व्याख्यानमाला-१९९५-९६-४८

आपण म. जोतिबा फुलेंचे आद्य समाज क्रांतीकारक म्हणून नांव घेतो. त्यांनी सुद्धा “सार्वजनिक सत्यधर्म” प्रस्थापित व्हावा म्हणूनच सत्यशोधक समाज संघटीत केला. म. गांधींनी सर्व धर्म समभाव सांगून “सबको सन्मती दे भगवान” अशीच आयुष्यभर प्रार्थना केली. राजर्षी शाहू महाराजांनाही पुनर्रचित “आर्यधर्मा” च्या प्रसारात स्वारस्य निर्माण झाले आणि जगांतील सर्वात पीडीत दलित जनतेचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही आयुष्याच्या शेवटी, भगवान गौतमाच्या बौद्ध धर्माच्या मार्गानेच गेले पाहिजे असाच निर्णय घेतला. नवसमाज निर्मितीमधील ख-या धर्माचे स्थान नीटपणे समजून घेवूनच पुरोगाम्यांनी देव, धर्माबद्दलची आपली नकारात्मक भूमिका तपासून घेतली पाहिजे.

नवी मानवी संस्कृती ही आत्मज्ञान आणि विज्ञान यावर उभी राहिली पाहिजे. अशा संस्कृतीचा शोध फक्त सत्यशोधक सत्याग्रहीच घेऊ शकले. ही मनोवृत्ती सार्वत्रिक स्वरूपांत कशी उभी करायची हेच आपल्यापुढील मुख्य आव्हान आहे. माणसाच्या मनोवृत्तीची ज़डणघडण करणारी तीन प्रमुख ठिकाणं आहेत.  पहिले कुटुंब, दुसरे उपासनामंदीर आणि तिसरे शिक्षण मंदीर, या तिन्ही स्थानांची पुनर्रचना करू नव्या पिढीचे संगोपन, नव्या मानवी संस्कृतीचे पाईक, सैनिक, स्वयंसेवक म्हणून करता आले पाहिजे. मी ज्यांना गुरुस्थानी मानतो ते कै. आचार्य जावडेकर म्हणायचे कुटुंब म्हणजे घर, शाळा आणि देऊळ यांचा त्रिवेणी संगम असे असले पाहिजे. आम्ही ही माणसाच्या जडणघडणीची ठिकाणे फार दुर्लक्षित करून मोडकळीस आणली आहेत. ती तंदुरुस्त करूनच नवा महाराष्ट्र नवा महाराष्ट्र वा नवभारत उभा करता येईल.

आणखी दोन मुद्दे मांडून मी माझे हे तिसरे आणि शेवटचे भाषण थांबवणार आहे. मनःस्थिती परिवर्तनाबरोबर परिस्थिती परिवर्तन हे आवश्यक आहेच आणि त्यासाठी तंत्रज्ञानाची अमोघ शक्ती आज मानवाच्या हाती आली आहे. पाश्चात्य संस्कृतीची हीच जगाला मोठी देन आहे. परंतु विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापरही पाश्चात्यांची आंधळी कॉपी करीत बसल्यामुळे आम्ही आमचे नुकसान फार वेगाने करतो आहे. तंत्रज्ञान म्हणजे काहीतरी अत्यंत गुंतागुंतीचे, अवघड, प्रचंड भांडवली खर्चाचे, हाय टेक्नॉलॉजी म्हणजे काहीतरी आभाळाला जाऊन उंचीवर बसलेले, सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असं काहीतरी स्वरूप आज दिलं गेलं आहे. सामान्य माणसाची परिस्थिती पालटण्यासाठी त्याच्या परिसरातच संपत्ती निर्माण करण्याचे काम गावोगांव झालं पाहिजे. संपत्तीचे खजीने सभोवारच्या नैसर्गिक साधन संपत्तीतच आहेत जमीन, पाणी, प्राणी, वनस्पती, हवा, सूर्यप्रकाश हेच आगाध खजिने आहेत आणि खजिन्याची दारे उघडणारी किल्ली विज्ञान, तंत्रज्ञानांत आहे. या नैसर्गिक पंचमहाभूतांचे सुयोग्य असे संधारण करणारे सुलक्ष, स्वस्त, उचित असे तंत्रज्ञान, लोकभाषेत प्रात्यक्षिकाद्वारे घराघरापर्यंत नेणे हेच यापुढे परिवर्तनातले मुख्य पाऊल ठरणार आहे, गावोगांव अशा सुलभ उचित तंत्रज्ञानाचा पुरवठा करणारे “विज्ञान आश्रम” सुरू केले पाहिजेत. खरं म्हणजे ज्ञानेश्वरी सप्ताह थोडे कमी करून विज्ञानेश्वरी सप्ताह गावोगांव सुरू केले पाहिजेत.

आपले नगराध्यक्ष, आमदार पी. डी. पाटीलसाहेब यांनी परवा एक प्रसंग सांगितला. त्यांची आणि गगनगिरी महाराजांची एक चर्चा झाली. महाराज म्हणजे संत, अध्यात्मिक धार्मिक पुरुष. पण ते दोन तीन तास बोलले ते एकाच विषयावर. ते म्हणाले, यापुढे या देशाची सेवा व्हायची असली, या देशाचे दुर्भाग्य हटवून भाग्य उजळायचे असेल तर एकच मार्ग आहे. विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. जगभर प्राप्त झालेले विज्ञान तंत्रज्ञान समजून घेऊन, आपल्या प्रश्नांची सोडवणूक करणारे उचित असे निवडून सुलभ रीतीने कसे घरोघर पोचवता येईल हेच पाहिले पाहिजे. हे आपण करू शकलो तर तीन एकर जमीन असणारा शेतकरीही हेलीकॉप्टरमधून फिरू शकेल.”

गगनगिरी महाराज बोलले ते थोतांड नाही, भौतिक सुविधा निर्माण करण्याचे विज्ञान तंत्रज्ञानाचे प्रचंड सामर्थ्य अजून आपण जाणलेले नाही. आपल्याजवळ आपल्याच चौथी, पांचवी इयत्तेवर्यंत शिकलेल्या शेतक-यांनी द्राक्ष बागायतीत केवढी क्रांती करून दाखवली आहे. एकरी २६ टन द्राक्षे पिकविणारे शेतकरी आपल्या शेजारी आहेत. त्यांच्या भाषेत, प्रात्यक्षिकाद्वारे, आधुनिक ज्ञान विज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवले तर तीन एकरवाला शेतकरीही हेलीकॉप्टरमधून सहज फिरू शकेल. “सायन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स्” आणि “सायन्स ऑफ जेनेटिक्स” यांनी प्रयोगशाळांमधून जे शक्तीसामर्थ्य दाखवले आहे ते व्यवहारांत आणले तर गावोगांव “मयसभा” च उभ्या रहातील. आपल्या खोलीत बसून पाहू शकतो, ऐकू शकतो. लाखो मैल दूर असलेल्या आकाशांतील ग्रहगोलावरचे संदेश आणि चित्रफिती पाहू शकतो. अंतर संपवण्याचा हा झपाटा केवढा आहे? टी. व्ही. बघतो पण त्यातील विज्ञान, तंत्रज्ञान आपण समजून घेतले का? नाही. आपला आजही समज आहे, टी. व्ही. पहायचा म्हणजे हिंदी सिनेमातली “इलू इलू” ची गाणी ऐकायची आणि अर्धनग्न हिरो हिरॉईन अश्लील नाच करीत लोळताना पहायचे.