व्याख्यानमाला-१९७९-१३

यमाने आपल्याबरोबर येऊ नकोस अशी तिला सक्त ताकीद दिली. पण मी माझ्या नव-याचे प्राण परत घेतल्याशिवाय जाणार नाही असे यमाला तिने निक्षून सांगितले आणि या आपल्या म्हमण्याच्या पुष्ठयर्थ एक सनातन धर्माचे व पति-पत्नीधर्माचे मोठे तत्त्व सावित्री सहज बोलून गेले. सावित्री म्हणाली.

यत्रमे नीयते भर्ता
स्वयमेवहि यत्र गच्छति
मया हि तत्र गन्तव्यम्
एष धर्म: सनातन: ।।

( जेथे माझ्या नव-याला नेले जाते अगर जेथे माझा नवरा स्वखुषीने जातो त्या ठिकाणीच पत्नीला गेले पाहिजे हा सनातन धर्म आहे.) असे म्हणून सावित्रीने पुन्हा यमाचा पाठलाग सुरु केला. ही बाई काही ऐकत नाही असे म्हणून तिच्या तावडीतून सुटण्यासाठी यमाने एक युक्ती योजिली. यम सावित्रीला म्हणाला तू वाटेल तो वर माग पण तुझ्या नव-याचे प्राण मागू नकोस. सावित्रीने 'मी मागेल तो वर देणार काय?' असे यमाला पुन्हा पुन्हा विचारले.  आणि यमाकडून मागेल तो वर देणार याची खात्री करुन घेतली. तिने यमाकडे 'मला शंभर पुत्र होऊ देत' असा वर द्या अशी यमराजांना विनंती केली. यमजाराने तथास्तू म्हणून वर दिल्याचे मान्य केले आणि सत्यवानाचे प्राण घेऊन यम पुढे चालला सावित्रीही त्याचे पाठोपाठ चालली. यमाने पाठीमागे वळून पाहिले. तो सावित्री परत आपल्या पाठीमागेच आहे हे त्याला दिसून आले. यम सावित्रीला म्हणाला; मी तुला पाहिजे तो वर दिला असताना तू पुन्हा माझ्या पाठीमागे का? सावित्री म्हणाली यमराज आपण मला शंभर पुत्र होऊ द्यात म्हणून वर दिला आहे. माझ्या नवरा परत मिळाल्याशिवाय मला शंभर पुत्र कसे होणार? हा सावित्रीचा युक्तीवाद कळल्यानंतर आपण फसल्याचे यमाचे लक्षात आले परंतु दिलेला वर पाळणे हे आपले कर्तव्य असलेने यमाने मोठ्या उदारं अंत:करणाने सत्यवानाचे प्राण सावित्रीस परत दिले आणि अशा रीतीने सावित्रीने यमापासून आपल्या नव-याची सुटका केली. जी गोष्ट महाभारतकालीन सावित्रीने केली. तशाच प्रकारची गोष्ट सावित्रीबाई फुले यांनी ही केली. आपल्या नव-याच्या पाठीमागे त्या सावली सारख्या उभ्या राहिल्या. नव-याच्या हरेक कामात त्यास मदत केली. स्वत: शिकली व शिक्षिकेचा पेशा पत्करला. बालहत्या प्रतिबंक गृहातील मुलांचे पालन पोषण केले एवढेच नव्हे तर म. जोतिबा फुले यांची ही सामाजिक समतेची चळवळ सहन न होऊन त्यांचा ठार मारण्यासाठी सनातन्यांनी मारेकरी पाठविले होते. त्यावेळीही फुल्यांच्या प्रमाणेच या बाईच्या प्रसंगावधानाने फुल्यांचे प्राण वाचले.

म. जोतिबा फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे अग्रणी आहेत. ते नुसते शाळा काढून थांबले नाहीत, बालहत्या प्रतिबंधक गृह काढून थांबले नाहीत, सत्यशोधक समाजाची स्थापना करुन थांबले नाहीत. तर त्यांनी भारताचा कणा जो शेतकरी आणि गिरणीत काम करणारा कामगार यांच्याही संघटना करण्यासाठी चळवळी सुरु केल्या. नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा फुल्यांचे उजवे हात होते. त्यांनी 'बाँबे मिल हॅंडस् असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन करुन कामगारांच्यावरील अन्याय वेशीवर टांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाराष्ट्रातील किंबहुना हिंदुस्थानातील कामगारांच्यासाठी चळवळ करणारी हीच पहिली संस्था. त्यावेळी कामगारांना गिरणीमध्ये १४ तास काम करावे लागत असे. लहान मुलांची अगर स्त्रियांची त्यापासून सुटका होत नसे. स्त्रियांना व मुलांना पुरुषाप्रमाणेच राबावे लागे. स्त्रियांना बाळंतपणाची रजा दिली जात नसे. कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सवलती दिल्या जात नसत. तेव्हा या कामगारांची दुखणी आणि गा-हाणी ब्रिटीश सरकारच्या कानांवर घालून मालकांच्या जाचातून कामगारांना सोडविण्याच्या दृष्टीने या संस्थेने जोरदार प्रयत्न केले. कृष्णराव भालेकर हे म. फुल्यांचे डावे हात. त्यांनी शेतक-यांची संघटना स्थापन केली. शेतक-यांना चांगले दिवस येण्यासाठी व सरकारी अंमलदाराकडून त्यांना होणारा त्रास नाहीसा करण्यासाठी भालेकरांनी जीवापाड परिश्रम घेतले.