व्याख्यानमाला-१९९२

Vyakhyanmala 1992
यशवंतराव चव्हाण

व्याख्यानमाला १९९२

लेखक : पी. डी. पाटील (नगराध्यक्ष-क-हाड)
-------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

मनोगत

सन १९९२ सालच्या विसाव्या ‘यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाले’ त आदरणीय साहेबांच्या जयंतीदिनी “एक वक्ता – एकच विषय” या व्याख्यानमालेच्या प्रथेस अनुसरून डॉ. भा. ल. भोळे, नागपूर यांना या वेळी प्रयत्नपूर्वक व्याख्याते नेमस्त केले होते.

डॉ. भोळे नागपूर विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्रदीर्घ अनुभवी प्राध्यापक, त्या विषयाचे गाढे अब्यासक, महाराष्ट्रातील एक थोर साहित्यिक. व्यासंगी – विचारवंत, विशेषतः चव्हाणसाहेबांच्या चतुरस्त्र नेतृत्वावर प्रगाढ श्रद्धा असलेले परखड व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी “आपल्या विकासाची दिशा आणि लोकशाहीचे भवितव्य” या सद्यस्थितीतील अत्यंत महत्वाच्या व मूलगामी अशा विषयावर सलग तीन दिवस व्याख्यानातून अभ्यासपूर्ण – मौलिक विचार कराडवासियांना ऐकविले आहेत. त्या बद्दल आम्ही डॉ. भोळे यांचे आभारी आहोत.

आदरणीय यशवंतरावा चव्हाण यांनी त्यांच्या सबंध राजकीय जीवनात समाज प्रबोधन आणि समाज परिवर्तन या कार्यांना अनन्यसाधारण महत्व दिले होते; ते कार्य या पुढेही तसेच तेवत रहावे या जाणीवेतून सन १९७२ पासून ‘ यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाले’ ची सुरुवात केली. या व्याख्यानमालेत व्यक्त झालेल्या मौलिक विचारांचा प्रभाव पाहून आणि कांही व्यासंगी सज्जनांच्या सूचनेवरून अशी अभ्यासपूर्ण आणि निवडक व्याख्याने पुस्तकरूपाने प्रकाशित केली. हा उपक्रम स्तुत्य – प्रशंसनीय ठरलेला आहे. त्या प्रोत्साहनातू निवडक व्याख्याने शब्दबद्ध करून ती पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याचा पायंडा असाच पुढेही चालू ठेवण्याचा ‘मनोदय’ आहे. पुस्तक रुपातील विचारांचा हा मौलिक ठेवा भावी पिढीस दीपस्तंभाप्रमाणे जरुर मार्गदर्शक ठरेल, अशी आमची श्रद्धा आहे.

सदर पुस्तक मे लोकमान्य मुद्रणालय, क-हाचे श्री. गजानन गिजरे व त्यांचे वाकबगार व मेहनती कामगार यांनी वेळेतच नव्हे तर सुबक छपाई करून दिलेबद्दल त्या सर्वाचे आभार!

यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेच्या निमित्ताने साहेबांच्या जयंतीदिनी त्यांना ‘उदंड आयुरारोग्य लाभावे’ म्हणून प्रार्थना करावयाची पण..... ते सर्वाचे आदरणीय – प्रिय ‘साहेब’ आज आपल्यात नाहीत! सामान्यांबद्दल सतत आत्मीयता बाळगून तसे वागणारा चतुरस्त्र नेता कृष्णाकाठी कायमचा विसावला आहे! त्यांच्या पवित्र स्मृतीला ही निर्मिती विनम्र सादर समर्पण!

पी. डी. पाटील
नगराध्यक्ष
क-हाड
दि. १२-३-१९९३