यशवंतराव चव्हाण

YCHAVAN N D MAHANOR
यशवंतराव चव्हाण

लेखक : ना. धों. महानोर
-------------------------------- 

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा

ज्या सर्वसामान्य जनतेवर आदरणीय यशवंतराव चव्हाणांनी आयुष्यभर अकृत्रिम प्रेम केलं त्या जनतेला -

यशवंतराव चव्हाणांसंबंधी मी खूप ऐकलं होतं. अनेक लोकांकडून त्यांच्या राजकारणासंबंधीं, मुत्सद्दीपणासंबंधी, जाणता, सुजाण, सुसंस्कृत नेता म्हणून मी ऐकलेलं होतं. साहित्य-कला-संस्कृतीच्या संबंधीच्या त्यांच्या असाधारण आस्था व प्रेमाबाबत मला अनेकांनी सांगितलं होतं. अनेक आठवणी लोकांनी सांगितल्या. साहित्य कलेच्या क्षेत्रातलं त्यांचं जाणतेपण व अकृत्रिम रसिकता, नवीन ग्रंथांचं वाचन व त्यासंबंधी चर्चा करणं असं अनेकांनी भरभरून मला सांगितलं. विद्यालयात शिक्षण घेत असताना लहानपणी असं खूप काही आम्ही ऐकलं. खूप दिवस त्यांच्यासंबंधी ऐकत गेलो. वृत्तपत्र व आकाशवाणीच्या माध्यमातून सतत यशवंतरावांसंबंधी ऐकून प्रेम व आकर्षण रूजत गेलं. त्यांना कधी समोरासमोर ऐकता येईल, पाहता येईल तर फार चांगलं हे खूप दिवस मनात घर करून असायचं. खूपच लहान खेड्यापाड्यांत, आडवळणाला आम्ही मुलं शिकत होतो. अशा ठिकाणी आपल्याला कधी त्यांची भेट होईल हे शक्यच नव्हतं. मराठी बिगरी ते चौथी असं माझं बालपणाचं शिक्षण तीन वेगवेगळ्या दूरच्या खेड्यांमध्ये वणवण करीत झालं. नंतर मराठी पाचवी ते अकरावीचं शिक्षण माझ्या पळसखेड्यापासून दहा किलोमीटर अंतरावरच्या जळगाव जिल्ह्यातल्या गावी झालं. नंतरची एक-दोन वर्षे जळगावच्या महाविद्यालयात काढली. नंतरचं शिक्षण अर्धवट सोडून मी पळसखेडला माझ्या खेड्यात कायमचा शेतीसाठी आलो. अठराव्या वर्षी घरी आलो तेव्हापासून त्या एक हजार लोकवस्तीच्या खेड्यात आजवर मी आहे. एवढ्या लहान खेड्यात सगळंच जतन करणं अवघड होतं. अशक्यप्राय होतं. मी धडपड करीत राहिलो.

१९५७ची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्राच्या राजकारणाला संपूर्ण कलाटणी देणारी चळवळ झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात या चळवळीला खूपच महत्त्वपूर्ण स्थान आहे. या चळवळीनं सगळ्यांनाच खूप नव्यानं शिकविलं. नवा इतिहास घडविला. शेंदुर्णी हे जळगाव जिल्ह्यातलं मोठं गाव. शेंदुर्णीच्या परिसरातल्या पंचवीस खेड्यांतले विद्यार्थी त्या वेळी शेंदुर्णीला शिकायला राहायचे. शेदुर्णीच्या विद्यालयानं, त्या वेळच्या तिथल्या शिक्षकांनी, तिथल्या वाचनालयांनी व त्या वेळच्या राजकीय सामाजिक घडामोडींनी आम्हां विद्यार्थ्यांना खूप शिकवलं. तिथे येणा-या-जाणा-या थोरामोठ्यांनी खोलवरचे संस्कार आम्हांला दिले. नाटकातल्या भूमिका, वक्तृत्व, प्रचंड वाचन, काव्यप्रेम या गोष्टींमुंळे मी लोकप्रिय विद्यार्थी होतो. त्याचा वापर त्या वेळचे शेंदुर्णीचे सगळे लोक करून घेत. मी ज्या शिक्षणसंस्थेत शिकत होतो त्या शिक्षणसंस्थेचेच शेंदुर्णीचे गजाननराव गरूड हे तरूण अभ्यासू व तडफदार असे राजकीय कार्यकर्ते होते. १९५७ च्या विधानसभेचे ते उमेदवार होते. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी मुंबईचे नौशेर भरूचा हे उमेदवार होते.