कृष्णाकांठ

Krishnakath
। कृष्णाकांठ ।

लेखक : यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र ( खंड पहिला)
--------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा

देवराष्ट्राच्या नैऋत्येला असलेल्या सागरेश्वराचे मंदिर पार करून, दीड-दोन मैलांची सागरेश्वराची खिंड ओलांडून खाली आल्यावर कृष्णेचे खोरे लागते. आजच्या स्वातंत्र्योत्तर काळातील तेथली सुबत्ताही जाणवते. पूर्वीही तेथे सुबत्ताच होती, याची कल्पना त्या परिसरातील असलेल्या गावांच्या नावांवरून येते. दही, दूध, तूप, या पूर्वीच्या काळी प्रचलित असलेल्या सुबत्तेच्या लक्षणांची कसोटी मानली, तर कल्पना येईल, की ओळीने त्या परिसरात, कृष्णेच्या काठी असणारी दुधारी, दह्यारी, ताकारी, तुपारी या नावांची गावे का आहेत.

संपूर्ण कृष्णाकाठ हा माझ्या प्रेमाचा, आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. महाबळेश्वरात उगमापासून निघावे आणि कृष्णामाईच्या काठाकाठाने थेट राजमहेंद्रीपासून तिच्या मुखापर्यंत जावे, असे मला नेहमी वाटते. बदलत्या पात्राची भव्यता पाहावी, निसर्गाचे सुंदरपण मनात साठवावे, तीरावरच्या गावांना भेटी द्याव्यात, लोकांच्या ओळखी करून घ्याव्यात, पिकांनी डोलणारी शेते पाहावीत असे अजूनही मनात येते.

महाबळेश्वरात एकाच ठिकाणी पाच नद्या उगम पावतात. डोंगराच्या वळचणींतून वेगवेगळ्या अंगांनी वाटा काढीत सपाटीवरून धावताना दिसतात. या पाच बहिणींचे परस्परांवरचे प्रेम मोठे अमर्याद. जन्मस्थळापाशी त्यांचे वेगळे अस्तित्व दिसते; पण ते तेवढ्यापुरतेच. फुगडीचा फेर त्यांनी धरला आहे, असे दिसावे, तोच त्या हातात हात घालून, गोफ विणून, एकजीव होऊन जातात आणि गोमुखातून बाहेर उडी घेतात. मग मात्र यांतील कृष्णा कोणती, कोयना कोणती, वेण्णा कोणती? दिसते, ती एक धार. गोमुखातून ही शुभ्र धार कुंडात उडी घेते आणि पुन्हा जमिनीच्या खालून वाटा काढीत वेगवेगळ्या वाटांनी या बहिणी निघून जातात. पुढे कुठेतरी डोंगरावरून उड्या मारताना त्या दिसतात. परंतु एक गोष्ट मात्र खरी, उगमापासून शंभर मैलांच्या आतच या बहिणींचा मिलाफ होतो आणि कराडपासून पुढे या सर्वजणी कृष्णामय बनूनच सागराच्या भेटीसाठी निघतात. जरा धारदार अंगाची कोयना कराडला, आपल्या बहिणीला- कृष्णाबाईला कडकडून भेटते. संगमावर मग आनंदाचा कल्लोळ होतो. या ठिकाणी पोचलेल्या या सर्वजणींचे पंचामृत मोठ्या पात्रात साठते आणि सुगंधित आणि चविष्ट बनून पांथस्थांची तहान शमविण्यासाठी आणि आसपासच्या परिसरास दिलासा आणि ओलावा देण्यासाठी पूर्वमुखी होऊन दक्षिणेकडे निघते.

कृष्णेच्या नावाशी आम्ही या कारणामुळे अगदी मनाने लहानपणापासून निगडित झालो आहोत. त्याला आणखी एक कारण आहे. उत्तरेला नीरा व दक्षिणेला वारणा यांमधला भूखंड हा पूर्वीच्या काळात सातारा जिल्हा या नावाने प्रसिद्ध होता. उत्तरेला नीरेच्या पंखाखालची, दक्षिणेला येलूर, तांदुळवाडी ही वारणाकाठची गावे असा हा परिसर होता. या सगळ्या भूखंडामधून वाहणारी प्रमुख नदी म्हणजे कृष्णाच आहे. ह्या कृष्णेच्या काठी वाई, कराड, सांगली यांसारखी जशी महत्त्वाची शहरे आहेत, तशीच उत्तम शेतीमुळे प्रसिद्ध असलेली अनेक खेडीही आहेत. ऐतिहासिक काळातही या परिसरातून अनेक कर्तबगार व्यक्ती निर्माण झाल्या आहेत. कृष्णाकाठच्या मेणवलीशी नाना फडणविसांचा संबंध आहे, तसाच उंब्रजशी धनाजी जाधवांचा आहे.

अशा या भूप्रदेशामुळे त्याला कृष्णेचा मुलूख असेच आम्ही मानतो. अगदी शास्त्रशुद्ध दृष्टीने विचार केला, तर कृष्णा खोरे हे याच्यापेक्षाही विस्तृत असे आहे. पण तो वेगळा प्रश्न आहे. सहवासाने, भावनेने कृष्णामाईशी आम्ही सर्व निगडित आहोत. बांधले गेलो आहोत. कृष्णेच्या काठची आठवण झाली, म्हणजे बालपणची आणि ऐन तरुणपणातील जीवनाची जडण-घडण करणा-या काळाची आठवण येऊन मन आजही कसे हेलावून जाते.