व्याख्यानमाला-१९७९-१४

महाराणी व्हिक्टोरियाचा मुलगा ड्यूक ऑफ कॅनॉट हा पुण्याला आलेला असता म. फुले यांचे एक सहकारी हरी रावजी चिपळूणकर यांनी त्याला मानपत्र देण्याचा समारंभ योजिला होता. पुण्यातील प्रतिष्ठित व्यक्तींना या समारंभाची आमंत्रणे गेली होती. म. फुले यांनाही आमंत्रण होते. म. फुले त्या ठिकाणी गेले पण ते शेतक-याचे वेषात. डोक्याला एक मुंडासं, अंगात खादीची एक बंडी, कमरेला विळा आणि ढुंगणाला लंगोटी अशा पोषाखात ड्यूक ऑफ कॅनॉटच्या सभेत उपस्थित राहण्यासाठी म. फुले गेले. बाकीची मंडळी झकपक आणि उंची पेहराव करुन त्या ठिकामी जमली होती. म.फुल्यांचा पोशाख पाहून त्यांना पोलिस अधिका-याने आत जाण्यास मनाई केली. परंतू म. फुल्यांचे जवळ आमंत्रण पत्रिका होती. त्यामुळे पोलीसही बुचकळ्यात पडले. समारंभाला सोडावे तरी पंचाईत न सोडावे तरीही पंचाईत. पोलीस आणि म. फुले यांची बाचाबाची चालू असतानाच समारंभाचे यजमान हरी राजवी चिपळूणकर हे धावतच तेते आले व जोतिबांना घेऊन गेले आणि त्यांना व्यासपीठावर बसविले. ड्यूक ऑफ कॅनॉट आल्यानंतर मुख्य समारंभ चालू असतानाच म. फुल्यांनी १०-१५ मिनिटे इंग्रजीत भाषण करुन ड्यूक ऑफ कॅनॉटला हिंदुस्थानातील शेतक-यांची दयनीय अवस्था प्रभावी रितीने सांगितली ते म्हणाले. हिंदुस्थानात राणीचं राज्य सुरु आहे. खरा हिंदुस्थान हा खेड्यात आहे. ब्रिटीश राजवटीच्या जोखडाखाली शेतक-यांचे अंगात कसलेही त्राण राहिलेले नाहीत. त्यांचं सर्वांच्याकडून शोषण करण्याचं काम सुरु झालेलं आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या आईला म्हणजे महाराणी व्हिक्टोरीया इजला हिंदुस्थानातील शेतक-यांची परिस्थिती सांगा.आणि या शेतक-याला त्याच्या या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी राज्यकर्ते या नात्याने काही प्रयत्न करा. ड्यूक ऑफ कॅनॉट व तेथे जमलेली मंडळी म. फुल्यांचे भाषण ऐकूण स्तिमित झाली.

म. फुल्यांना शेतक-यांच्या बद्दल किती कळवळा होता याचं आणखी एक उदाहरण अभ्यसनीय आहे. १८८५ साली इंडियन नॅशनल काँग्रेस या संस्थेची स्थापन झाली. हिंदुस्थानातील लोकांची गा-हाणी ब्रिटीश सरकारच्या कानांवर घालण्यासाठी अशा एखाद्या राजकीय संस्थेची गरज निर्माण झाली होती. सर अॅलन ऑक्टेव्हिअन ह्यूम या इंग्रज गृहस्थानेच काँग्रेसची स्थापना केली. सुरुवातीस या संस्थेमध्ये अति श्रीमंत आणि अति विद्वान अशी फारच थोडी माणसे होती. मध्यमवर्ग, बहुजनसमाज, शेतकरी, कामगार, दलित यांना या संस्थेत प्रवेश नव्हता. हे वर्ग जो पर्यंत काँग्रेसमध्ये नाहीत तो पर्यंत या काँग्रेसला राष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार नाही.असे म. फुल्यांचे म्हणणें होते. नॅशनल काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्यात भरले. त्यावेळी निषेध म्हणून म. फुल्यांनी शेतक-याचा एक भव्य पुतळा काँग्रेसच्या मंडपाबाहेर उभा केला. काँग्रेसचे त्यावेळेचे जे चालक होते त्यांच्या निदर्शनाला आणून दिले की तुम्ही संस्था ही संकुचित आहे, वरिष्ठ वर्गापुरतीच मर्यादित आहे. आणि म्हणून बहुजन समाजाला काँग्रेसमध्ये प्रतिनिधीत्व मिळत नाही तो पर्यंत तुम्हाला देशाच आणि सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करता येणार नाही.

म. फुले यांनी १८७३ साली 'सत्यशोधक समाजाची ' स्थापना केली व आपण चालविलेल्या चळवळीना संघटीत व संस्थात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक समाजाचे ध्येय परमेश्वर आणि भक्त यांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा दलाल असता कामा नये असे होते. एखाद्या व्यक्तीने परमेश्वराची पूजा करावी, त्याची भक्ती करावी, त्याला अनन्यभावे शरण जावे पण कोणामध्यस्थाच्या मार्फत ही कृत्ये करु नयेत. सत्यशोधक समाजाच्या या ध्येय धोरणांमध्ये आर्थिक दलाली करणारी मंडळी म्हणजे भिक्षु, जोशी, ग्रामोपाध्ये काही अपवाद वगळता सर्वसामान्यणे ब्राह्मण समाज यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यांचं वेतून बुडू लागलं. म. फुल्यांनी पुरोहिताशिवाय अगदी साध्या पद्धतीने नवरानवरीने एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्ने लावण्याचा सपाटा सुरु केला. अशा प्रकारची लग्ने लावता येणार नाहीत. ती लग्ने भिक्षुकामार्फतच लागली पाहिजेत आणि भिक्षुकाला त्याची योग्य ती दक्षिणा मिळाली पाहिजे अन्यथा अशी लग्ने बेकायदेशीर ठरवावीत अशा प्रकारचे दावे शिक्षुक मंडळीनी निरनिराळ्या कोर्टांत दाखल केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या न्या. रानडे यांनी सत्यशोधक समाजाच्या संस्थापनेला मदत केली होती त्यांच्या पुढे ते मुनसफ असताना एका दावा आला न्या. रानडे यांनी भिक्षुकामार्फतच लग्ने लावून घेतली पाहिजेत अन्यत: ते लग्न बेकायदेशीर आहे अशा प्रकारचा निर्णय सत्यशोधकीय पद्धतीने लग्ने लावणा-या व्यक्तींच्या विरुद्ध व भिक्षुकांच्यावतीने दिला. भिक्षुकांचा आनंद गगनात मावेना. त्यावर जिल्हा कोर्टात अपील झाले. जिल्हा कोर्टाने खालचे कोर्टाचे ठरावात थोडीशी दुरुस्ती केली की अशी लग्ने भिक्षुका शिवाय सत्यशोधक पद्धतीने लावली तरी भिक्षुकाचं वेतन हे त्याला मिळालंच पाहिजे. तो त्याचा हक्क आहे. याही ठरावावर उच्च मिळालंच पाहिजे. तो त्याचा हक्क आहे. याही ठरावावर उच्च न्यायालयात अपील करण्यात आले. अपीलामध्ये एका इंग्रजी न्यायमूर्तीने लग्ने कशी लावायची हा ज्या त्या व्यक्तीचा हक्क आहे. भिक्षुकाला त्याच्या मदतीशिवाय लग्ने लावली तर दक्षिणा मागणेचा हक्क नाही. अशा रीतीने या दाव्याचा अखेर पक्षी सत्यशोधक समाजाच्यावतीने निर्णय झाला. हा निर्णय म्हणजे म. फुले यांनी विवाह पद्धतीमध्ये अंगिकारलेल्या नव्या तत्त्वाचा विजयच होता. या निर्णयानंतर पुणे जिल्हयात ठिक-ठिकाणी सत्यशोधक पद्धतीने लग्ने लावण्याचा धूमधडाका सुरु झाला यामुळे भिक्षुकशाहीला फार मोठा हादरा बसला.