व्याख्यानमाला-१९९५-९६-३५

म. गांधींच्या नीतीच्या, तत्वाच्या, आध्यात्मावर आधारीत, सत्याग्रही राजकारणाला विकृत करून काही जणांनी सौदेगिरी केली आहे. राजकारणांत धर्मजाती घुसडण्याचा प्रयत्न चालवला आहे. धर्मांध, जात्यांध राजकारण सत्याचे होत नाही. मुस्लीम, शीख, हिंदु, ख्रिश्चन धर्माच्या ओरोळ्या ठोकून काहींनी राजाकारण चालवले आहे. ते सारे बॅ. जीनांचा विचार, आर. एस. वाले, खलिस्तानवाले आणि “इस्लाम खतरेमें” असा घोषणा देणारे आजही करत आहेत. भारतीय संस्कृतीतील विविधतेतील एकता, हे शिवधनुष्य ज्यांना पेलत नाही. ते हे सारे आधुनिक रावणाचे वारसदार आहेत. गांधींचा देवधर्म, आध्यात्म यावरील विश्वास आंधळा नव्हता. तो सत्याग्रही होता. देवधर्म जातीच्या नावातून राजकारण साधू इच्छिणारे आजकालचे धर्मवादी यांना देव, धर्म, आध्यात्म सत्ताबाजीसाठी वापरायचे आहे. आजचे “अधर्मी आणि धर्मांधी” दोघेही सत्याग्रही नाहीत. ते असत्याग्रही आहेत, संपती शोधक आहेत, तत्वहीन राजकारणांतले ते संधीसाधू (सत्ताबाज) आहेत.

सत्तेच्या राजकारणासाठी आर्थिक, सामाजिक सुधारणेचा ध्येयवाद टाकून देव धर्म जातीजमाती वापरण्याची स्पर्धाच देशात चालू आहे. जातीधर्म निरपेक्षतेचा उदघोष करायला आणि जाती, धर्म संघटनांचे मेळावे भरवीत सुटायचे. निवडणुकीतली तिकीटे जातीधर्मावर वाटायची. निवडणुकातील मतांसाठी जातीधर्म जमाती गोंजारत बसायचे. आमक्या जातीचा एक माणूस मंत्री केला की, त्या सर्व जातीचा उद्धार झाला, त्यासंबंधीचे कार्य पार पाडले अशा साळसूद समजूतीचे राजकारण चालले आहे. समाज परिवर्तानाच्या पुढे ज्या अडचणी आहेत, जे दोष आहेत, ते दोष, त्या अडचणी हाच काही मंडळींच्या राजकारणाचा आधार झाला आहे. गरीबी, जातीपाती, मागासपण याच आधारावर जे राजकारण करतात, ते आपले आधार सुरक्षित आणि भक्कम करण्याचाच प्रयत्न करतात. ते आणि मग हे असले राजकारण समाजपरिवर्नतान देशाच्या जडणघडणीत धोंड म्हणून आडवे पडते. पुढे जायचा रस्ताच अडतो आणि राजकारणाबरोबर सारा समाज, सारा देश घोटाळ्यांत पडतो. मते आणि मदत यासाठी काहीही करत सुटायचे, असले राजकारणी यशस्वी मिरवू लागले.

सत्तेच्या राजकारणाला, संपत्तीचे राजकारण, पैशाचे राजकारण जोडले जातेच. राजकारणांतील सत्तापदे मिळवायला पैशाचे राजकारण सुरू होते. सत्तापदे मिळाली की दामदुपटीने पैसा गोळा केला जातो. राजकारणी, राज्यकर्ते, प्रशासक, अर्थसंस्था, पतसंस्थांचे पदाधिकारी यांची एक विशेष साखली, सा-या अर्थव्यवस्थेला वेटोळो घालून बसते. त्यांतून हर्षद मेहतासारखा “महाबैल” शंकराच्या नंदीप्रमाणे विशेष स्थान प्राप्त करतो. बाकीचे बैल, कुणी नंदीबैल म्हणून, काही वळू बैल म्हणून, गावोगाव हिंडत असतात. हर्षद मेहतासारखे सहा हजारकोटी रुपये दिवसाढवळ्या लुटणारे, उचले आणि बुडवे यांचा सुळसुळाट त्या विशेष साखळीच्या संरक्षणांत होत असतो.
राजकारणात सत्ताबाज संधीसाधू, अर्थकारणांत उचले आणि बुडवे, तसे धर्मकारणांत बडव्यांचा सुळसुळाट झाला की, अराजकांचे कडे पूर्ण होत असते. अयोध्येचे राममंदीर प्रकरण त्याचे अगदी ताजे उदाहरण आहे. १५व्या शतकांत बांधलेली आणि आज सोडून दिलेली मशीद, ती पाडायचे धर्मकार्य आर. एस. एस. च्या कारसेवकांनी केले. तिथे आता राममंदीर बांधायला गावागावातून “रामशिला” या नांवाने विटा गोळा करायच्या. त्याच्या प्रचारासाठी रामरथ देशभर फिरवायचा. केवढे हे धर्मकार्य आणि केवढी ही रामभक्ती, गावातील राममंदीरच नव्हे, तर अनेक देवदेवतांची मंदीरे पडून झडून त्यांच्या आवरांत हागंदारी झाली आहे. त्याकडे पिढ्यान पिढ्या कुणी लक्ष देत नाही. पण मशीद पाडून त्याच ठिकाणावर राममंदीर उभारण्याने हजार वर्षांचा इतिहास ते बदलणार आहेत. लोकांना मूर्ख समजून त्यांच्या धर्म भावनांचा राजकारणांसाठी असा उपयोग करण्याची कुटील, चाणक्य नीती आर. एस. एस. ने चालविली आहे. खरं म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राबद्दल सा-या हिंदूंना आदर आहे. श्री. राम काही केवळ आर. एस. एस. च्या ओळखीचा नाही. आमच्याही ओळखीचा, भक्तीचा श्री राम आहे. पण आमचा श्रीराम वेगळा, त्यांचा श्रीराम वेगळा. जनगणांच्या मनांतील श्रीराम, म. गांधींच्या समाधीवर कोरलेला आहे. ३० जानेवारी १९४८ ला दिल्लीच्या बिर्ला मंदीरात श्रीरामाची “रघुपती राघव राजाराम” ही प्रार्थना करायला गांधीजी निघाले असताना, प्रार्थना स्थलावर त्यांना आर. एस. एस. च्या नथुरामाने गोळ्या घातल्या. तिथेच गांधीजी कोसळले. प्राण सोडताना त्यांनी शेवटचा शब्द उच्चाला. “श्री राम” तो श्रीराम आमच्या ओळखीचा, आमच्या भक्तीचा पण बाबरी मशीद पाडून रामाचे देऊळ बांधू म्हणणारा तो श्रीराम नव्हे. तो नथुराम आहे. धर्मकारणात अशाच बडव्यांची आज चलती झाली आहे.