व्याख्यानमाला-१९९५-९६-८१

माणूस यंत्राचा गुलाम बनू नये हे गांधीजींचे तत्व मला मान्य आहे. या तत्वाच्या आधारानेच आधुनिक तंत्रविज्ञानाचा वापर कसा करता येईल या संबंधी काही विचारवंतांनी मांडलेल्या कल्पना मी आपणासमोर ठेवू इच्छितो. येथे हे प्रथम स्पष्ट केले पाहिजे की उत्पादन व्यवस्था आणि राज्यव्यस्था यांचा फार निकटचा संबंध असतो. म्हणून भारतीय लोकशाहीच्या वाटचालीची भावी दिशा काय असावी, हे सांगताना मी भारतात लोक सहभागी होत असलेली विकेंद्रीत लोकशाही अस्तित्वात आणण्यासाठी आधुनिक तंत्रविज्ञानाचा वापर विकेंद्रीत पद्धतीने करुन नवी उत्पादन व्यवस्था निर्माण करावी लागेल, या विचार आपल्यापुढे ठेवीत आहे. अल्विन टॉफलर या लेखकाने त्याच्या 'थर्ड वेव्ह' या पुस्तकात या विषयाचे अत्यंत उद्बोधक विवेचन केलेले आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी 'थर्ड वेव्ह' हे पुस्तक वाचले पाहिजे असे मला वाटते. या पुस्तकांतील काही कल्पना मी सूत्ररुपाने आपणापुढे मांडीत आहे. टॉफलरच्या मते आधुनिक तंत्रविज्ञानाच्या मदतीने मानवी श्रमांचा वापर किमान करावयाचा ही पद्धती अयोग्य आहे, त्याचप्रमाणे उत्पादनाचे केंद्रीकरण करणारे प्रचंड मोठे औद्योगिक प्रकल्प उभारणेही अनिष्ट आहे. यापुढे उत्पादन व्यवस्थेत इलेक्ट्रॉनिक्सचा उपयोग विकेंद्रीत पद्धतीने करुन औद्योगिक प्रकल्प शहरात एकत्र न ठेवता त्यांचे वेगवेगळे उत्पादक विभाग ग्रामीण भागात नेणे शक्य होईल. टॉफलर याने एका प्रकरणात लिहिले आहे की, उत्पादनाचा घटक 'इलेक्ट्रॉनिक्स' नी सुसज्ज असलेली झोपडी (इलेक्ट्रॉनिक् कॉटेज ) हा असेल आणि उत्पादन तंत्र पूर्णत: विकेंद्रीत करता येईल.  उत्पादनाचा दर्जा टिकविण्यासाठी संगणकांचा उपयोग करावा लागेल असेही टॉफलर यांनी त्यांच्या विवेचनात म्हटले आहे. गांधीजींची विकेंद्रीत अर्थव्यवस्थेची कल्पना आणि आधुनिक तंत्रविज्ञान यांचा संगम घडवून आणणे शक्य आहे, हा विचार विस्ताराने मांडलेल्या या पुस्तकातील प्रकल्पाला टॉफलर यांनी 'गांधीजींसह उपग्रह' 'गांधी वुअिथ सॅटलाइट' असे शीर्षक दिलेले आहे. उर्जेच्या बाबतीतील विवेचन करताना टॉफलर यांनी मानवाने निसर्गाशी सुसंवाद साधण्याचे तंत्र निर्माण केले पाहिजे अशी भूमिका मांडून भारतासारख्या देशात सौर उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागेल. असे ठामपणे सांगितले आहे. राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण यांची गुंफण लक्षात घेऊन भारतीय लोकशाहीचे विकेंद्रीकरण करावयाचे असल्यास अर्थव्यवस्थेचे आणि उत्पादन तंत्राचे विकेंद्रीकरण कसे करता येईल याचे मी आतापर्यंत विवेचन केले आता आपल्या मुख्य सामाजिक समस्यांचा विचार लोकशाहीच्या संदर्भात कसा करावा लागेल यासंबंधी काही विचार मांडू इच्छितो.

एकविसाव्या शतकात जगापुढील समस्या कोणत्या असतील याचे सुंदर विवेचन पॉल केनेडी या विचारवंताने आपल्या 'अॅप्रोचिंग दि ट्रवेन्टी फर्स्ट सेंच्युरी' ( एकविसाव्या शतकाच्या समीप जाताना ) या पुस्तकात केलेले आहे. या पुस्तकात भारत आणि चीन यांच्यावर एक विस्तृत प्रकरण आहे. या प्रकरणातील विवेचनात केनेडी यांनी भारत व चीन या खंडप्राय देशातील प्रचंड लोकसंख्येची समस्या किती बिकट आहे हे स्पष्टपणे मांडले आहे. २१ व्या शतकातील पहिल्या पंचवीस वर्षानंतर भारताची लोकसंख्या एक अब्ज इतकी होईल. त्यातही भारतातील आयुर्मर्यादा सध्या वाढली असल्यामुळे ६० वर्षावरील स्त्री पुरुषांची संख्या खूप मोठी होऊन हा अनत्पादक लोकसंख्येचा भार सहन करणे भारताला कठीण जाईल; असा केनेडी यांचा अंदाज आहे. भारतातील कृषी उत्पादन व औद्योगिक उत्पादन असे एकूण उत्पन्न २+२+२ या बेरजेच्या पद्धतीने वाढते आणि लोकसंख्या २x२x२ अशा गुणाकाराच्या पद्धतीने वाढते; त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा वाढत जाऊन दारिद्रय भीषण स्वरुप धारण करते हे आपण आजवर अनुभवले आहे. २१ व्या शतकात ही समस्या अधिक बिकट होणार आहे आणि त्यामुळे आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात प्रचंड वाढ केल्याशिवाय आपल्याल जगताच येणार नाही. याच प्रश्नाची आणकी एक बाजू ही की माझ्या पिढीतील लोकांच्या गरजा फार कमी होत्या. आज जग झपाट्याने जवळ येत असल्यामुळे, दूरदर्शनवर इतर देशातील लोक आणि आपल्याकडील श्रीमंत लोक कसे जगतात, काय खातात, पितात, कशा त-हेचे कपडे घालतात आदी गोष्टी सतत पाहिल्यामुळे सर्वसामान्य माणसाची जगण्याबद्दलची आकाक्षा बदलली आहे; पूर्वी ज्या वस्तू चैनीच्या मानल्या जात त्या आता जीवनावश्यक वस्तू मानल्या जातात. म्हणजे एकीकडे उत्पादन अपुरे पडणार आणि त्याचवेळी आकांक्षा वाढलेल्या असणार, याचा परिणाम समाजातील तणाव व संघर्ष वाढण्यात होईल. परंतु काही विचारवंतांच्या मताने आपण परिस्थितीमुळे निराश न होता, या समस्येला सामोरे गेले पाहिजे आणि आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने काळाचे हे आव्हान स्वीकारले पाहिजे. येथे मी पुन्हा टॉफलरने त्याच्या पुस्तकात मांडलेल्या काही विचारांचा आणि आपल्याकडे काही कल्पक वैज्ञानिकांनी केलेल्या प्रयोगांचा उल्लेख करु इच्छितो. टॉफलरच्या मताने बायोगॅसचा वापर प्रत्येक लहान गावात पद्धतशीरपणे व प्रचंड प्रमाणात करावा लागेल.