व्याख्यानमाला-१९९५-९६-४६

विधीमंडळे, कायदेमंडळे, लोकसभा इते जी कायदे करण्याची चतकोर सत्ता लोकप्रतिनिधींच्या नावार ठेवली आहे, ती कायदे करण्याची सत्ताही प्रत्यक्षात लोकप्रतिनिधीच्या हातात किती असेत हे कायदेमंडळात गेल्यानंतर कळते. मंत्रीमंडळ व सचीव बसून कायद्याची बिले तयार करतात. मंत्री फक्त कायद्याचा हेतू, आवश्यकता सांगतात. प्रत्यक्ष बिल तयार करायचे काम, सचीव व त्यांचे पगारी नोकरवर्गच करतो. तपशील तर सचीवांना हवा तोच असतो. कायदेमंडळात बिल सादर करीपर्यंत गुप्ततेच्या नावाखाली बिल लोकप्रतिनिधीनाही पहाता येत नाही. बिल कायदेमंडळांत मांडल्यानंतर पक्षनेता जे ठरवेल त्यालाच मान हलवावी लागते. अन्यथा पक्षशिस्त मोडते. बिल वाचायलाही फारसा अवधी नसतो, वाचले तरी त्यातील क्लिष्ट भाषा आणि मांडणी नीट समजतेच असे नाही. त्यांत बहुतेक बिले इंग्रजीमधून तयार होतात. इंग्रजी न जाणणारे लोकप्रतिनिधी मख्ख बसून असतात. कायद्याची मराठी भाषाही समजायला अवघडच असते. सत्ताधारी राजकीय पक्ष कै. यशवंतरावांच्या काळापर्यंत ज्या विश्वासाने, निश्चित दिशा व दृष्टी घेऊन चालत होते त्या काळांत पक्षांतर्गत चर्चा बैठकी होऊन, त्यांत लोकप्रतिनिधी भाग घेऊन नियजित बिलाची माहिती तरी घेत होते. आता पक्षांतर्गत लोकशाही बहुतेक राजकीय पक्षांनी मोडीत काढली असल्याने ती चर्चाही बंद झाली आहे.

“लोकशाहीतील सार्वभौम सत्ता लोकांची” या क्रांतीकारक विचारांची, प्रत्यक्ष व्यवहारांत युरोपीय प्रातिनिधीक लोकशाहीने अशी फोलकटे करून टाकली आहेत. तरीही आम्ही डोळे झाकून पुरस्कार करीत राहिलो आहे, हे या देशातल्या प्रचलित अराजकाचे मूळ आहे. लोक आणि लोकप्रतिनिधी यांनी सत्ता हातात घेऊन, लोकांच्या अडचणी, लोकांचे प्रश्न नीट आणि तात्काळ सोडवायचे होते. लोकांचे राज्य, लोकांच्या सर्वांगीण विकासाचे राज्य, नवसमाज निर्मितीची क्रांती, राजसत्ता हातात घेऊन करायची होती. प्रत्यक्षांत ती सार्वभौम सत्ता पगारी नोकरशाहीच्याच हातात ठेवून समाजातील चलाक, हितसंबंधी “कौटिल्यांनी” लोकशाहीतही लोक आणि लोकप्रतिनिधी यांना असहाय्य हतबल करून ठेवले आहे.

स्वातंत्र्यानंतर रासत्ता लोकशाही पद्धतीने हातात घेऊन देशाची, समाजाची, जडणघडण करायची होती. त्या राजसत्तेचं साधनच असे निकामी, बोथट आणि उलटेच परिणाम देणारं निघालं. हे युरोपीय प्रातिनिधीक लोकशाहीचं हत्यार टाकून देऊन प्रत्यक्ष लोकशाहीची अनुभूती देणारी, सार्वभौम सत्ता ख-या अर्थाने आणि पूर्णपणे लोकांच्याच हातात राहील. लोकहितासाठीच वापरली जाईल याची हमी देणारा, लोक जिथं राहतात तिथून, त्या ग्रामसभेतून, विकेंद्रित विस्तृत पायावर भक्कपणे उभा राहणारा लोकशाही व्यवस्थेचा पर्याय आपल्याला शोधून मांडलाच पाहिजे. मानवेंद्रनाथ रॉयच्या लोकसमित्यावर आधारित राज्यव्यवस्थेची कल्पना आणि म. गांधींच्या ग्रामस्वराज्याच्या कल्पना पुन्हा विचारांत घेऊन, युरोपीय प्रातिनिधीक लोकशाहीचा हा फसवा ढाचा टाकून दिला पाहिजे.

सहकारी कृषी औद्योगिक समाजरचना करणारी अर्थव्यवस्था, ग्रामस्वराज्यावर आधारीत मजबूत अशी खरी लोकशाही राज्यव्यवस्था, परलोकवाद आणि पाश्चात्य भोगवाद यांच्या मानसिक गुलामगिरीतून मने मुक्त करून, व्यक्ती, समाज व सृष्टी यांचे परस्पर पूरक व पोषक नाते जोपासणारे संस्कार करणारी शिक्षणव्यवस्था, या परिवर्तानाच्या, नव्या महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या दिशा आहेत. गतीमान विकासाची दिशा निश्चित केली तरी, आपल्याला जायचे आहे कुठे? हेही अनिश्चत असता कामा नये. चांगला माणूस, चांगला समाज, प्रस्न्न सृष्टी यांचे स्पष्ट स्वरूप आपल्याला माहिती पाहिजे. अन्यथ विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रचंड अश्वशक्तीची घोडी, दाहीदिशा उधळीत बसलो तर मानवजातीला कुठे फेकून दितील त्याचा मागमूसही शिल्लक रहाणार नाही.

भारतीय संस्कृतीने हजारो वर्षे मानवी समाज चालवला आहे. रानटी अवस्थेतून जैन किंवा बुद्ध अवस्थेला येईपर्यंत अनेक जीवनपद्धतींचा, कुटुंबव्यवस्थांचा, टोळी जीवनाचा, राज्यव्यवस्थांचा, अर्थव्यवस्थांचा अनुभव घेतला आहे. किमान २५ हजार वर्षे विविध समाजव्यवस्था चालवून पाहिल्या आहेत. त्या स्रव अनुभवानंतर भारतीय संस्कृती आदर्श कुणाला मानते? रविंद्रनाथ टागोरांच्या शब्दांत सांगायचे तर, “इथे राजे, महाराजे सम्राट होऊन गेले. योद्धे, महायोद्धे, रथी, महारथी होऊन गेले, विद्वान, पंडित, तत्वज्ञ, विचरावंत होऊन गेले. धनपती, कारागीर होऊन गेले. विद्या, सत्ता, संपत्तीच्या अत्युच्च पदावर बसणारे अनेक महापुरुष होऊन गेले. परंतु या सर्वामधून भारतीय संस्कृती आदर्श कुणाला मानते? वरीलपैकी कुणालीही नाही. भारतीय संस्कृती आदर्श मानते ऋषी मुनींना, योगी महात्म्यांना.” चांगले व्हायचे, पुढे यायचे, सुधारायचे म्हणजे नेमके काय व्हायचे? याचे फार स्पष्ट चित्र प्रदीर्घ अनुभवानंतर, भारतीय संस्कृतीने रेखाटले आहे. भारतीय जनगण मनांत आजही तेच आदर्श आहेत. म्हणून तर इतर सर्व बाबतीत अनेक भारतीय नेते फार वरचढ असताना, म. गांधी इथे आदर्श अनुकरणीय ठरले, सत्यशोधक सत्याग्रही आचार विचारांचा माणूसच इथे, कोट्यावधी मनांचा आदर्श ठरला. न भूतो असे स्वातंत्र्याचे सत्याग्रही आंदोलन सामान्य माणसांच्या अतःकरणांत उठवू शकला.