व्याख्यानमाला-१९७९-१६

गेल्या शतकातल्या उत्तरार्धातील तीसरी चळवळ म्हणजे उदार-मतवादी चळवळ. या चळवळीचे पुरस्कर्ते लोकहितवादी देशमुख, न्या रानडे, ना. गोखले प्रभती मंडळी होती. त्यांचा कल साधारणपणे जुन्यातलं सोनं आणि नव्यातील हवं ते घेऊन सामाजिक चळवळी करण्याचा होता. लोकहितवादी देशमुख व न्या. रानडे हे स्वत: जी तत्त्वे समाजाने अंगीकारावीत असे प्रतिपादन करीत तीच तत्त्वे स्वत: आचारणात आणण्यात कशी कच खात असत याची अनेक उदाहरणे मी मघाशी सांगितली आहेत. लो. टिळक व आगरकर हे दोघेही समवयस्क. दोघांचाही जन्म १८५६ साली झालेला. कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणांत दोघांनीही कारावास भोगलेला होता. दोघांनी मिळून १८८० साली केसरी नावाचं वृत्तपत्र सुरु केलं. परंतु राजकारणात व समाजकारणात दोघांचे विचार परस्पर विरोधी होते. राजकारण अगोदर की समाजकारण अगोदर या बाबतीत टिळकांचा कल राजकारणाकडे होता. तर आगरकरांचा कल समाजकारणाकडे होता. दोघांनी परस्परविरोधी अशी विचारसरणी असल्यामुळे आगरकरांना केसरी सोडावा लागला व आपले सामाजिक विचार प्रभावीपणाने मांडण्यासाठी त्यांनी 'सुधारक' पत्राची स्थापना केली. या वर्तमानपत्रातून आगरकरांनी बुद्धिप्रामाण्यवादी सामाजिक चळवळींचा जोरदार पुरस्कार केला. लो.टिळकांनी केसरीतून आगरकांची भंबेरी उडविण्यास सुरुवात केली. आगरकर हे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. प्राचार्य या नात्याने एक झोपडीवजा घर बांधून फर्ग्युसन कॉलेजच्या माळावर रहात असत. आगरकरांच्या सामाजिक सुधारणांचा लोकांच्यावर प्रभाव पडतो आहे हे पाहून केसरीतून त्यांची निर्भत्सना सुरु झाली. आणि एके दिवशी केसरीचा आगरकरांविषयी एक अग्रलेख प्रसिद्ध झाला. त्या अग्रलेखाचा मथळा 'माळावरचा महारोगी' असा होता. यावरुन सामाजिक चळवळीच्या बाबतीत टिळक आणि आगरकर यांचे संबंध किती बिनसले होते. हेच आपल्या निदर्शनाला आल्याशिवाय रहात नाही.

सामाजिक सुधारणा एका चुटकीसरशी कधीच होत नाहीत. त्याच्यासाठी अखंडपणे खस्ता खाव्या लागतात व चळवळी कराव्या लागतात. समाजाला चळवळीच्या रुपाने धक्का दिल्याशिवाय समाजाचं मतपरिवर्तन होऊ शकत नाही. पूर्वी राजकीय चळवळ करणा-या माणसांच्या भोवती आपोआपच एक तेजोवंलय निर्माण झालेले होते. त्यांचा लढा हा ब्रिटीश सत्तेशी असल्याकारणाने गुलामगिरीत असलेल्या देशांतील सर्व लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना मिळत होता. परंतु सामाजिक चळवळी करणा-या नेत्यांना टीकेच्या अग्निदिव्यातून जावे लागते. त्यांना समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणेसाठी कधी समाजाशी, कधी ते ज्या जातीत जन्माला आले असतील त्या जातीशी, तर कधी स्वत:च्या कुटुंबातील माणसाशी मुकाबला करावा लागतो. सामाजिक चळवळ करणा-या लोकांना त्यांच्या ह्यातील अपमानीत जीणे जगावे लागते. त्यांच्या कार्याच कौतुक व्हायला आणि गौरव व्हायला दोन-तीन पिढ्या जाव्या लागतात. त्यावेळी कोठे त्यांनी केलेल्या कर्याचे समाजाला महत्त्व पटू लागते.

म. फुले १८९० साली दिवगंत झाले. लोकहितवादी देशमुख हे १८९२ साली निध पावले. आगरकर हे १८९५ साली मृत्यु पावले. न्या. रानडे १९०१ साली स्वर्गवासी झाले म्हणजे . १८९० सालापासून ते १९०१ सालापर्यंत महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी करणारी कर्ती मंडळी एकापाठोपाठ एक नाहीशी झाली. सामाजिक परिषदेचे अस्तित्वही संपुष्टात आले. त्यामुळे ही चळवळ सामाजिक क्रांतीची लाट ओसरती की काय? ही सामाजिक क्रांतीची मशाल विझते की काय? अशा प्रकारचा संभ्रम फार मोठ्या प्रमाणांत महाराष्ट्रात निर्माण झालेला होता. याचवेळेला शरिराने धिप्पाड, बुद्धीने अचाट, मुत्सद्देगिरीत हार न जाणारा असा एक राजबिंडा पुरुष महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्रांतीच्या क्षितिजावर दिसू लागला. या थोर पुरुषाच वय होत फक्त २० वर्षाच त्याला मिसरुडही फुटली नव्हती. ओठ पिळले तर दूध निघेल असं त्याचं कोवळं वय होतं. अशा या अल्पवयस्क व्यक्तीवर महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीची जबाबदारी येऊन पडली. म. फुले यांनी पेटविलेली सामाजिक क्रांतीची मशाल या थोर पुरुषाने आपल्या हाती घेतली. म. फुले यांनी रोवलेलं सामाजिक क्रांतीचे निशाण त्यांनी आपल्या खांद्यावर घेतले. १८९४ साली कोल्हापूर संस्थानची राज्यसूत्रे होती आल्या बरोबर ही जबाबदारी त्यांचेवर येऊन पडली आणि जवळ जवळ २८ वर्षे म्हणजे १९२२ सालापर्यंत सामाजिक क्रांतीची ही चळवळ त्यांनी नुसत्या कोल्हापूरातच नव्हे केवळ महाराष्ट्रातही नव्हे तर संबंध हिंदूस्थानभर फैलावली. तो राजबिंडा पुरूष दुसरा तिसरा कोणी नसून कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होत. १९२२ साली त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर त्यांनी हे सामाजिक क्रांतीचें निशाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दलित समाजातील विद्वान, धैर्यवान, शूर आणि पंडित अशा पुढा-याकडे दिले. यांच्या कार्यासंबंधी व सामाजिक क्रांतीच्या चळवळीसंबंधी उद्याच्या व्याख्यानात मी ऊहापोह करणार आहे.

आजच्या व्याख्यानात मी महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचे दोन टप्पे सांगितले आहेत. पेशवाई संपुष्टात आली त्यावेळे पासून तो १८४८ साली म. फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली तेथपर्यंतचा एका टप्पा. या टप्प्यात बाळशास्त्री जांभेळकर, दादोबा पांडुरंग, जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ महाजन प्रभुती मंडळीनी एक नव्या विचाराची झुळूळ महाराष्ट्रात आणून सोडली. १८४८ साली म. जोतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढून महाराष्ट्रात सामाजिक क्रांतीचे बीज रोवले म्हणून १८४८ सालापासून ते १८९४ सालापर्यंत महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचा दुसरा टप्पा असे मी स्थूलमानाने मानले आहे. या काळांत न्या. रानडे, विष्णुशास्त्री पंडित, आगरकर यांनी या सर्वात थोर म्हणजे म. फुले यांनी केलेल्या सामाजिक क्रांतीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या काळाचे प्रतिनिधित्व करणारे आणि सर्वस्पर्शी, सर्वव्यापी व सर्वगामी अशा प्रकारची चळवळ म. फुले यांनी केली असल्यामुळे या कालाचं वर्णन एकाच शब्दात करावयाचे झाले तर, 'झंझावात' या शब्दानेच करता येईल.

आजच्या व्याख्यानात हे दोन टप्पे मी विस्ताराने विषद करुन सांगितले आहेत. उद्याच्या व्याख्यानात दुसरे दोन टप्पे म्हणजे राजर्षि छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

आपण गेला तास-दिडतास माझं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले या बद्दल मी आपली आभारी आहे.