अभिनंदन ग्रंथ - यशवंतरावांचें वर्धिष्णु व्यक्तिमत्त्व -2

आणि तेंहि सिद्ध होण्याचा क्षण झपाट्याने येत होता. द्विभाषिकाचे मुख्यमंत्री या नात्याने अत्यंत प्रामाणिकपणाने कारभार पहात असतांना 'द्विभाषिक राज्यांत एकात्म्य साधलें गेलेलें नाही, व दडपशाहीशिवाय द्विभाषिकाचा कारभार चालण्यासारखा नसून त्यांतून काय निर्माण होईल हें सांगता येत नाही' ही मनाला पटलेली वस्तुस्थिती पं. नेहरूंच्या विचारणेवरून त्यांच्या कानीं घालण्याचा तो क्षण होता. तें एक फार मोठें कर्तव्य होतें आणि तितकाच धोकेबाज जुगार होता. हात जरा ढळला हलला, आणि जीभ जडावल्याप्रमाणे ती जरा अंधुक बोलली तरी दोन भलतेंच पडून काय होईल त्याचा नेम नव्हता. दान अचूक पडलें तर शिखर, आणि जरा घसरलें तर सर्वनाश,असाच जिवावरचा तो प्रसंग होता. शुद्ध, निर्लोम व दृढ बुद्धीलाच असा जुगार शीर सलामत ठेवून खेळता येतो, जनतेची नाडी व भारतीय नेत्यांची नाडी या दोहोंवरहि हात ठेवून 'द्विभाषिक चालणें अशक्य' असा कौल ना. चव्हाण यांनी दिल्लींत दिला; आणि पत्त्यांचा बंगला कोसळून पडून त्या ठिकाणीं महाराष्ट्र गुजराथचीं दोन नवी राज्यें सुमारें पांच वर्षांच्या घोळानंतर उभीं झालीं.

द्विभाषिकाच्या पाठींत ना. चव्हाणांनी सुरा खुपसला, सहकारी मंत्र्यांचा विश्वासघात केला, गनिमी कावा ते खेळले असा भडिमार ना. चव्हाणांवर नंतर झाला. गनिमी कावा खेळल्याचें किंवा द्विभाषिकाचा विश्वासघात केल्याचें ना. चव्हाण नाकारतात व तेंच बरोबर आहे. मुत्सद्यांचे डावपेंच व गनिमी कावा यापेक्षाहि सत्य हें जास्त उत्पातकारी, उलथापालथ करणारं व शत्रुमित्रांना अचंब्यांत टाकणारें असतें. गांधीयुगांत हा अनुभव अनेकांना आला. द्विभाषिकाबाबतच्या चव्हाणनीतीने त्याचाच जणू कांही प्रत्यय आला, असें म्हणतां येईल. परिणाम असा झाली कीं संयुक्त महराष्ट्र जो १९५५ च्य आक्टोबरमध्ये शिफारसिला गेला नाही, १९५६ पासून सुरु झालेल्या समितीकांडामध्यें जो संयुक्त महाराष्ट्र होऊं शकला नाही, तो संयुक्त महाराष्ट्र १९६० सालीं मे महिन्यांत ना. चव्हणांच्या नेतृत्वाखाली व पं. नेहरुंच्या हस्तें सिद्धीस गेला. अनेक शक्ति महाराष्ट्र साध्य होण्यास कारणीभूत झाल्याच; श्रेया बद्दलचा वाद अर्थातच नाही. पण या श्रेयांतील ना. चव्हाणांचा 'सिंहभाग' कोणासहि नाकारतां येणार नाही.

१९५६ साली द्विभाषिकाचे मुख्यमंत्री बनलेले ना. चव्हाण यांचे 'चरित्र' अद्याप उलगडलें जात आहे आणि त्याच्या सर्व घड्या माहीत असल्याचा दावा सहसा कोणी करणार नाही. खंबीरपणा न सोडतां सर्वांशी गोडीगुलाबी, झुंज घेण्याची ताकद असतांना 'सर्वेषामविरोधेन' काम साधण्याची हातोटी, विशिष्ट ध्येयावर नजर खिळवून सर्वोसह पुढे पाऊल टाकण्याची धडाडी, व लाचारी न पत्करतां सर्वांशीं सौजन्यपूर्वक वागण्याची समन्वयी प्रवृत्ति, वगैरे वैशिष्टयांच्या पाकळ्या आता उमटल्या आहेत. पण आणखी किती व कोणत्या पाकळ्या विकसायच्या आहेत व गाभा केव्हा दृष्टीस पडावयाचा आहे हें आज सांगतां येणार नाही. त्यामुळें त्यांचे चरित्र आज तरी रहस्यमय असेंच वाटल्याशिवाय रहात नाही. हीच गोष्ट त्यांच्या भाग्याची म्हणतां येईल! भाग्य त्यांच्या भोंवती पिंगा घालत होतें आणि त्याच वेळीं झुकांड्याहि देत नव्हतें काय? त्यांना खो देण्यांत आले, पण खो घातला गेला तरी खंबीरपणामुळें जागा सोडण्याचें कारण त्यांना कधी पडलें नाही, उलट खो मिळतांच ते अधिकच जडबुडाचे बनत चाललें. आजचें त्यांचे भाग्य महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचें आहे. उद्याचें त्यांचे भाग्य कोणतें असेल तें कोणी सांगावे? आजचें त्यांचे वय, धडाडी व कसबीपणा पहातां पहिले महाराष्ट्रीय पंतप्रधान होण्याचें उद्यांचें त्यांचें भाग्य असेलहि! 'यशवंतरस्य चरित्रं भाग्यंच ' आज कोणास सांगता येणार नाही. पण ते मुंबईंत असोत की दिल्लीत असोत, महाराष्ट्राच्या सर्वांगणी कल्याणावर त्यांचें लक्ष सतत खिळलेलेंच राहील आणि महाराष्ट्रहि त्याच भावनेनें त्यांच्याकडे पाहत राहील यांत संशय नाही.