व्याख्यानमाला-१९७९-१२

नदीचा, तळ्याचा, विहिरीचा, नाल्याचा, ओढ्याचा आश्रय घेऊन आत्महत्या करती. अगर वेश्येचं जीवन कंठीत. हेच त्यांच्या पुढे मार्ग होते. ही गोष्टम. फुले यांच्या ध्यानात आल्यानंतर अशा गरोदर झालेल्या विधवांची मुक्तता करण्याच्या उदात्त हेतूने त्यांनी पुण्यात 'बालहत्त्या प्रतिबंधक गृह' या नावाची संस्था काढली. सा-या पुण्यात अशा प्रकारची संस्था काढल्याबद्दलच्या जाहिराती लावल्या. या जाहिरातीत अशा प्रकारच्या ज्या विधवा असतील त्यांनी भृहणहत्त्या न करता माज्या घरात यावे आणि खुशाल बाळंत होऊन जावे. त्यांची वाच्यता आपण कोठेही करणार नाही. आणि त्यांनी जन्म दिलेल्या बालकांचं पालन पोषण करण्याला आपण व आपली पत्नी सावित्रीबाई फुले हे समर्थ आहोत. असे जाहीरपणे सांगितले. त्याचा परिणाम होऊन अशा अडचणीत सापडलेल्या विधवा बहुतेक ब्राह्मण समाजातील या म. फुले यांच्या घरी येत बाळंत होऊन निघून जात. म. फुल्यांच्यावर ब्राह्मणद्वेषाचा आरोप नेहमी केला जातो. परंतू या महात्म्याने ब्राह्मण समाजावर आणि विशेषत: ब्राह्मणसमाजातील विधवांवर किती अनंत उपकार करुन ठेवले आहेत याची - 'बालहत्या प्रतिबंधक गृह' ही एक साक्ष आहे.

याही पुढे जाऊन काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला म. फुले यांनी त्यांना मूलबाळ नसल्यामुळे दत्तक घेतले व त्याचे यशवंत असे नाव ठेवले. हिंदू समाजामध्ये भाऊबंदापैकी कोणातरी मुलाला दत्तक घेण्याची पद्धत होती. परंतू परिस्थितीमुळे वाममार्गाला लागलेल्या. ब्राह्मण कुटुंबातील एक विधवेच्या अनौरस मुलाला दत्तक घेणे ही काही लहान सहान गोष्ट नव्हती. १९५६ साली हिंदू कायद्यामध्ये जी सुधारणा झाली त्या सुधारणा प्रमाणे हिंदू कुटुंबात हिंदू समाजातील कोणत्याही जातीच्या मुलाला अगर मुलीला दत्तक घेण्याची तरतूद केलेली आहे. जी गोष्ट कायद्याने १९५६ साली केली तीच गोष्ट फुले यांनी आधीच १०० वर्षे प्रत्यक्ष कृतीने करुन दाखविली होती. या वरुन हा माणूस केवढ्या पहाडाच्या अंत:करणाचा असला पाहिजे ही तर गोष्ट दिसून येतेच. पण Prophetes are head of their Times  म्हणजे दृष्टे पुरुष काळाच्या पुढे असतात. या म्हणीची प्रचीती येते. मघा सांगितल्या प्रमाणें सावित्रीबाई फुले यांनी शिक्षिकेचे काम मुलींच्या शाळेत केले होते. बालहत्या प्रतिबंधक गृह काढून या माऊलीचे परिचारिकेचे (नर्स) ही काम केले. म्हणून महाराष्ट्रातील किंबहुना हिंदुस्थानातील पहिली शिक्षिका आणि पहिली परिचारिका या सावित्रीबाई फुलेच होत, असे सामाजिक चळवळीच्या इतिहासकाराला सुवर्ण अक्षरांत नमूद करा वेलागेल.

म. फुले यांचे 'बालहत्या प्रतिबंधक गृह' ची कल्पना घेऊनच पुढे प्रार्थना समाजातर्फे पंढरपूरला 'अनाथाश्रम' ही संस्था सुरु झाली ती आज तागायत चालू आहे.

हिंदुस्थानात आतापर्यंत सावित्री या नावाच्या दोन स्त्रिया होऊन गेल्या. एक महाभारतकालिन 'सती सावित्री' आणि म. फुले यांची धर्मपत्नी 'सावित्रीबाई' फुले. या दोघींनी आपल्या नव-यावर अपरंपार प्रेम केले व त्यांच्या जीवनकार्यात त्यांना साथ दिली. महाभारतकालिन सावित्रीने आपला नवरा सत्यावान याचे प्राण यमाने हरण केल्यानंतर यमाच्या तावडीतून सुटका करुन आपला नवरा परत मिळविला पण त्यासाठी तिला यमापुढे, आजकालच्या भाषेत बोलावयाचे म्हणजे एकप्रकारे सत्याग्रहच करावा लागला म्हणून मला वाटते या सावित्रीला सत्याग्रही सावित्री म्हणणे हे ज्यास्त उचित होईल. यम सत्यावानाचे प्राण घेंऊन चाललेला होता. ही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालली.