अभिनंदन ग्रंथ - जनमनाचे तरंग

जनमनाचे तरंग

निरीक्षक

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून श्री. यशवंतराव चव्हाण यांची ओळख सांगणारांची संख्या चक्रवाढ गतीने वाढते आहे ! अर्थात् ओळख सांगणारांच्याहि वेगवेगळ्या त-हा आहेत. कोणी सांगोत, "मी यशवंतरावांबरोबर कॉलेजांत होतो;' कोणी सांगतो, "आमचे  यशवंतराव परवा असं म्हणत होते, " कोणी फुशारकी मारीत सांगतो, "मी हें जरूर यशवंतरावांना सांगेन;" तर कोणी निधडेपणाचा आव आणीत सांगतो,"मी त्या दिवशीं यशवंतरावांना स्पष्ट सांगून टाकलें की !".... याहि पलीकडे जाऊन सलगीदर्शक उद्गारांची पेरणी सहज बोलतां बोलतां करणारेहि अधूनमधून भेटतात. 'अहो, यशवंतराव आमचे गल्लीकर' असें अभिमानाने सांगणारा 'क-हाडकर' ज्या मुंबईत भेटतो, त्याच मुंबईत 'या वर्षी मी यशवंतरावांना भाऊबीजेला खादी सिल्कची भेट दिली' असं जवळिकेने सांगणारी नागपूरकर महिलाहि भेटते !

'यशवंतरावांनी काय करावे' याविषयी अनाहून सल्ला देणारेहि पुष्कळ भेटतात. प्रत्येक क्षेत्रांतील लहानथोर माणसाची यशवंतरावांकडून कांही ना कांही अपेक्षा आहे; आणि ती बोलून दाखविण्याची संधि अनेकजण हुडकीत असतात. खरें म्हणजे, द्विभाषिक मुंबई राज्याच्या मुख्य मंत्रिपदावर आरुढ होऊन अखेरीस संयुक्त महाराष्ट्राचें ध्येय यशवंतरावांनी गाठल्याने यशवंतरावांच्या कर्तृत्वविषयी मराठी माणसाचें मन नि:शंक  झालें आहे. साहजिकच 'यशवंतरावांनी आता देशाचें नेतृत्व करावें' अशी अपेक्षादेखील कोणीकोणी सहज बोलून जातात. मात्र एकंदरींत जनमनाचा कानोसा घेतला तर 'यशवंतरावांनी आणखी किमान पांच वर्षे तरी महाराष्ट्रांत राहावें; आणि महाराष्ट्राचा जगन्नाथाचा रथ सुरळित चालू लागला की मगच दिल्लीला जावे' अशीच भावना सध्या तरी मोठ्या प्रमाणावर आढळते.

यशवंतरावांचा विषय अलीकडे कोठेहि उपस्थित होतो आणि बहुधा 'यशवंतराव फार चतुर मुत्सद्दी आहेत' असेच उद्गार ऐकावयास मिळतात. 'यशवंतराव फार चांगले गृहस्थ आहेत' असे उद्गार तर सामान्य शेतक-यापासून विरोधी पक्षाच्या नेत्यापर्यंत अनेकांच्या तोंडून ऐकूं येतात. 'पंतजींच्या गाव' च्या मुंबईतील एका टॅक्सीवाल्याने याचें कारण एकदा अचूक रीतीने विशद करून सांगितलें तो म्हणाला, "यशवंतराव चव्हाण हे रस्त्यांच्या उजव्या बाजूने चालत असले तर त्यांना तुम्ही चारपांच वेळां प्रयत्न करून रस्त्याच्या डाव्या बाजूकडे नेऊं शकतां. एखादी गोष्ट त्यांना पटवून दिली तर ते तुमचें ऐकतात, हेंच त्यांच्या चांगुलपणाचें रहस्य आहे."

पण यशवंतरावांच्या चांगुलपणाविषयी शंका घेणारे महाभागहि कधी कधी भेटतात. विरोधी पक्षांतील एक कार्यकर्ता खाजगी बैठकींत एकदा म्हणाला, "आमच्या समिती पक्षांतील कांही पुढारी आणि प्रजासमाजवादी पक्षाचे पुढारी 'यशवंतराव फार चांगले' असें कशाच्या जोरावर म्हणतात? चव्हाण विरोधी पक्षाच्या तोंडाला पानें पुसतात आणि आपल्याच पक्षांतील विरोधकांपुढे नमतें घेतात, हें आमच्या पुढा-यांना कसें कळत नाही?" मात्र खुद्द काँग्रेस पक्षांतहि असे कार्यकर्ते आढळतात की जे 'चव्हाण विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वपक्षीयांपेक्षा अधिक जवळ घेतात' अशी तक्रार अनेकदा करतात ! अर्थात्  यो दोनहि आरोपांत तथ्य नाही ! नागपूर येथील दीक्षामैदानाचा वाद श्री. यशवंतराव चव्हाण यांनी केवळ विरोधी पक्षीयांच्या मतालाच मान देऊन मिटविला आहे. या संबंधांत एका सेवानिवृत्त वरिष्ठ अधिका-याने माझेजवळ असे उद्गार काढले की, "सरकारची परवानगी न घेतां ज्या मैदानावर दीक्षाविधि झाला तें मैदान सरकारने केवळ आपल्या प्रतिष्ठेसाठी नवबौद्धांना नाकारावयास हवें होतें. उलट, सरकारने नवबौद्धांची मागणी अंशत: मान्य करून त्यांना डोक्यावर चढविलें आहे."

या संबंधांत खुद्द श्री. यशवंतराव चव्हाण यांची भूमिका मात्र अधिक सामाजिक स्वरुपाची आहे; आणि तिचें दर्शन झाल्यामुळे विदर्भांतील नवबौद्धांनी त्यांचें दीक्षामैदानावरच उत्स्फूर्त स्वागत केलें. १६ डिसेंबर १९६० रोजी दीक्षामैदानावर मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांचा जो सत्कार नवबौद्धांच्या वतीने झाला तो नागपुरांतील एक अपूर्व समारंभ गणला जातो. या सत्काराला यशवंतरावांनी दिलेली उत्तर ऐकून नागपुरांतील रात्रीच्या शाळेंत जाणारा एक नवबौद्ध युवक आपल्या शिक्षकाला दुस-या दिवशीं म्हणाला, "सर, चव्हाणसाहेब फार चांगले आहेत. आमचे पुढारी उगाच त्यांच्याविषयी नाही नाही तेंवाईट बोलतात."