व्याख्यानमाला-१९७९-४१

डॉ. आंबेडकर हे बंगालमधून घटना परिषदेवर निवडून आल्यामुळे पाकिस्तान राष्ट्राची निर्मिती झाल्याबरोबर त्यांचे सभासदत्व आपोआपच रद्द झाले. परंतू सुदैवाने डॉ. मुकुंदराव जयकर हे मुंबई असेंब्लीतून घटना परिषदेवर निवडून गेले होते. त्यांनी आपल्या जागेचा राजिनामा दिल्यामुळे डॉ. आंबेडकरांनी व्हॉयसरॉयचे सल्लागार मंडळ, एक्झिक्युटिव्ह कौन्सिल यामध्ये सल्लागार व मंत्री म्हणून जी कर्तबगारी दाखविली होती त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरुंनी मुंबई विधानसभेत डॉ. आंबेडकरांची निवड केली. व डॉ आंबेडकर पुन:श्च घटना परिषदेचे सभासद म्हणून निवडून आले. त्यानंतर विद्यमान भारतीय घटना तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. डॉ. आंबेडकरांनी जगातील लोकशाहीवादी राष्ट्राच्या घटनांचा कसून अभ्यास केला. हिंदुस्थानातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, वर्गभेद, वर्णभेद यांचा बारकाईने अभ्यास केला. आणि घटनेचा मसुदा तयार केला. त्यावर वर्षभर चर्चा होऊन जरुर त्या दुरुस्त्या करुन हिंदुस्थानची घटना तयार झाली आणि डॉ. आंबेडकर त्या घटनेचे शिल्पकार ठरले.

डॉ. आंबेडकरांची एक फार मोठी मनीषा होती की आपण विधिमंत्री आहोत तो पर्यंत हिंदूकोड बिल प्राप्त करुन घ्यावे म्हणून त्यांनी हिंदू कोडाचा नव्याने मसुदा तयार केला. हिंदूकोडामध्ये जे नाना प्रकारचे भेद होते ते काढून संबंध हिंदूना जात, पात, पथ विरहित एकच कायदा करावा हा त्यांचा मानसं होता. पं. जवाहरलाल नेहरुंनी हिंदूकोडबिल लवकरात लवकर पास व्हावे म्हणून आपली इच्छा प्रदर्शित केली होती. आणि हिंदू कोडंबिल पास झाले नाहीतर आपण पंतप्रधानकीचा राजिनामा देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु दुर्दैवाने ही गोष्ट घडली नाही. फक्त हिंदू कोडातील विवाह व घटस्फोट हे बिल विचारासाठी पार्लमेंटपुढे आले त्यांची जेमतेम ४ कलमे पास झाली आणि ते बील गाढून टाकण्यात आले. हे बिल गाढल्यानंतर त्यांच्याबद्दल डॉ. आंबेडकर म्हणतात कोणी अश्रूही ढाळले नाहीत व कोणाला वाईटही वाटले नाही याची खंत डॉ. आंबेडकरांना एकसारखी वाटत होती.

स्पृश्य समाजाने डॉ. आंबेडकरांनी ज्या ज्या चळवळी केल्या त्या चळवळींना पाठिंबा दिला असता तर आंबेडकरांनी कदाचित धर्मांतर केलेही नसते. चवदार तळ्याला सत्याग्रह, अस्पृश्यांना राखीव जागा, काळाराम मंदिर प्रवेश, हिंदूकोड बिल या सगळ्यांना स्पृश्य समाजाने हडसून खडसून विरोध केला आणि, डॉ. आंबेडकरांचे स्वप्न भंग पावले.

घटना कायदा १९५० साली अमलात आल्यानंतर आणि हिंदु बिलाची वासलात लागल्यानंतर डॉ. आंबेडकर मंत्रिमंडळातून बाहेर पडले आणि त्यांनी पार्लमेंटच्या अगर राज्यसभेच्या निवडणुका लढविण्याचा प्रयत्न केला परंतु संयुक्त मतदार संघ प्रत्येक ठिकाणी आड आल्यामुळे डॉ. आंबेडकरांपेक्षा कमी कृवतीची माणंस निवडून आली आणि डॉक्टरांना पराभवावर पराभव पत्करावे लागले.

डॉ. आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार म्हणून आपण त्यांचा गौरव करतो. आधुनिक मनू म्हणून त्यांना वंदन करतो. परंतु मनू म्हणून त्यांना वंदन करतो. परंतु डॉ. आंबेडकरांची बुद्धिमत्ता त्यांचं पांडित्य, त्याचे व्यक्तिमत्त्व, त्याचं कर्तृत्व हे निवडणुकीच्या राजकारणात माती-मोल ठरलं ही भारताच्या राजकारणातील एक शोकांतिका आहे.

१९३५ साली येवले येथे धर्मांतराची घोषणा केल्यानंतर मधला काळ त्यांचा राजकीय उलाढालीत गेला. १९५० सालापासून पुढे त्यांना बोद्ध धर्माचा सखोल अभ्यास केला. हिंदू समाजाच्या मनोवृत्तीमध्ये काही फरक पडत नसल्यामुळे त्यांनी धर्मांतराची केलेली घोषणा अंमलात आणण्याचे ठरविले 'बुद्ध आणि त्याचा धम्म' हा ग्रंथ लिहून त्यांनी १२०० वर्षांपूर्वी परागंदा झालेला बौद्ध धर्म परत हिंदुस्थानात आणला आणि १९५६ च्या ऑक्टोबरमध्ये आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बौद्ध धर्मामध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधूता या तीन गोष्टी प्रामुख्याने त्यांना आढळून आल्या.