व्याख्यानमाला-१९९५-९६-८३

बर्ट्रांड रसेल या तत्वज्ञाने म्हटल्याप्रमाणे There cannot be a moral man in an immoral society भ्रष्ट समाजात कोणतीच व्यक्ती नैतिक राहू शकत नाही हे आपण अनुभवीत आहोत. या भ्रष्टाचाराविरुद्ध जनआंदोलनही झाले पाहिजे. परंतु हा लढा दीर्घकाळ चालणारा आहे. या संदर्भात मी एक उदाहरण देतो. इंग्लंडमध्ये दुसरा चार्ल्स हा राजा असताना सर्व त-हेचा भ्रष्टाचार बोकाळला होता. इंग्लंडचा एका वेळचा पंतप्रधान वॉलपॉल हा उघडपणे लाच घेत असे आणि त्या भ्रष्ट आचरणाचे समर्थन 'प्रत्येक माणसाची काही किंमत ठरलेली असते - Every man has his Price या शब्दात करीत असे. या अवनत अवस्थेला तोंड देण्यासाठी इंग्लंडमधील अनेक समाजसेवक, सामाजिक व शैक्षणिक संस्था यांनी सतत प्रयत्न केले, तेथील काही राजकीय नेत्यांनी व राजकीय पक्षांनी दीर्घकाळ अनेक चळवळी करुन समाजरचनेत व आर्थिक व्यवस्थेतही आवश्यक ते बदल घडवून आणले आणि त्यातूनच इंग्लंडचे राष्ट्रीय चारित्र्य घडविले गेले. या राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावरच इंग्लंडने दुस-या महायुद्धात हिटलर विरुद्ध खंबीर लढा देऊन जगातील हुमूकमशाहीचा पराभव करण्यात मोठीच कामगिरी करुन दाखविली. आपल्याला हेच करावे लागेल. यासाठी समारजरचना व अर्थ रचना बदलावी लागेल, आणि माणसांच्या वृत्तीतही परिवर्तन घडवून आणावे लागेल. या मुद्दाचे थोडे अधिक स्पष्टीकरण करु इच्छितो. आपण एकाच वेळी उत्पादक आणि उपभोक्ते असतो. शेतकरी धान्य पिकवतो, कामगार कापड निर्माण करतो, शिक्षक शिकवितो हे सारे उत्पादक श्रम आहेत. त्याचवेळी आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या अन्न, वस्त्र, निवारा,शिक्षण व आरोग्य या गरजा भागवितांना आपण उपभोक्तेही असतो. आपण समाजासाठी उत्पादक श्रम करतो आणि समाजातील अन्य घटकांनी केलेल्या उत्पादनाचा उपभोग घेतो.  यो दोहोंमध्ये समतोल राखला गेला तर तो सदाचार ठरतो. परंतु आज भारतात प्रत्येकजण उत्पादक श्रम करताना कुचराई करतो आणि उपभोग जादा घेतो. कामगारांना कामाचे तास कमी हवेत, प्राध्यापकांना अध्यापनाचे तास कमी हवेत; मात्र पगार भरपूर हवा. महागाई भत्ता वाढवून हवा. बोनसही जादा हवा. हा भ्रष्ट आचार आहे. कारण येथे आपण आपल्या हक्कांचा आग्रह धरताना आपले कर्तव्य करण्यात मात्र कुचराई करतो. आपल्यातील या स्वार्थी प्रवृत्तीला आळा बसला आणि आपण हक्काइतकीच कर्तव्याची जाणीव ठेवली तर भ्रष्टाचाराचे नियंत्रण होऊ शकेल. हा व्यक्तिजीवनातील बदल जितका आवश्यक आहे तितकीच आवश्यकता समाजरचनेत व अर्थरचनेत बदल करण्याची आहे. हा रचनात्मक बदल करताना आर्थिक शोषणावर नियंत्रण घालणे, कोणाही एका व्यक्तीस दुस-याच्या न्याय्य हक्कांवर आक्रमण करु न देणे हे जरूर आहे. म्हणजेच सामाजिक न्याय व समता यावर आधारलेला समाज निर्माण करावा लागेल. हे केले तरच आपल्या समाजाला लागलेले भ्रष्टाचाराचे ग्रहण सुटू शकेल. यासाठी प्रयत्न करणारे तरुणांचे गट आजही भारतात आहेत. परंतु या कार्यकर्त्यांचे एक व्यासपीठ नाही. असे पुरोगामी कार्यकर्त्यांचे व्यासपीठ हाच भारतीय लोकशाहीचा आधार होऊ शकेल. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपणलोकशाही राज्यपद्धती स्वीकारली. परंतु लोकशाही ही भारताची जीवनपद्धती झालेली नाही. सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे तसेच समाजजीवनातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन झाले नाही तर लोकशाही ही केवळ दिखाऊ राहील. या लोकशाहीच्या आजवरच्या वाटाचालीतील खाचखळग्यांचे तसेच आपण केलेल्या चुकांचे दिग्दर्शन करतानाच या लोकशाहीच्या भविष्यकालातील वाटचालीचे स्वरुप कसे असावे हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. क-हाडच्या प्रगल्भ श्रोत्यांनी माझे विचार शांतपणे ऐकले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
 
- गं. प्र. प्रधान ( १४ मार्च १९९६)