व्याख्यानमाला-१९७६-२९

काल कुणी तरी मला माझे भाषण संपल्यानंतर एक प्रश्न विचारला, तुम्ही जपानसंबंधी याच्यामध्ये काहीच का उल्लेख केला नाही. अर्थात उल्लेख न करण्यामध्ये तसा माझा काही हेतू नव्हता परंतू जपान हा पूर्वेकडचा देश, गौतमबुध्दाच्या तत्त्वज्ञानाचा देश, या जपाननेही ऐहिक -  सामर्थ्यावर इतकी आघाडी संपादन केलेली आहे की जगातल्या कुठल्याही यच्चयावत गोष्टीवरती जपानचं नांव नाही असं आज तरी आढळत नाही. अशा या जपानचा उल्लेख मी केला नाही याचं कारण अगदी स्पष्ट होतं. कारण या जपानने आपल्या उत्कर्षासाठी अवलंबलेली सगळी तत्त्वं ही पाश्चात्य तत्त्वज्ञानाचीच होती. त्यांना स्वत:चं तत्त्वज्ञान सोडावं लागलं. बुध्दाच्या तत्त्वज्ञानावरती ते उभे राहिलेले नाहीत जपानला युरोपातलंच औद्योगीकरण स्वीकारावं लागल. युरोपातलीच ऐहिकनिष्ठा घ्यावी लागली. युरोपचा सुखवाद स्वीकारावा लागला आणि युरोपच्या तत्त्वज्ञानाला टक्कर देण्यासाठी युरोपचे तत्त्वज्ञान, स्वत:च तत्त्वज्ञान कोप-यात टाकून त्याला उभं रहाव लागल्यामुळे ते जगामध्ये त्या तत्त्वज्ञानास तोंड देऊन आज उभे राहिलेले दिसतात परंतू बाकीच्या तत्त्वज्ञानाची जी परिस्थिती झाली, जो साम्राज्यावाद निर्माण झाला, तो जपानमध्ये सुध्दा झाला. आणि गौतमबुध्दाला ते नेमके त्या क्षणाला विसरले. पहिल्या, दुस-या महायुध्दा मध्ये जपानचं अंग किती होते हे मी तुम्हांला सांगितलं पाहिजे असं नाही या महायुध्दाच्या काळामध्ये जपानसारख्या देशाला गौतमबुध्दाचा, सत्य – अहिंसेचा संदेश देण्यांच भान राहिलं नाही आणि त्यामुळे जपानकडे आज जरी पाश्चात्य लोक आशेचाकिरण म्हणून बघत असले तरी भारताला त्या देशाकडे बघण्याची गरज नाही. जपानकडून मुद्दाम जाणीवपूर्वक घेण्यासारखं असंकाही वेगळ नसल्यामुळे, त्याचा मी उल्लेख जरी मुद्दामहून टाळलेला नसला आवर्जून असा केला नाही. तुम्हाला माहित असेल की बांगलादेशाच्या प्रकरणामध्ये या देशाची मूल्ये तावून सुलाखून निघाली. असा प्रचंड क्रांतीचा, मानवतावादी इतिहास जगातल्या कुठल्याच राष्ट्रामध्ये घडलेला नसेल. दुस-या राष्ट्रामध्ये होणा-या गळचेपीपासून त्याचं संरक्षण करण्यासाठी आणि त्याच्या स्वातंत्र्याच्या उर्मीला अर्थ देण्यासाठी त्याग केला तो आम्ही केला. साम्राज्यवादी पिपासनेने केला नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला आम्ही सोडवायला येतो असं म्हणून त्यांनाच घशात घाल असं आमच्या  देशाने केलं नाही. बाकीच्या देशांना सगळ्या इतिहासाच्या काळामध्ये हेच केलेलं आहे. अगदी रशियासकट हंगेरी पोलंडचा इतिहास ताजा आहे. फ्रांन्सने काय केलं, ज्यांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता अशी तत्त्वं दिली, त्या फ्रांन्सने सुध्दा साम्राज्यशाही धोरण स्वीकारूनच पुढचा महायुध्दाचा घाट घातला. इंग्लंडची तीच परिस्थिती. लोकशाहीचा बडेजाव मिरवून साम्राज्यवादी, भांडवलशाही असे स्वरूप स्वीकारलं. या राष्ट्राचं सगळ्यात मोठं नुकसान कोणी केलं असेल तर इंग्लंडने केलेलं आहे. त्यांनी आम्हाला नव्या कल्पना दिल्या, नवं तत्त्वज्ञान दिलं, नवे विचार दिले हे सगळ खरं आहे. पण हे सगळ देत असताना आमचं रक्त सगळं त्यांनी शोषून घेतलं ते विसरता येत नाही याची जाणीव दादाभाईनी आम्हांला करून दिली, त्याची जाणीव रानडयांनी आम्हांला करून दिली त्याची जाणीव आम्हांला टिळकांनी करून दिली. नवं विचार, नव्या कल्पना हात राखून दिल्या होत्या, मनापासून दिलेल्या नव्हत्या याचं एक उत्तम उदाहरण सांगायचं म्हणजे लॉर्ड कर्झन हा जो त्या वेळेचा गव्हर्नर होता. कलकत्ता विद्यापीठामध्ये त्यावेळेला फ्रेंच रिव्हाव्ह्यूलेशन हे पुस्तक लावलेलं होत हे ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं त्या वेळी ते पुस्तक ताबडतोब रद्द करावं अशा प्रकारचा खलिता त्यानं पाठविला होता. आणि बंगालच्या अभ्यासक्रमामध्ये इंग्लडचा इतिहास शिकवला जात होता तो यापुढे शिकवला जाऊ नये अशा प्रकारचा खलिता पाठवून ते शिकवणं बंद केलं म्हणजे ज्या गोष्टींच्या आधारावरती इंग्लंड उभं राहिलं तो इतिहास या देशातील लोकांना कळता कामा नये. ज्या तत्त्वावरती फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली ती लोकशाहीची तत्त्वं या देशाला कळता कामा नयेत म्हणून विचार करणारे इंग्रज राज्यकर्ते आमचं अर्थशोषण करीत होते. तिकडे स्वातंत्र्याच्या,  लोकशाहीच्या वल्गना करीत होते. तेव्हा त्यांच्या देशामध्ये ते काय करतात या वरून त्यांची योग्यता ठरविण्यापेक्षा ते इतर राष्ट्राकडे कोणत्या दृष्टीने पहातात हे महत्त्वाचं असल्यामुळे आपण त्यांच्या कडून शिकायच्या गोष्टी शिकल्यानंतर आणखी त्यांचे पाय धरण्याची पाळी येऊ नये त्याची दक्षता आपण घेतली पाहिजे.