व्याख्यानमाला-१९७६-३१

तुम्हाला माहित असेल की अलिकडच्या काळामध्ये, राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय समतोल असतो, त्यामध्ये भारताला एक फार मोठं स्थान प्राप्त झालेलं आहे. प्रचंड लोकसंख्येचा देश, म्हणून आज त्याला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे ही बारीक बारीक राष्ट्रे आशेचा किरण म्हणून या देशाकडे पाहतात. सिलोनचं आमच्याकडं लक्ष आहे इराणचं आमच्याकडं लक्ष आहे. इजिप्तचे आमच्याकडं लक्ष आहे, ते मदतीसाठी आमच्याकडे येतात. आमच्याकडे सामंजस्याच्या दृष्टीची अपेक्षा करतात. आणि आमच्या परंपरेला धरून आम्ही ती देतो आहोत. आक्रमणांचा विचार आपल्या कधीच मनात येत नाही आपण असं म्हटलेलं नाही आणि आमच्यावर जर देशातील लोकसंख्येचा, अन्नधान्याचा प्रश्न सोडवायला आला तर पाकिस्तानला गिळंकृत करून टाकूया, त्यांची जमीन मिळेल, त्यांचं अन्नधान्य आपल्याला मिळेल. त्याच्या पलिकडे आणखी जाऊया. जे ब्रिटनने केलं, जे फ्रांन्सने केलं, जे अमेरिकेने केलं ते करावं असा आमच्या मनांत विचार आलेला नाही. समर्थ आहोत नाही म्हणण्याचे कारण नाही. बारीक सारीक राष्ट्रं गिळण्यास आम्ही समर्थ आहोत, पुढे आंतरराष्ट्रीय राजकारणांत महायुध्द झालं तरी त्याची पर्वा करण्याचं काय कारण आहे ? अशा विचारांपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो नाही हे खरोखरचं आमचे भाग्य आहे. आणि या भाग्याचे सगळं श्रेय या देशातील राजकिय सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मीक उभारणी ज्यांनी ज्यांनी केली त्या नेत्याच्या व्यक्तिमत्त्वांना आणि त्यांच्या परंपरेला, सांस्कृतिक अधिष्ठानाला आहे.

आजच्या माझ्या शेवटच्या भाषणामध्ये मला वाटतं माझ्या विषयाचे बहुतेक महत्त्वाचे मुद्दे जितक्या स्पष्टपणे मांडता येतील तितक्या स्पष्ट रीतीनं आपणापुढे मांडले आहेत. मी केवळ हा विचार जो तुमच्यापुढे मांडला, तो या देशाचे आपण एक जबाबदार नागरिक या दृष्टीने तुमच्या मनामध्ये सुध्दा विचाराची एक साखळी निर्माण व्हावी, तुमच्या मनामध्ये विचारांचं मंथन सुरू व्हावं या हेतूने ज्यावेळी या देशामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये राष्ट्राच्या समस्यासंबंधी, राष्ट्राच्या सामर्थ्यासंबंधी विचार सुरू होईल, त्याच्यातून त्याला या देशाला नवीन काही द्यावंसं वाटेल. माझी अशी खात्री आहे की या मनातून आलेल्या क्रांतीचा परिणाम, आज जो आपल्याला आर्थिक -  राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मंदगतीने  झालेला आणि म्हणून लुप्त होत असलेला दिसतो, तो तसा झालेला असणार नाही. अधिक जलदगतीने तो झालेला असेल, अशा प्रकारचा आत्मविश्वास, अशा प्रकारचा आशावाद, मी मनामध्ये बाळगला तर तो चुकीचा ठरणार नाही.

एक अत्यंत महत्त्वाचा आणि फार मोठा आवाका असलेला असा विषय मी घेतला. कदाचित त्याच्यांत त्रुटी राहिल्या असतील. कांही उणीवा असतील. परक्याच्या दृष्टीने त्याच्यात तर्काची गल्लत असेल, परंतु त्यामध्ये समाजासंबंधी आणि या देशासंबंधी जे चिंतन मनामध्ये घडत होतं त्याचा प्रामाणिकपणा निश्चित होता. तो तुम्हाला निश्चित जाणवलेला असेल. तेव्हा या यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेच्या निमित्ताने कराडमध्ये येण्याची संधी मला मिळाली. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असताना समाजाचे जितके जवळून दर्शन मला घेता आलं त्या दर्शनाचे जे वेगवेगळे पैलू मी पाहिले, त्याच्यातून मला जे जाणवलं ते मी आपल्या पुढं मांडलं ते मांडण्याची संधी इथल्या नगरवाचनालयामार्फत मला मिळाली. त्यांच्या संयोजकांनी आग्रहपूर्वक बोलावलं. माझं नांव त्यांना कसं सुचलं कुणास ठाऊक, परंतू मला या ठिकाणी व्याख्यानासाठी बोलावलं आणि हा जो माझा सन्मान केला त्याबद्दल व सगळ्या श्रोत्यांचे दोन दिवस अत्यंत शांतपणाने माझ भाषण ऐकून घेतल्याबद्दल हार्दिक आभार मानून माझं भाषण संपवितो.

जयहिंद !