यशवंतराव चव्हाण
व्याख्यानमाला
वर्ष अठरावे १९९०
नगरपालिका नगरवाचनालय, क-हाड
-------------------------------
Ebook साठी येथे क्लिक करा |
मनोगत - पी. डी. पाटील, नगराध्यक्ष
स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात जे जे उपभोगले – पाहिले – अवलोकन केले, ते सर्व सामाजिक प्रश्न त्यांनी अभ्यासपूर्वक व उत्तमरीतीने सोडविले आणि त्यातूनच ते महाराष्ट्राचे ख-या अर्थाने शिल्पकार ठरले. ज्या सामाजिक जाणिवेतून त्यांनी हे कार्य तडीस नेले, अशा विषयांचे समाजप्रबोधन होऊन ते विचार नव्या पिढीस मार्गदर्शक ठरावेत, म्हणून ‘यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाले’चा जन्म १९७३ साली झाला. ही व्याख्यानमाला आदरणीय चव्हाणसाहेबांच्या १२ मार्च या जयंतिदिनी जाणीवपूर्वक चालविली जाते आणि गेल्या दोन दशकाहून अधिक वर्षे ती सातत्याने चालविली जात आहे. एकाच विषयावर एकाच वक्त्याची सलग २/३ व्याख्याने प्रतिपाद्य विषय सविस्तर आणि पूर्णतः कथन व्हावा या हेतूने आयोजिली जातात हे एक आणखी या व्याख्यानमालेचे वैशिष्ठ्य आहे. या प्रथेमुळे या व्याख्यानमालेचे व्यासपीठावर थोर विचारवंत, अभ्यासक आणि मर्मज्ञ यांची हजेरी लागली. मौलिक विचारांचे मंथन व कथन झाले. आणि त्यातून ही एक वैचारिक व्याख्यानमाला म्हणून ओळखली जाऊ लागली, याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो.
क-हाडच्या जाणत्या रसिकांकडून या वैचारिक व्याख्यानांना आजवर उत्तम प्रतिसाद मिळत राहिलेला आहे, याचा येथे कृतज्ञतेने उल्लेख करणे जरुरीचे आहे. या व्याख्यानांतील विचार ऐकून तसेच सोडून न देता हे अभ्यासनीय विचारधन शब्दबद्ध करावेत अशा मौलिक सूचना जाणकार श्रोत्यांनी केल्या. त्यांचा साकल्याने विचार झाला आणि अशी निवडक व्याख्याने पुस्तकरूपाने प्रकाशित करणेची प्रथा पाडली. आजवर अशी ११ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. या प्रकाशित पुस्तकांपैकी दोन पुस्तके तर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व मुंबई विद्यापीठाने एम. ए. च्या अधिक वाचनासाठी ३ वर्षे नियुक्त केली होती. हे या पुस्तक प्रकाशन कार्यातील सुयश आहे.
सन १९९० साली महाराष्ट्रातील एक अभ्यासक, विचारवंत आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. राम जोशी यांनी ‘भारतीय राजकारण : अभ्यासाची एक दिशा’ या विषयावर दोन व्याख्यानांतून अभ्यासनीय असे विचार मांडले. ते मौलिक विचार पुस्तक रूपाने प्रकाशित करीत असताना सातत्यपूर्वक वाटचालीचा आणि स्तुत्य उपक्रम क-हाड नगरपालिकेने राबविलेचा आम्हास आनंद वाटतो.
क-हाडच्या मे. लोकमान्य मुद्रणालयाचे अनुभवी मालक आणि वाकबगार कामगारांनी हे पुस्तक वेळेत सुबक अशा रीतीने मुद्रांकित केलेचा उल्लेख करणे उचित आहे.
वैचारिक धनाची ही बारावी ग्रंथनिर्मिती आम्ही स्वर्गीय यशवंतरावजींच्या स्मृतीस प्रगाढ श्रद्धेने विनम्र होवून समर्पण करीत आहोत.