व्याख्यानमाला-१९८०-५

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर त्याच्या उज्वल भवितव्याचे स्वप्न यशवंतरावजींनी आमच्या समोर उभं केलं होतं. महाराष्ट्राच्या भवितव्याची सफर नेमकी कोणत्या दिशेत होणार आहे आणि कोणत्या मार्गांवरून होणार आहे, याची कल्पना त्यांनी आम्हाला दिली होती. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना महाराष्ट्राची प्रातिनिधिक प्रतिकं मानून एकात्म मराठी मनाच्या व समाजाच्या नवनिर्मितीचा यशवंतरावजींनी जो विचार मांडला होता तो त्यांच्या दृष्टीची झेप व ध्येयाची उंची दाखविणारा विचार होता हे मी आपल्याला सांगू इच्छतो. इतिहासाचे भान असणा-या आमच्या या नेत्याने आपली दृष्टी सातत्याने खिळविली होती ती भविष्याच्या उत्तुंग क्षितिजावर! भविष्याच्या दाराचा उंबरठा वर्तमान काळाच्या छातीवर असतो. हे मी आपल्याला सांगू इच्छतो. तो ओलांडूनच आतील दालनात प्रवेश करावा लागतो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतरावांनी आम्हाला या उंबरठ्यावर उभे केले होते. महाराष्ट्रातील सर्व जातीजमातीतील लोकांना प्रगतीच्या सर्व वाटा मोकळ्या झाल्या पाहिजेत, हा विचार त्यांनी बोलून दाखविला होता. आणि तो विचार साकार करण्यासाठी ते वचनबद्ध व कृतिशील राहिले. महाराष्ट्र राज्य हे एका विशिष्ट जातीचं राज्य बनणार नाही, तर ते येथे राहणा-या सर्व जातीधर्मातील लोकांचं राज्य बनेल याची ग्वाही त्यांनी आम्हांला दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वर्धिष्णू राज्याचे स्वप्न बघितले होते त्याच्या परिपूर्तीसाठी आम मराठी जनतेला प्रतिबद्ध होण्याचे त्यांनी आवाहन केले होते. शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही नव्याने महाराष्ट्राची राजमुद्रा बनली ती आपल्या अपूर्ण स्वप्नाच्या पूर्तीसाठीच ना? महाराष्ट्रातील विविध विभागांचा विचार जसा त्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भातच केला. महाराष्ट्राचा विचारही त्यांनी भारताच्या संदर्भातच केला. महाराष्ट्राच्या भवितव्याचे चित्र भारताच्या विशाल कॅनव्हासवरच चितारावे लागेल याचे भान त्यांनी सतत बाळगलेले आहे. भाषावाद किंवा प्रादेशिक वादाच्या संकुचित विचाराला त्यांनी थारा दिला नाही. यशवंतरावांना आपल्या आयुष्यात राज्यपातळीवरून राष्ट्रीयपातळीवर नेतृत्व करण्याची जी संधी उपलब्ध झाली तिचे रहस्य एकात्मतेसाठी आसूसलेल्या त्यांच्या या विशाल व विधायक दृष्टीत आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. त्यांच्या राजकारणामागे सातत्याने हे विधायक विचारसूत्र उभे आहे याची आठवण मी करून देत आहे एवढेच.

माननीय यशवंतरावांनी आपल्या आयुष्यात प्रामुख्याने दोन गोष्टींवर निरतीशय प्रेम केलं आहे. त्या कोणत्या दोन गोष्टी आहेत? शब्द आणि माणसं याच त्या दोन गोष्टी आहेत. शब्दांच्या व माणसांच्या सामर्थावर त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या शक्ती-सामर्थ्यावरच त्यांनी महाराष्ट्रातील व या देशातील राजकारणात भाग घेतला व आपला स्वतःचा वाटा उचलला. शब्दवेडा व माणूसवेडा हा नेता आहे. अर्थसंपन्न व आसयगर्भ विचार व्यक्त करण्यासाठी शब्द आणि तितकेच भावपूर्ण व कर्तृत्वसंपन्न राजकारण करण्यासाठी माणसं त्यांना हवी होती, हवी आहेत.

यशवंतरावांची Literary Vocabulary जेवढी समृद्ध आहे. तितकीच त्यांची Political Vocabulary सुद्धा समृद्ध आहे. या नेत्याचा ‘शब्दकोश’ आणि ‘मानुषकोश’ अतिशय संपन्न असल्यामुळेच त्याला राजकारणामागे माणसं आणि माणसांच्यामागे विचार उभे करता येऊ शकले. शब्दांनी त्याला वक्तृत्वाची देणगी दिली आणि माणसांनी त्याला कर्तृत्वाचे अभिवचन दिले.

पण कधीकधी शब्द हे वाक्यातील आपली स्वतःची स्थानं सोडून जातात आणि अर्थशून्य बनतात. संदर्भ सोडून दूर गेलेल्या शब्दांना त्या संदर्भांचा शोध घेतल्याशिवाय, परत आपल्या स्थानी आल्याशिवाय अर्थच सापडत नाही. माणसांची परिस्थिती देखील कधीकधी अशीच होते. ज्या व्यक्तीने त्यांना राजकीय किंवा सामाजिक जीवनात संदर्भ दिले त्या व्यक्तीला सोडून जेव्हा ते दूर जातात तेव्हा ते स्वतःच्या संदर्भापासून अलिप्त होतात व अर्थशून्य बनतात. यशवंतरावांच्या शब्दांनी आपले संदर्भ सोडले नाहीत म्हणूनच त्यांच्या शब्दांनी व्यक्त केलेला आशय हरवला नाही व विचार विसकटला नाही. पण त्यांनी जोडलेल्या ब-याच माणसांनी मात्र आपले संदर्भ सोडले आहेत. सत्तेच्या राजकारणाने त्यांना निःसंदर्भ केले आहे. आणि म्हणूनच त्यांच्या राजकारणाला फारसा अर्थ राहिलेला नाही. वाक्याचा syntax विस्कटल्यानंतर शब्दांमधला अर्थ गळून पडतो. तो syntax पुन्हा प्राप्त केल्याशिवाय त्या शब्दांना अर्थवादी व आशयग्वाही होता येत नाही.