अभिनंदन ग्रंथ - सहकारी शेतीच का ? -1

या प्रश्नाचा विचार करण्यासाठीं दोन परिसंवाद झाले अशी कल्पना करून त्यांत काय निष्कर्ण निघाले हें पहाणें मोठें उद्बबोधक ठरेल. एक परिसंवाद झाला अज्ञ शेतक-यांचा व तो पाच मिनिटांत संपला, दुसरा परिसंवाद तज्ज्ञांचा झाला तो पांच दिवस चालला. दोन्ही बैठकांत काय घडले? अज्ञ शेतक-यांच्या बैठकींत चर्चा सरु होताच या बाबतींत आपलें डोकें कांही चालत नाही अशी पटकन् प्रांजल कबुली त्यांनी दिली व ईश्वरावर विश्वास ठेवून इमानें इतवारें मेहनत करावी, बाकी डोकें खाजवूं नये, जसें चालल तसें चालेल; हा निर्णय त्यांनी पांच मिनिटांत घेतला व हा परिसंवाद संपला. तज्ज्ञांचा जो परिसंवाद झाला त्यांत अनेक तज्ज्ञ उपस्थित होते. अंकशास्त्रज्ञ ( statisticians) शेतीशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ इत्यादि तज्ञांनी त्यांत भाग घेतला. प्रथम शेतीसंबंधीची आकडेवारी परिसंवादांत सादर करण्यांत आली. निम्माहून अधिक जमिनी पांच एकरांच्या आंत आहेत व त्या किफायतशीर नाहीत ही वस्तुस्थिती सर्वांना विदित करण्यांत आली. तेव्हा शेती शास्त्रज्ञ व अर्थशास्त्रज्ञ यांनी सांगितले, या दहावीस एकरांच्या आंत असलेल्या जमिनी अर्थक्षम क्षेत्र (economic holdings) च्या सदरांत पडत नाहीत. त्या किफायतशीर होणार नाहीत, म्हणून या अर्थ क्षम नसलेल्या (uneconomic holdings) छोट्या आकाराच्या जमिनीचें अर्थक्षम क्षेत्रांत रुपांतर झाल्याशिवाय कार्यभाग होणार नाही. सारांश अशी छोट्या तुकडेवजा पांचसात एकरांच्या आंत असलेल्या जमिनीची शेती किफायतशीर होणार नाही हा मुद्दा या परिसंवादांत सर्व मान्य झाला. तेव्हां अशा छोट्या जमिनीचें एकत्रीकरण हा मुद्दा चर्चेला घेण्यांत आला. दोनचार एकरवाल्या दहावीत लोकांना एकत्र आणून हें एकत्रीकरण करतां येईल कीं नाही याचा उहापोह करण्यांत आला. लोकांना एकत्र न आणतां जमीन एकत्रित करावयाची तर कांही लोकांना तेथून हाकून लावून कांहीच्या ताब्यंत ती जमीन द्यावी ही मुद्दा तर कोणालाच पसंत नाही. तेव्हा शेतक-यांनी एकत्र येऊन एकत्रित शेती करावी या सहकारी शेतीच्या मुद्दयाचा परिसंवादांत विचार सुरु झाला. तेव्हा राज्यशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ यांनी कांही मूलभूत आक्षेप उपस्थित केले. मानसशास्त्रज्ञांच्या विचारांत मानसिक प्रक्रियांचे चांगले विश्लेषण होतें. ते म्हणाले, "अहो, लोक एकत्र येऊन आपली शेती एकत्रित करतील हीगोष्ट मानसशास्त्र पहातां अशक्यप्राय आहे. आज प्रेमाने लग्न झालेल्या अनेक कुटुंबांतून काडीमोडीचे वाढतें प्रमाण आहे; जे प्रत्यक्ष पाठीवर पाय देऊन आले आहेत असे सख्खे भाऊ सुद्धा एकत्र कुटुंबपद्धतीला फाटा देऊन विभक्त होत आहेत. हें आपण पाहत असतांना ज्यांचे कांही संबंध नाहीत असे शेतकरी एकत्र येऊन आपल्या सर्व जमिनी एकत्रित करतील व एकत्र कसतील हें अगदी असंभवनीय आहे." हा मुद्दा परिसंवादांतील तज्ज्ञांनाहि पटला व त्यांत तथ्य आहे हें कोणीहि मान्य करील. असें हें विचारमंथन पांच दिवस चालून या प्रश्नाचा सखोल व शास्त्रोक उदापोह झाला. पण निष्कर्ष काय हा खरा मुद्दा आहे. आणि एकत्र शेती होणेंहि कठीण आहे, हाहि मुद्दा या सर्वांना मान्य झाला आहे. तुकड्यांची शेती चालत नाही आणि सहकारी शेती होत नाही असा या परिसंवादाचा निष्कर्ष आहे. हेंहि होत नाही आणि तेंहि होत नाही तेव्हा होईल ते होईल हाच तज्ज्ञांचा निष्कर्ष झाला. म्हणजे अडाणी शेतक-यांनी जो निर्णय पांच मिनिटांत प्रांजळपणें घेतला तोच निर्णय या अधिकारी तज्ज्ञमंडळींनी पाच दिवसांनी घेतला ही मौज नव्हे काय ? तुकड्याची शेती फायदेशीर नाही हें विचारी लोकांना माहीत आहे व सहकारी शेती अवघड आहे हेंहि विचारी लोकांना माहित आहे. तेव्हा केवळ उणीवा सांगून वा रोगनिदान करून चालत नाही ! तर कांही पर्याय वा उपचार सुचवावा लागतो. तर त्याला विचार म्हणतां येईल. नाही तर तो वावदूकपणा ठरेल. सहकारी शेतीबद्दल जे विचारवंत आज टीका करीत आहेत त्यांनी लहानलहान जमिनींना उत्पादनक्षम, अर्थक्षम व कार्यक्षम बनविण्यासाठी कोणत्या रीतीचा अवलंब केला पाहिजे याचे शास्त्रोक्त पर्याय व समर्पक उत्तर दिल्याशिवाय, केवळ सहकारी शेतींतील अडचणींचा बाऊ करून, तिला विरोध करण्याने कार्यभाग होणार नाही.

वरील विवेचनावरून शेतीची समस्या अगदी स्पष्ट होईल. जमिनीची प्रकृति पहातां अलग तुकड्याची शेती जमत नाही आणि मासणांची प्रकृति पहातां सहकारी शेती जमत नाही ही ती समस्या होय. धनाचा विचार केला तर जमिनी एकत्र केल्या पाहिजे आणि मनाचा विचार केला तर त्या अलग असल्या पाहिजेत असा हा पेच आहे. अलग शेती वठत नाही आणि सहकारी शेती पटत नाही असा हा भारी सवाल आहे, यापैकी श्रेयस्कर काय याचा निर्णय केल्याशिवाय केवळ शंकाकुशंकांनी हा गंभीर प्रश्न अधिक गुंतागुतीचा करण्यापलिकडे कांही साधारण नाही. जो आपली बुद्धि थोडीसुद्धआ वापरील त्याला याचें स्पष्ट उत्तर दिसेल. जमिनी छोट्या आहेत या मोठ्या कराव्यात हें तर निसर्गत:च शक्य नाही आणि लोकांना एकत्रित आणणेंहि अशक्यप्राय आहे, हे दोन्ही मुद्दे मान्य केले तरी एकच उत्तर निघतें आणि तें हें की जमिनीचा आकार आम्ही बदलूं शकत नाही, पण माणसांचा विकार आम्ही बदलूं शकतों. छोट्या जमिनी आम्ही मोठ्या करूं शकत नाही, पण छोटे मन आम्ही मोठें करूं शकतो. म्हणजेच सहकारी शेतीशिवाय तरणोपाय नाही. सारांश सहकारी शेती अवघड असली तरी शेतीची परिस्थिती जर आम्हाला बदलता येत नाही तर माणसाची मनस्थिती बदलून ती परिस्थिती कांबूत आणून शेती आणि शेतकरी यांना संपन्न करणें हाच एकमेव पर्यात उरतो व हाच सहकारी शेतीचा अर्थ आहे.