय भौतिक जीवनाच्या समस्या सोडवता येणार नाहीत याची जाणीव प्रकर्षाने आमच्या मनात निर्माण झाली. समाज प्रबोधन हे राष्ट्राचे आत्मसंशोधन आणि आत्मपरिक्षण असते. आमच्या सामाजिक जीवनाला अंधारातून प्रकाशाकडे घेवून जाणारी ही वैचारिक यात्रा होती. आमच्या प्रतिमेने नवनवोन्मेषशालिनी होण्याचे स्वप्न याच यात्रेत पाहिले होते यात शंका नाही. थोडक्यात, या वैचारिक प्रबोधनामुळे भारतात एका अर्थाने प्रकाशयुगाचा आरंभ झाला. इंग्रज या देशात आले नसते तर अशा प्रकारचे प्रबोधन झाले असते किंवा नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे.

मित्रोहो, इंग्रजी अमदानीच्या आरंभकाळी तिसरी एक तितकीच महत्वाची घटना आमच्या देशात घडली; आमि ती म्हणजे एका नव्या विधि व न्याय व्यवस्थेचे आगमन येथे झाले. आमच्या देशातील न्याय व्यवस्था धार्मिक व सामाजिक विषमतेवर आधारलेली होती. एक व्यक्ती, एक मूल्य (One man, one valu) हे तत्व आमच्या विधी व्यवस्थेत व न्याय प्रणातील व परंपरेत बसणारे नव्हते. ब्रिटिशांनी आमच्या देशात आमच्या इतिहासाला व समाजाला अपरिचित असलेले एक नवी Jurisprudence या देशात आणले त्याचा येथील समाजाच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम होणे अपरिहार्य होते. इंग्रजी शिक्षणाचा लाभ सर्व जनतेला मिळणे शक्य नव्हते; वैचारिक प्रबोधनाचा सूर्य सगळ्यांच्याच घरावर उगवणे शक्य नव्हते; पण इंग्रजांच्या कायद्यांचा व न्यायव्यवस्थेचा फायदा मात्र सर्व जातीजमातीतील लोकांना सारख्याच प्रमाणात मिळणे क्रमप्राप्त होते.

ब्रिटिश अमदानीच्या काळात आमच्या देशात जी शासन प्रणाली व न्यायन्यवस्था आली तिची दोन प्रमुख वैशिष्ट्ये होती. Rule of law आणि Equality before the law या दोन सिद्धांतांवर ती आधारलेली होती. “कायद्याचे राज्य” आणि “कायद्यापुढे समानता” या दोन तत्वांवर आधारलेले न्यायशास्त्र आणि विधिविज्ञान आमच्या परंपरेला अगदी नवीन होते. आमच्या देशातली न्यायव्यवस्था हिंदुधर्मशास्त्राव आधारलेली होती. हिंदुधर्मशास्त्रज्ञांनी वर्णव्यवस्थेचा तथा जातिभेदाचा पुरस्कार सातत्याने केला. वर्णव्यवस्थेच्या विकृतीतून या देशात जातिव्यवस्था अस्तित्वात आली. आणि त्या जातीव्यवस्थेने भारतीय समाजाचे अतिशय मोठ्या प्रमाणावर विघटन केले. ती सामाजिक व आर्थिक विषमतेचे माहेर घर बनली हे सांगण्याची आवश्यकता तरी आहे कां? आणि हे सर्व घडले धर्माच्या नावावर, धर्मशास्त्राचा हवाला देऊन आणि ईश्वराला साक्षी ठेवून! या व्यवस्थेच्या सच्चेपणाला कुणीही आव्हान दिले नाही, ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. एकाही हिंदूराजाने परंपरेने चालत आलेली ही कायदा पद्धती व न्यायव्यवस्था बदलण्याचा विचार केला नाही. वर्णव्यवस्थेवर आधारलेल्या समाजात सगळ्यांसाठी एकच कायदा असणे शक्य नव्हते. येथील जातिपंचायती पंचांच्या मुखात परमेश्वराचे शब्द शोधीत होत्या. हिंदूंच्या समाजसुधारणेसाठी मनुस्मृती अर्थात येथे होतीच. ती वाचल्यानंतर कशा प्रकारच्या भयावर विषमतेचे पालनपोषण या देशात झाले होते याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. मुसलमानी राजवटींनी देखील हिंदूसाठी हीच व्यवस्था अनुसरली. आणि म्हणूनच या ठिकाणी समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असणारे कायदे होऊ शकले नाहीत पण इंग्रजी अमदानीने हे चित्र बदलले. आमच्या देशात त्यांनी सुधारणाप्रवण कायद्यांची निर्मिती केली. १८२९ सालीच कायद्याने सती चाल बंद करण्यात आली. १८४३ साली गुलामांचा व्यापार करण्याची प्रथा कायद्याने बंद करण्यात आली. विधवा विवाहाचा कायदा १८५६ साली पास करण्यात आला. १८५८ साली राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्या जाहीरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्षितेचे तत्व अंतर्भूत होते. धर्मस्वातंत्र्य आणि सर्वधर्मांना सारखी वागणूक देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. १८५६ साली मिश्र विवाहाला मान्यता देणारा कायदा पास झाला. या कायद्याने जातिभेदाच्या मुळावरच प्रहार केला. इंग्रजांनी या देशात जी दंडसंहिता (Criminal Code) तयार केली ती तर अतिशय क्रांतीकारी स्वरूपाची होती. १८६० साली इंडियन पिनल कोड अमलात आले. खरे तर या कायद्याने आमच्या समाज जीवनात व आमच्या सामाजिक मानसिकतेत अमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. या दंड विधानाने येथील धर्मव्यवस्थेच्या व जातिव्यस्थेच्या उत्तरंडीवर फार मोठा आघात केला. येथील समाजव्यवस्थेच्या वेगवेगळ्या पाय-यांवर बसलेल्या लोकांना समपातळीवर त्याने उभे केले. या व अशा अनेक कायद्यांनी महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या कार्याला गती देण्याचेच कार्य केले.