व्याख्यानमाला-१९७९-१७


अध्यक्ष महाराज आणि बंधू भगिनीनो! 'महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे टप्पे' या विषयावर आपण माझी दोन व्याख्याने आयोजित केलेली होती त्यापैकी पहिल्या दोन टप्प्यासंबंधीचा उहापोह कालच्या व्याख्यानात करुन या विषयाचा पूर्वार्ध संपविला. आज राहिलेल्या दोन टप्प्यांसंबंदी माहिती देऊन या विषयाचा उत्तरार्ध पुरा करणार आहे.

पहि्या टप्प्याचा केंद्रबिंदू मुंबई हा होता तर दुस-या टप्प्याचा केंद्रबिंदू पुणे हा होता. पहिल्या टप्प्याने प्रतिनिधित्व बाळशास्त्री जांभेकर यांचेकडे जाते. तर दुस-या टप्प्याचे नेतृत्व म. जोतिबा फुले यांचेकडे जाते.

काल मी आपणास सांगितल्याप्रमाणे सामाजिक चळवळी करणारी मुंबई, पुण्यातील मंडळी नाहीशी झाल्यानंतर या चळवळीच्या भवितव्याबद्दल चिंता निर्माण झालेली होती. परंतु महाराष्ट्राच्या सुदैवाने या सामाजिक क्रांतीच्या शितिजावर छ. शाहू महाराजांचे रुपाने एक नवा तेजस्वी आणि दिप्तिमान सायंतारा उगवला आणि त्यांनी १८९४ सालापासून ते १९२२ सालापर्यंत म्हणजे जवळ जवळ २८ वर्षे या सामाजिक क्रांतीचे नेतृत्व केले.

छ. शाहू महाराजांचा जन्म १८७४ साली कागलच्या घाटगे घराण्यात झाला. १८८४ साली ते कोल्हापूर संस्थानच्या छत्रपती घराण्यात दत्तक म्हणून गादीवर आले व त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाडला त्यांचे शिक्षण झाले. या कालात त्यांनी भारतभर प्रवास केला. १८९४ साली त्यांच्या हातात संस्थानची राज्यसूत्रे आली. हनुमानाने जन्म झालेंबरोबर सूर्यबिंबाच्या दिशेने उड्डाण केले त्याच प्रमाणे महाराजांनी राज्यसूत्रे हातात आल्याबरोबर वयाच्या फक्त २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानात त्यावेळी प्रचलित असलेली वेठबिगार पद्धती बंद केली. इंग्रजीत "Forced Labour" म्हणतात तीच ही वेटबिगार पद्धती. वीस वर्षाचा मुलगा पण त्याची दृष्टी किती विशाल होती हीच गोष्ट आपल्याला या वरुन दिसून येते. हिंदुस्थान १९४७ साली स्वतंत्र झाला. त्यानंतर पं. जवाहरलाल नेहरुंच्यासारखा जगविख्यात थोर पुरुष भारताचा पंतप्रधान झाला. त्यांच्या नंतर लालबहादूर शास्त्री व श्रीमती इंदिरा गांधी भारताचे पंतप्रधान झाले आणि जवळ जवळ २९ वर्षे हिंदुस्थानामध्ये काँग्रेसची अबाधित राजवट होती. पंरतू वेठबिगार पद्धती बंद करण्याची कल्पना पं. जवाहरलाल नेहरुंना, शास्त्रीना अगर इदिराजीना १९७६ पर्यंत सचली नाही मात्र इंदिराजी पंतप्रधान असताना १९७६ सालच्या जानेवारी महिन्यात आणिबाणी चालू असता लोकसभेने वेठबिगार बंद करण्याचा कायदा केला.

म्हणजे हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर वेठबिगार रद्द होण्याला २९ वर्षे लागली. तो कायदा छ. शाहू महाराजांनी राज्यसूत्रे हाती घेतल्याबरोबर म्हणजे १८९४ साली केला या गोष्टीवरुन 'दृष्टे पुरुष कालाचे पुढे असतात' या म्हणीची प्रचीती आल्याशिवाय रहात नाही.

१८९४ साली महाराजांनी राज्यसूत्रे हाती घेतली त्या वेळी झालेल्या समारंभास हजर राहणेसाठी पुण्याच्या 'सार्वजनिकसभे'चे एक शिष्टमंडळ कोल्हापूरला आलेले होते. कै. ना. गोपाळ कृष्ण गोखले यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. सार्वजनिक सभेतर्फे या शिष्टमंडळाने महाराजांना एक मानपत्र दिले. त्या मानपत्रामध्ये त्यांनी महाराजांना उद्देशून 'तुम्ही छत्रपति घराण्यात जन्माला आलेला आहात. छत्रपतींच्याकडे महाराष्ट्राचे नेतृत्व नैसर्गिक असते. तुम्ही कोल्हापूर संस्थानचे अधिपती असल्यामुळे कोल्हापूरच्या जनतेची काळजी घेणे हे तुमचे परमपवित्र कर्तव्य आहेच पण त्याचबरोबर सर्वसामान्यपणे महाराष्ट्राच्या जनतेची काळजी घेणे हे देखील छत्रपती या नात्याने आपले कर्तव्य आहे' अशा आशयाचे उद्गार छत्रपतींना उद्देशून ना. गोखले यांनी मानपत्रात नमूद होते. राज्यसूत्रे हाती घेतल्यानंतर दुस-याच दिवशी कै. लो. बाळ गंगाधर टिळक यांनी केसरीमध्ये 'करवीर क्षेत्री कपिलाषष्ठीचा योग' असा मथळा देऊन एक अग्रलेख लिहिला होता. या अग्रलेखात लो. टिळकांनी नामदार गोखल्यांच्या प्रमाणेच छत्रपती शाहू महाराजांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले होते. या दोन थोर पुरुषांनी महाराजांच्याकडून ज्या अपेक्षा केलेल्या होत्या त्या अपेक्षा पुढच्या २८ वर्षात महाराजांनी पु-या करुन दाखविल्या.