व्याख्यानमाला-१९८०-३

कराड नगरपरिषदेचे अध्यक्ष माननीय श्री. पी. डी. पाटील, नगरवाचनालयाचे ग्रंथपाल श्री. व्ही. व्ही. पाटील आणि बंधु-भगिनींनो :

आपल्या या शहरातील नगरपरिषदेच्या नगरवाचनालयाच्या वतीने माननीय श्री. यशवंतरावजी चव्हाण यांच्या नावाने १९७३ पासून प्रतिवर्षी व्याख्यानमाला आयोजित केली जाते ही अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. कराडच्या या श्रेष्ठ नागरिकाचा वाढदिवस आपण या व्याख्यानमालेच्या रूपाने साजरा करता ही गोष्ट तर मला फारच नाविन्यपूर्ण व अर्थपूर्ण वाटते. अशाप्रकारची व्याख्यानमाला कराडसार्ख्या छोट्या शहराच्या वैचारिक जीवनाची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने महत्वाची ठरते यात शंकाच नाही. कराडची नगरपरिषद एक उत्कृष्ट वाचनालय चालविते आणि त्या वाचनालयाच्या वतीने ही व्याख्यानमाला दरवर्षी चालविली जाते ही बाब मला खरोखरच महत्वाची व मोलाची वाटते. अशा प्रकारचा अभिनव प्रयत्न महाराष्ट्रातील फारच थोड्या नगरपालिका करीत आसाव्यात आपल्या या अभिजात उपक्रमाची माहिती होताच मला ग्रीक देशातील अथेन्स या प्राचीन नगरीची आठवण झाली. या ऐतिहासिक ग्रीकनगरीने आपल्या नागरिकांची सांस्कृति अभिरूची वाढविण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक व राजकीय जीवनाची पातळी उंचावण्यासाठी खूप प्रयत्न केले होते हे आपणास माहित असेलच. आपल्या नागरिकांची वैचारिकता घडविण्याचा एक शानदार व स्तुत्य प्रयास अथेन्स नगरीने केला होता. लोकशाहीच्या संकल्पनेचा विकास आणि तिचे परिपोषण या प्राचीन शहरात जेवढे झाले तेवढे क्वचितच दुसरीकडे कोठे झाले असेल. आणि म्हणूनच ही नगरी सॉक्रेटीस सारख्या महान तत्वज्ञाची खरीखुरी कर्मभूमि ठरली. सॉक्रेटीस सारख्या महान तत्वज्ञानाची खरीखुरी कर्मभूमि ठरली. सॉक्रेटीस म्हणजे या शहराच्या रस्त्यारस्त्यातून फिरणारे विद्यापीठ! या शहराच्या प्रत्येक चौरस्त्यावर लोकशाही विचाराचे मंच या तपस्वी विचारवंताने निर्माण केले होते. लोकशाहीचा विचार प्रत्येक नागरिकाच्या दारापर्यंत पोचवण्याचे काम या महापुरुषाने केले होते. म्हणूनच लोकशाही जीवनाचा पहिला रखवालदार (Watchman) होण्याचा मान त्याला मिळाला, परखड विचारांचा असूड हातात घेऊनच त्याने आपली सगळी हयात घालविली. विचारांच्या परखडपणासाठी लागणारी किंमतही त्याला द्यावी लागली ही गोष्टही आपल्याला माहित आहेच. एखाद्या ठिकाणचं वैचारिक वातावरण अशा व्यक्तीशिवाय निर्माण होत नसतं हे सत्य आहे. आणि वस्तुतः अशा प्रकारच्या वैचारिक वातावरणाशिवाय नवनवीन विचारांना जन्मही मिळू शकत नाही; आणि तो मिळालाच तर त्या विचारांची व्हावी तेवढी वाढ होऊन शकत नाही हेही तितकेच सत्य आहे.

मित्रहो, आपल्या या कराड शहरात विचारांना जन्म देणारं आणि त्यांचं भरणपोषण करणारं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या की वर्षांपासून अगदी सातत्याने होतो आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात अशा प्रकारचे उदंड प्रयत्न होतात, पण त्यांच्याविषयी आपल्याला आश्चर्य वाटण्याचे फारसे कारण नाही. उलट कराडसारख्या एखाद्या छोट्या शहरात नगर परिषदेसारखी एखादी संस्था अशा प्रकारचा उपक्रम हाती घेते ही गोष्ट पूर्णतः नवलाईची नसली तरी अनुकरणीय मात्र खचितच आहे, असे मला वाटते. अशा प्रकारचे अर्थपूर्ण उपक्रम आता गावागावातून केले पाहिजेत, झाले पाहिजेत. सर्वसामान्य लोकांचं वैचारिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी नवनवीन विचारांचं पाणी आता गावागावातील पाणवठ्यांवर मिळालं पाहिजे. अशा प्रकारचे विविध असे वैचारिक उपक्रम हाती घेतल्याशिवाय समाज प्रबोधनाचं कार्य महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांपर्यंत जाऊन पोहोचणार नाही. ‘गाव तिथे ग्रंथालय’ आणि ‘वाचक तिथे विचार’ अशा नव्या म्हणी आता रूढ झाल्या पाहिजेत असे मला वाटते; आणि म्हणूनच प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावात वाचनालय चालवावे आणि वैचारिक वातावरण निर्माण करण्यासाठी डोळसपणे प्रयत्न करावेत असं मला प्रामाणिकपणे वाटते. अलीकडे ग्रामीण भागात झालेला शिक्षण प्रसार लक्षात घेतला तर अशा प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे आणि तशा प्रयत्नांना वावही भरपूर आहे. आपल्या या पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी अशा प्रकारचे प्रयत्न होत आहेत ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. वैचारिक जीवनाची पातळी उंचावणा-या अशा प्रकारच्या प्रयत्नांना चळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय ग्रामीण महाराष्ट्राला ख-या अर्थाने समाज परिवर्तन घडवून आणता येणार नाही. अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. लोकशाही जीवनाच्या कक्षा विस्तारम्यासाठी तर ही गोष्ट फारच आवश्यक आहे. लोकशाहीचा विचार grass roots पर्यंत नेल्याशिवाय सामाजिक प्रबोधनाची व पर्यायाने सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया बळकट होणार नाही, ही गोष्ट आपण घेतली पाहिजे.