व्याख्यानमाला-१९८०

Vyakhyanmala 1980
यशवंतराव चव्हाण

व्याख्यानमाला

वर्ष आठवे १९८०

नगरपालिका नगरवाचनालय, क-हाड
--------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

मनोगत - पी. डी. पाटील, नगराध्यक्ष

कराड नगरपालिकेन १९७३ मध्ये ‘यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला’ सुरू केली. १९८० सालातील यशवंतरावांच्या वाढदिवशी ज्या थोर विचारवंतांची व्याख्याने झाली, त्यांची ही मुद्रित प्रत वाचकांच्या हाती देताना मनाला एक समाधान वाटते.

साहित्य, सौंदर्य, संगीत, क्रीडी, करमणूक या समाज जीवनाला स्पर्श करणा-या व समाधान देणा-या गोष्टी आहेत. शारदीय व्याख्यानमालेच्या निमित्ताने कराड नगरपालिकेने या संदर्भात कराडची एक वैशिष्ट्यपूर्ण अभिरूची निर्माण केली आहे. त्याच बरोबर आजच्या गतिमान कालखंडात, नव्या पिढीतील समाजघटकांत चिकित्सक नि अभ्यासूवृत्ती वाढीस लागावी. सामाजिक, राजकीय, आर्थिक समस्यांचा आणि स्थित्यंतराचा परिचय व्हावा ही अत्यावश्यक बाब आहे. समाजातील विचारवंतांचे विचारधन मुक्तपणे उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. एका प्रयत्नवादी, अभ्यासू नि यशस्वी असा सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाच्या – संस्काराचे – विचारधन प्रसारणाचे एक अनन्यसाधारण कार्य नगरपालिकेने आजपावेतो कराडच्या जीवनात समाधानाने उभारले आहे.

या व्यख्यानमालेतील व्याख्यानातून यशवंतरावांच्या जीवनचरित्राची चर्चा होत रहावी हा तर प्रधान हेतू मुळीच नाही. तर आजच्या भारतीय समाजाच्या नि राष्ट्रीय जीवनाच्या समस्या आव्हानाचे स्वरूप घेऊन आप्लायपुढे उभ्या राहिल्या आहेत त्या सामाजिक, राजकीय, आर्थिक समस्यांचा अभ्यासपूर्ण उहापोह अधिकारी व्यक्तींचा नियोजित व्याख्यानातून व्हावा, हाच प्रधान हेतू या व्याख्यानमालेचा आहे.

विचारवंतांच्या विचारांचे प्रसारण करणारे मुक्त व्यासपीठी म्हणून यशवंतराव चव्हाणांचे नाव या व्याख्यानमालेला देण्यात आलेले आहे. १०७२-७३ साली या विचारप्रसारण कार्याला ‘यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला’ या नामाभिधानाने शुभारंभ झाला. म्हणजे असा लोकजागरणाचा वसा घेऊन त्यांचा वाढदिवस हा प्रत्येक कराडकरांच्या जीवनातील एका ममत्वाच्य भवनेला हेलावणारा दिवस आहे.