व्याख्यानमाला-१९७९-१९

 शिक्षणासाठी बाहेरून कोल्हापूर शहरात येणा-या गोर-गरीब मुलांच्या विद्याभ्यासाची, जेवणाखाण्याची, दिवाबत्तीची, कपड्यालत्त्याची, पुस्तके, वह्या यांची व्यवस्था करणे आवश्यक होते त्यावेळी खानावळीचा दर ५ ते ७ रुपये होता.ती ही ब्राह्मणी खाणावळ. खेड्यांतून आलेल्या मुलांना महिना ५ रुपये देणेसुद्धा परवडत नसे. शिवाय खाणावळवालें ब्राह्मण बहुजन समाजातील जी व्यक्ती खानावळीत जेवत असे त्याला आपल्या पत्रावळी स्वत:च काढाव्या लागत असे व पत्रावळी खालची जमीन शेणकाल्याने सारवून घ्यावी लगात असे जेवणा-याच्या खिशातून पैसे घेताना या खानावळवाल्यांना शिवाशीव वाटत नसे. परंतू त्यांच्या पत्रावळी काढतांना त्यांचे ब्राह्मण्य आड येत असे. अस्पृश्यांना तर खाणावळीत जाण्याचा मज्जावच होता. तेव्हा ही सारी परिस्थिती विचारात घेऊन लोकांच्या मध्ये जर सुलभ रितीने व मोठ्या प्रमाणात शिक्षण प्रसार करावयाचा असेल तर कोल्हापूर शहरामध्ये विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची स्थापना करणे आवश्यक होते एखाद्या शहरात अनेक जाती-जमातींची वसतिगृहे काढणे, त्यांना जमीन मिळवून देणे, त्यांना इमारती बांधण्यासाठी मदत करणे. संस्थानच्या तिजोरीतून या वसतिगृहांना त्यांच्या नित्य आणि नैमित्तिक खर्चाची तरतूद करणे. मुलांच्या जेवणाखाण्याची, दिवाबत्तीची, कपड्यालत्याची व केशकर्तनाचीसुद्धा व्यवस्था करणे ही खास महाराजांची कल्पना. यापूर्वी वसतिगृहे होती पण ती महाविद्यालयाला जोडून होती मुंबईचे विल्सन कॉलेज, एलफिनस्टन कॉलेज किंवा पुण्याचे फर्ग्युसन कॉलेज या महाविद्यालयांची वसतिगृहे त्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या पुरतीच मर्यादित होती. याशिवाय स्वतंत्रपणाने वसतिगृहे स्थापण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात कुठेही व कोणीही केला नव्हता. अशा प्रकारची वसतिगृहे स्थापण्याचा प्रयत्न केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध हिंदुस्थानात महाराजांनीच प्रथम केला.

महाराजांनी निरनिराळ्या जातींची वसतिगृहे काढली म्हणून काही विचारवंत मंडळी त्यांना एक प्रकारे जातिभेद वाढविण्याला मदत केली अशा प्रकारचा दोष देतात. परंतु भिन्न भिन्न जातींची वसतिगृहे काढण्यापूर्वी महाराजांनी राजाराम कॉलेजला जोडून कॉलेजमधील सगळ्या जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांचेसाठी एकच वसतिगृह स्थापन केले होते व त्याची जबाबदारी कै. न्या. गोखले यांच्यावर सोपविली होती. गोखले हे कोल्हापूर संस्थानात न्यायाधीश होते. त्यांचे कडून तरी निदान पक्षपात होणार नाही अशी महाराजांची अपेक्षा होती. या वसतिगृहाच्या खर्चासाठी वर्षाचे काठी दरबारातून दहा हजार रुपयांची तजवीजही केली होती. कित्येक वर्षांत या वसतिगृहामध्ये ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. ही गोष्ट महाराजांचे नजरेस आली म्हणून महाराजांनी त्या वसतिगृहाचे अनुदान बंद केले. सगळ्या जातींचे एक बोर्डिंग असावे असा महाराजांनी केलेला प्रयोग फसला आणि मग महाराजांनी भिन्न भिन्न जातींची वसतिगृहे काढण्याचा संकल्प केला.

आपला समाज निरनिराळ्या जातीत विभागला आहे. कोणाही व्यक्तीला स्वत:च्या जातीचा थोडाफार अभिमान असतोच. कुठल्या जातीत जन्माला येणे हे काही माणसाच्या हातात असत नाही. तो एक अपघात आहे. परंतू कोणत्या का होईना जातीत जन्माला आल्यानंतर त्या माणसाला आपल्या जातीबद्दल प्रेम व अभिमान वाटतो. हा अभिमान बाळगीत असताना सुद्धा कोणत्याही जातीतील सूज्ञ आणि समंजस व्यक्तीने स्वत:ची जात आणि इतर जाती यांच्यामध्ये सलोखा, सहिष्णुता आणि साहचर्य निर्माण व्हावे या दृष्टीने प्रयत्न करणे हे त्याचे कर्तव्य असते. महाराजांची एक अपेक्षा होती की जातिभेद मोडायचे झाले तर भिन्न भिन्न जाती मधील जी तरुण मुले आहेत त्यांना प्रथम शिक्षण देणे आवश्यक आहे. शिक्षणाचीद्वारे सगळ्यांना खुली असली पाहिजेत. ज्ञानार्जनाची साधने व सुखसोयी त्यांना उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि या सर्वांचा परिणाम हीच भिन्न भिन्न जातीतील मुले हळू हळू जातिभेद मोडायला तयार होतील.